पुणे : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २६१ लिपिक व ९७ शिपाई पदांसाठी शनिवारपासून तीन दिवस राज्यातील नऊ जिल्ह्यातील केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार होती. यासाठी जवळपास ३१ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, शनिवारी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील परीक्षा केंद्रांवर गोंधळ (Confusion at exam centers) बघायला मिळाला. यावेळी अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने ही परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. यावेळी विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
शनिवारी राज्यातील ४० केंद्रावर एकाच वेळी ही परीक्षा होणार होती. या मध्ये पुण्यातील काही केंद्रांचाही समावेश होता. मात्र, पुण्यासह काही केंद्रावर अचानक सर्व्हर डाऊन झाले. बऱ्याच प्रयत्नांनंतरही हा सर्व्हर सुरु होत नसल्याने अखेर ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
One Sided Love Story : असलं प्रेम नकोचं बुवा! एकतर्फी प्रेमाने घेतला तरुणीचा नाहक बळी
या परीक्षेसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी पुण्यात दाखल झाले होते. मात्र, आता परीक्षाच रद्द झाल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीतील डीसीएस टेक्नॅालॅाजिस प्रायवेट लिमिटेड या कंपनीला परीक्षा घेण्याचे काम देण्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.
खरे तर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती प्रक्रिया मागील अनेक वर्षांपासून विविध कारणांनी गाजत आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात सहकार खात्याने आणि स्वत: मुख्यमंत्र्यांनी या भरतीला स्थगिती दिली होती. मात्र, नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा निकाल देत ही स्थगिती उठविली.