नवी दिल्ली : कुवैत दौऱ्यावरून परतताच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. भारतातील तरुणांची क्षमता आणि प्रतिभा यांचा पुरेपूर वापर करणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सांगितले.
PM Modi Kuwait Visit : कुवैतमध्ये पंतप्रधान मोदींना मिळाला सर्वोच्च पुरस्कार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्यानिमित्त तरूणांना संबोधित करताना सांगितले की, आज देशातील हजारो तरुणांच्या आयुष्याची नवी सुरुवात होत आहे. तुमचे वर्षानुवर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनेक वर्षे केलेल्या मेहनतीला यश आले आहे. वर्तमान २०२४ हे सरणारे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन आनंद देणारे आहे. मी तुम्हा सर्व तरुणांचे आणि तुमच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो, असे मोदी म्हणाले. गेल्या दीड वर्षात सरकारने सुमारे १० लाख तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. जी शिक्षणपद्धती पूर्वी निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांवर ओझे असायची, ती आता त्यांना नवे पर्याय देत आहे. अटल टिंकरिंग लॅब आणि आधुनिक पीएम श्री शाळांच्या माध्यमातून लहानपणापासूनच नाविन्यपूर्ण मानसिकता आकाराला येत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
Rozgar Melas are empowering the youth and unlocking their potential. Best wishes to the newly inducted appointees.https://t.co/XkEnXIqQZv
— Narendra Modi (@narendramodi) December 23, 2024
रोजगार मेळावा हा पंतप्रधान यांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. हा उपक्रम युवकांना राष्ट्रनिर्माणाबरोबरच आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देईल. हा रोजगार मेळावा देशभरातील ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारख्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये नियुक्त होतील.