Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीZakir Hussain : तबल्याचा ताल हरपला! झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Zakir Hussain : तबल्याचा ताल हरपला! झाकीर हुसेन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांच्या निधनाने तबल्याच्या ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने संबंध जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्राचा सुपुत्र असलेल्या झाकीर हुसेन यांनी अवघ्या जगाला तबल्याचे वेड लावले. तीन पिढ्यांसोबत तबल्याची जुगलबंदी सादर करणारे झाकीर हुसेन यांनी अनेक युवकांना तबला वादनाकडे आकर्षित केले. तबल्याच्या क्षेत्रात भारताची वेगळी ओळख त्यांनी जगात निर्माण केली. तबलानवाज पद्मविभूषण उस्ताद झाकिर हुसेन आणि तबला हे अद्वैत होते. हे अद्वैत आता भंगले आहे. जादुई बोटांनी त्यांनी स्वरमंडलात उभे केलेल्या अनेक अद्भुत मैफिली यापुढे तालयोगी तबलानवाझ उस्ताद झाकिर हुसेन यांच्याविना सुन्यासुन्या वाटत राहतील.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन, वयाच्या ७३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कुटुंबियांनी दिली माहिती

वयाच्या सातव्या वर्षापासून तबलावादनाची सुरवात करणाऱ्या उस्ताद झाकिर हुसेन यांनी तबलावादनातील एकल मैफिलींनाही प्रतिष्ठा मिळवून दिली. भारतीय संगीताला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यात हुसेन यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे शिष्य जगभर संगीताची सेवा करत आहेत. वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा त्यांनी केवळ जोपासलाच नाही तर तबलावादनाला अत्युच्च अशा शिखरावर नेले. गाणारा तबला ही त्यांच्या जादुई बोटांची करामत अनेकांनी अनुभवली आहे. ज्येष्ठ कलाकारांबरोबर केलेली जुगलबंदी रसिकांसाठी पर्वणी होती.

तरूण आणि होतकरू कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांची कला सादर व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तबल्याला समानार्थी नाव झाकीर हुसेन होते. साथीच्या या वाद्याला त्यांनी व्यासपीठाच्या केंद्रस्थानी आणून त्याला जनमनात स्थान मिळवून देण्याचे महान कार्य केले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीताचा तेजस्वी तारा निखळला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -