Sunday, March 16, 2025
Homeब्रेकिंग न्यूजसरपंचाची निर्घृण हत्या; मुख्य आरोपी अद्याप फरारच; बीडमध्ये संताप अन् असंतोष

सरपंचाची निर्घृण हत्या; मुख्य आरोपी अद्याप फरारच; बीडमध्ये संताप अन् असंतोष

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची १९ दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक गंभीर आरोप झाले. शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा हा काढण्यात आला असून या मोर्चाला लोकांनी मोठी गर्दी केली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर लोकांमध्ये मोठा संताप बघायला मिळाला. डोक्याला काळ्या पट्ट्या आणि हातात संतोष देशमुख यांचे बॅनर घेऊन लोक मोर्चात सहभागी झाले होते. बीड जिल्ह्यात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्ह मुख्य सुत्रधार व आरोपींना अटक करण्याची मागणी करत बीडची जनता शनिवारी रस्त्यावर उतरली होती.

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, भाजप आमदार सुरेश धस, आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती असे सर्वपक्षीय नेतेमंडळी सहभागी झाले होते. या मोर्चातून दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. सरपंच हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपी आणि खंडणी प्रकरणात फरार असलेल्या वाल्मिक कराड याला तात्काळ अटक करण्यात यावी आणि या संपू्र्ण प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

Devendra Fadnavis : आरोपींची संपत्ती जप्त करा आणि बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत, त्या सर्वांचे परवाने रद्द करा

बीडमध्ये उपस्थिती राहिलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील,भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार, आमदार संदीप क्षीरसागर, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित जनसमुदायासमोर भाषणे करताना संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या व फरार आरोपींना लवकर अटक करा, असे म्हटले आहे.

फरार आरोपींची जप्ती जप्त करण्याचे सीआयडीला आदेश

बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून आयोजित मोर्चामध्ये जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहत आपला आक्रोश व्यक्त केल्यानंतर सरकार दरबारी कारवाईला वेग आला आहे. बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिले आहेत. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी चौथा आरोपी पोलिसांच्या हाती लागला. मात्र अजूनही तीन जण फरार आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पाऊल उचलले असून फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बीडमध्ये जवळपास १२०० लोकांना शस्त्र परवाना देण्यात आला असल्याने जिल्ह्यात अनेकदा गोळीबाराच्या घटना घडत आहेत. हवेत गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्नही अनेकांकडून होत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशा स्टंटबाजांवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करून शस्त्र जमा करावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

बीडमधील मोर्चानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने स्क्रीनशॉट असणाऱ्या फोटोंसह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याप्रकरणी आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात शनिवारी बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रूपाली ठोंबरे यांनी स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ शनिवारी बीडमध्ये निघालेला मोर्चा राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाडांनी मॅनेज केल्याचा आरोप रूपाली ठोंबरे यांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -