संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सीआयडीला निर्देश
मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) मुख्य आरोपी १९ दिवसांपासून फरार आहेत. त्यामुळे बीड पोलिसांकडून तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना दिले आहेत. तसेच बंदुकीसोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया देखील तातडीने सुरू करा, अशा सूचना बीड पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बीड जिल्ह्यामध्ये गन कल्चर सुरू असल्यावरून सरकारला लक्ष्य केले जात आहे. ट्विटच्या माध्यमातून अनेक फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले आहेत. यावरून बीडमध्ये मिशाही न फुटलेल्या पोरांसोरांच्या हाती बंदूक दिसून येत आहेत. खंडणीखोर फरार वाल्मिक कराडच्या मुलाचाही त्यांनी फोटो पोस्ट केला असून त्याच्याही कमरेला बंदूक दिसून येत आहे. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार बीड, परभणी, अमरावती या ठिकाणी सर्वात जास्त परवाने दिल्याचे म्हटलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये तब्बल १ हजार २८१ जणांकडे शस्त्र परवाना आहे. दरम्यान, परवाना देताना सर्व प्रकारची शहानिशा करूनच परवाना दिला जातो. यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा तपासली जाते. मात्र बीड जिल्ह्यामध्ये टपरी पोरं सुद्धा ज्या पद्धतीने बंदूक कमरेला लावून फिरत आहेत त्यावरून पोलिसांनी खेळण्यातील बंदूक दिल्याप्रमाणे परवाने दिले आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बीडमध्ये तीन दिवसांपूर्वी कैलास फडला अटक केली आहे. त्याचाही हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.