शिबानी जोशी
चौथ्या पिढीतील बेडेकर म्हणजे अतुल व्ही. बेडेकर आणि अजित व्ही. बेडेकर, वसंत यांचे पुत्र आणि त्रिंबक बेडेकर यांचे पुत्र मंदार टी. बेडेकर यांनीही नवे नवे आयाम जोडले. तोपर्यंत बाजारात स्पर्धा वाढली होती. त्यामुळे यांनीही नवनवे प्रयोग केले. हळूहळू लोणची, मिरची लोणचं, मिक्स लोणचं, मसाले, हंगामी मसाले, गोड लोणचं, सुंठ पावडर, हळद, तिखट, सर्व कोरडे मसाले, पावडरी, रसलिंबू, थालीपीठ भाजणी, लाडू मिक्स, अशी जवळजवळ
४४ विविध उत्पादने झाली आहेत.
व्ही. पी. बेडेकर यांनी १९१० मध्ये मुंबईतल्या गिरगाव इथे एक छोटेसे किराणा दुकान सुरू केले तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल की ते दुकान व्ही. पी. बेडेकर अॅण्ड सन्स प्रा. लि. होईल. तरुण व्ही. पी. बेडेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील आपलं छोटसं गाव १९१० साली सोडलं आणि ते मुंबईत आले. पूर्वी कोकणातील माणूस मुंबईत येऊन पोटापाण्याचा उद्योग शोधत असे. तसाच कोकणातला आलेला हा तरुण धंद्यात मदतनीस हवा म्हणून त्यांचे पुत्र व्ही. व्ही. बेडेकर हे गाव सोडून वडिलांना मदत करायला गिरगावात आले. त्यावेळी त्यांचं शिक्षण चौथी पास इतकं झालं होतं. धंद्यामध्ये काही प्रयोग करावा म्हणून व्ही. व्हींनी १९१७ मध्ये मसाले आणि लोणचे तयार करायला सुरुवात केली. लवकरच दर्जेदार तसंच चविष्ट पदार्थांमुळे त्यांनी गिरगावातल्या ग्राहकांना आकर्षित केले. निवडक आणि उत्तम दर्जाचा किराणा माल उपलब्ध असल्याने ग्राहकांची संख्या वाढत होती त्यात स्वतः उत्पादित केलेल्या लोणचे आणि मसाल्यांची भर पडली. लोणची उत्पादनालाही निमित्त म्हणून गमतीशीर घटना त्यांच्या आयुष्यात घडली. ते एकटेच राहत असतं आणि स्वतःचं शिजवून खात असतं. एकदा शेजाऱ्यांनी त्यांना लोणचं खायला दिलं आणि लोणचं-भाताची चव त्यांना आवडली. त्यांना असं वाटलं की आपल्यासारखे अनेक चाकरमानी मुंबईत एकटे राहतात. त्यांनाही तोंडी लावायला लोणचं हा उत्कृष्ट उपाय आहे. तो काळ असा होता ज्या काळात महिला सर्व पदार्थ घरीच करत असतं. विकतच आणणे हे कमीपणाचं समजलं जात असे. तरीही बेडेकर यांच्या लोणच्याचा व मसाल्याच्या चवीमुळे ग्राहक आकर्षित होऊ लागले. सकाळी ७ वाजता बाजारात जाऊन कैऱ्या आणायच्या. लोणचं मुरवत घालायचं आणि मग दुकानात जायचं अशा तऱ्हेने व्हीपींनी कामाला सुरुवात केली. त्याकाळी धंद्यात गुजराती लोक खूप असत. सप्लायर्स, डिस्ट्रिब्युटर्स, पुरवठादार यांच्याशी बोलण्यासाठी ते अस्खलित गुजराती सुद्धा शिकले होते. कोकणातून येणाऱ्या कामगारांना रोजगार दिला. कोकणी मराठी माणूस धंदा करू शकत नाही हे विधान त्यांनी खोटं ठरवलं होतं.
धंदा वाढू लागल्यानंतर ४ नवीन दुकाने जोडली गेली. ठाकूरद्वार, परळ, दादर आणि फोर्ट इथे दुकानं सुरू झाली. हळूहळू वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी त्यांनी ५ उत्पादन युनिट सुरू केली. कामाची व्याप्ती पाहता १९४३ मध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन झाली. कंपनीने आपला सुवर्णमहोत्सव तसेच अण्णासाहेबांची ६०वी जयंती १९६१ मध्ये साजरी केली. सुवर्णमहोत्सवी भव्य समारंभ झाल्यानंतर अण्णासाहेबांनी सक्रिय व्यवसायातून निवृत्ती घेतली आणि व्यवसाय पुढच्या पिढीकडे सोपवला. आपला व्यवसाय सचोटीने करत असतानाच अण्णा साहेबांनी सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली होती. गिरगावातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता तसेच स्वतःही अनेक सामाजिक उपक्रम आजही त्यांच्यातर्फे राबवले जातात. त्यांची दूरदृष्टी, मार्गदर्शन आणि तत्त्व त्यांचे ज्येष्ठ पुत्र त्र्यंबक व्ही. बेडेकर यांनी तोपर्यंत आत्मसात केली होती. ते १९६१ ते १९९३ पर्यंत प्रमुख होते आणि तेव्हा कंपनीने नवं नवीन शिखरे पादाक्रांत केली. आज, “बेडेकर” हा ब्रँड महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि भारतातील सर्व महानगरांमध्ये पोहोचला आहे. बेडेकर उत्पादने यूएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, यूके आणि अनेक लहान देशांमध्येदेखील उपलब्ध आहेत. आता उंबरगाव इथे त्यांचा मोठा कारखाना आहे. त्यांच्या कैरीच्या लोणच्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोणच्यात कुठेही बाठ येत नाही, फोडी कापण्यासाठी यंत्र आहे; परंतु बाठ कापण्यासाठी कुठलंही यंत्र उपलब्ध होत नव्हतं त्यामुळे ते काम आजही त्यांच्याकडे मॅन्युअली केलं जातं. यामुळे खराब कैरी सुद्धा शोधून काढता येते. इतका विचार दर्जा राखण्यासाठी केला जातो. त्यामुळेच ११० वर्षे जुन्या लोणच्या प्रमाणेच बेडेकर लोणच्याची चव पिढ्या-पिढ्यांच्या जिभेवर रेंगाळत आहे. त्यानंतर अण्णासाहेबांचे धाकटे सुपुत्र वसंत व्ही. बेडेकर हे बेडेकरांच्या चौथ्या पिढीसह कंपनीचे काम पाहत होते. चौथ्या पिढीतील बेडेकर म्हणजे अतुल व्ही. बेडेकर आणि अजित व्ही. बेडेकर, वसंत यांचे पुत्र आणि त्रिंबक बेडेकर यांचे पुत्र मंदार
टी. बेडेकर यांनीही नवे नवे आयाम जोडले. तोपर्यंत बाजारात स्पर्धा वाढली होती. त्यामुळे यांनीही नवनवे प्रयोग केले. हळूहळू लोणची, मिरची लोणचं, मिक्स लोणचं, मसाले, हंगामी मसाले, गोड लोणचं, सुंठ पावडर, हळद, तिखट, सर्व कोरडे मसाले, पावडरी, रसलिंबू, थालीपीठ भाजणी, लाडू मिक्स, अशी जवळजवळ ४४ विविध उत्पादनं झाली आहेत. जगभरातल्या दुकानात ही उत्पादनं मिळतातच शिवाय बेडेकर यांची स्वतःचं गिरगाव येथे दुकान आहे. त्या ठिकाणीही या सर्व वस्तू मिळतात.
ग्राहकांच्या प्रोत्साहनामुळे, उत्पादनांचा दर्जा, घरगुती, चविष्ट, घरच्या चवीशी जुळण्यासारखी चव यामुळे आईच्या, आजीच्या हातचं लोणचं आपण खात आहोत असं वाटतं. त्यांनी पारंपरिक चटण्या आणि पिठापासून ते खायला तयार फ्रोझन पदार्थ आणि झटपट मिक्स अशी उत्पादनं सुरू केली. फ्रोजन उकडीचे मोदक हा पदार्थ तर ग्राहकांनी खूपच उचलून धरला आहे, असं बेडेकर सांगतात. गेल्या गणेश उत्सवात जवळजवळ सव्वालाख मोदकांची विक्री झाली होती. परदेशात राहणारे मराठी लोकांना ते फ्रोजन मोदक म्हणजे उत्तम पर्याय मिळाला आहे. हे मोदक फक्त वाफवून घ्यायचे असतात. परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांना ब्रॅण्डेड मोदक त्यामुळे मिळू लागले आहेत. प्रामाणिकपणा आणि उत्कटतेने उत्पादन केलं तर स्थानिक ब्रँडचा वारसा अनेक दशकांपर्यंत कसा टिकून राहू शकतो? याची ही कथा म्हणता येईल. अण्णासाहेबांनी किराणा स्टोअरचा विस्तार मल्टी-स्टोअर, ट्रेडमार्क ब्रँडमध्ये केला. बेडेकर कुटुंबातील तिसऱ्या पिढीने आधुनिक, मोठ्या प्रमाणावर कारखाना उभारण्याचे काम केले.
भारत सरकारने आयोजित केलेल्या ऑल इंडिया फ्रूट शोमध्ये बेडेकर पिकल्सला प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळाली आहेत तसंच इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१० मध्ये, बेडेकर कंपनीला शतक पूर्ण झाल्यामुळे शतक महोत्सव साजरा करण्यात आला. घरी शंभर वर्षांपूर्वी घरोघरी साठवणुकीचे पदार्थ म्हणून लोणचे, मुरंबे, पापड केले जात असत. आज कालच्या आधुनिक जगात ही सर्व उत्पादनं रेडीमेड घेतली जात आहेत. महिला नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडतात, एकत्र कुटुंब पद्धती संपली अशा अनेक सामाजिक कारणांमुळे आज तयार अन्नपदार्थांना मोठी मागणी आहे आणि त्यामुळेच या क्षेत्रात स्पर्धा ही वाढली आहे. आज देशभरात लोणचे बनवणाऱ्या शेकडो कंपन्या आहेत; परंतु त्यातही व्ही. पी. बेडेकर अॅण्ड सन्स यांचं लोणचं म्हटलं की महिलांमध्ये विश्वासाचं स्थान निर्माण होतं. त्यामुळे बेडेकर यांच्या मालाला आजही उठाव आहे अर्थात बेडेकरांच्या पुढच्या पिढ्यांनी भविष्याचा वेध घेत आपल्या उत्पादनात बदल केले तसेच नवनवीन उत्पादनही बाजारात आणली, त्यामुळे ते या स्पर्धेत टिकू शकले आहेत हे सुद्धा नाकारता येणार नाही. किराणा स्टोअर म्हणून सुरू झालेला व्यवसाय आता ब्रँड झालाय. जगभरातील ग्राहकांच्या घराघरात आणि जिभेवर पोहोचला आहे आणि काळाप्रमाणे नवीन नवीन उत्पादनं घेऊन बेडेकर यांच्या पुढच्या पिढ्या तो वाढता ठेवत आहेत.
joshishibani@yahoo. com