गोहत्येवरून आमदार निलेश राणे आक्रमक
नागपूर : महाराष्ट्रात गोहत्या थांबली पाहिजे. गोहत्येचा व्यापार थांबवला जात नाही आणि या लोकांवर कारवाई केली नाही तर उद्या कुणाला तरी कायदा हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती आहे, असे सांगत आमदार निलेश राणे यांनी महाराष्ट्रात गोहत्या बंदी आणावी अशी मागणी विधानसभेत केली आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत आमदार निलेश राणेंनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात गोहत्या थांबली पाहिजे. राज्यपालांच्या अभिभाषणात जरी याचा उल्लेख नसला तरी माझ्या मतदारसंघात, रत्नागिरी आणि बाजूच्या जिल्ह्यात हे उघड चालले आहे. ज्यांचे रॅकेट आहे ते उघड धंदे करतात. आंदोलने्य्य्य्य केली तरी हे थांबत नाही. अनेक आंदोलने झाली. आंदोलनात गुन्हे झाले; परंतु गोहत्या थांबत नाही. गोहत्येचा व्यापार थांबवला जात नाही. या लोकांवर कारवाई केली नाही तर उद्या कुणाला तरी कायदा हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. आपले सरकार बहुमतात आहे. आज हिंदुत्वाचे सरकार आहे. त्यामुळे आज आपण आपल्या गोमातेचे संरक्षण करू शकलो नाही, तर आपण कुठल्या सरकारकडे ही मागणी करणार आहोत? त्यामुळे गोहत्या थांबली पाहिजे. ही तस्करी थांबली पाहिजे व जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
Devendra Fadanvis : महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
दरम्यान, राजकोट किल्ल्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याचा उल्लेख या सभागृहात केला. जेव्हा पुतळा कोसळला, त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आमची तेव्हाही होती आणि आजही आहे. माझ्या अगोदर याच मतदारसंघातील प्रतिनिधी होते ते १५ मिनिटांत तिथे पोहोचले, हा पुतळा पडला की पाडला याची चौकशी व्हावी. त्यांच्या सहकाऱ्यांचे सीडीआर चेक करावेत. छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या आस्थेचा विषय आहे. त्यात कुठेही तडजोड करणार नाही. हे जाणूनबुजून केले असेल तर त्यांना सोडू नका असे सांगत आमदार निलेश राणेंनी अप्रत्यक्षपणे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधला.