स्नेहधारा – पूनम राणे
प्रतिभा हा साक्षात्कारी स्पर्श असतो. प्रत्येक विद्यार्थी प्रतिभावान असतोच. मात्र तो कोणत्या कलेत आपली प्रतिभा व्यक्त करतो, हे जाणणारा पालक, शिक्षक, त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याचा खरा शिल्पकार ठरतो. असाच अभिनयाचा साक्षात्कारी स्पर्श झालेल्या कलाकाराची ही कहाणी.
वय वर्षे साडेतीन. तीनचाकी सायकलची स्पर्धा. स्पर्धेत नाव द्यायला उशीर झाला, मुदत निघून गेली. त्यावेळी पालकांनी ठरवलं, मुदतीत नाव न दिल्याने स्पर्धेत भाग घेता आला नाही, निदान मुलाला स्पर्धा पाहायला तर घेऊन जाऊया. असा विचार करून आपल्या मुलाला स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी घेऊन गेले.
एवढ्यात आयोजकांनी जाहीर केले, ज्या पालकांना अजूनही आपल्या मुलाचं नाव द्यायचं असेल, ते या स्पर्धेत नाव देऊ शकतात. पालकांना अत्यंत आनंद झाला आणि धावत जाऊन त्यांनी आपल्या मुलाचं नाव स्पर्धेसाठी दिलं. घरी जाऊन बाबा जुनी तीनचाकी सायकल घेऊन आले. या स्पर्धेत एकूण २५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. स्पर्धा सुरू झाली, मुलाला प्रथम क्रमांक स्पर्धेत प्राप्त झाला. नवी कोरी तीनचाकी सायकल घेऊन मुलगा आणि पालक घरी परतले.
एकदा दुसरीत असताना घरी पालकांना सूचना जाते, ठिगळ लावलेला पायजमा आणि अंगरखा घालून विद्यार्थ्याला शाळेत पाठवायचं आहे. नाटकात त्याला भिकाऱ्याचा रोल करायचा आहे. त्यांनी शाळेत जाऊन विचारलं. तेव्हा त्यांना समजले की, आपल्या मुलाला जो रोल मिळालेला आहे, त्यामध्ये राजा भिकाऱ्याच्या वेशात नगरात फेरफटका मारून येणार आहे. अत्यंत सुंदर अभिनय या मुलाने त्या नाटकात केला.
सुट्टीच्या कालावधीत बालनाट्य शिबिरामध्ये पालक पाठवत असत. त्यामुळे बालनाट्य एकांकिका स्पर्धेत भाग घेणे, ही विशेष आवड लहानपणापासूनच होती.
विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला मला कोणत्या शाखेत अॅडमिशन घ्यायचे आहे, हे समजत नसते किंवा समजत असूनही इतर मित्र जातात म्हणून आपणही त्या शाखेत प्रवेश घेतो. अशीच गोष्ट या मुलाच्या बाबतीत घडून आली. विज्ञान शाखेत बारावीच्या परीक्षेचा पेपर देऊन आल्यानंतर, आईला तो म्हणाला, ‘‘हे बघ आई, मला पेपरच लिहिता आलेला नाही. मला काहीच लिहिता आलं नाही. मी नापास होणार आहे !” रिझल्ट काय येणार हे आताच तुला सांगतो. तू मनाला लावून घेऊ नकोस. इतर मुलांसारखा मी जीव देईन, आत्महत्या करणे, हा विचार माझ्या मनातही येणार नाही. पण मला जी एखादी चांगली गोष्ट जमत असेल त्याचा मी शोध घेईन आणि माझं स्वतःचं अस्तित्व काय आहे, याचा शोध घेईन.”
“तुला जे आवडतं ते कर, हेच कर, अमुक करू नकोस,’’ असे आई केव्हाच म्हणाली नाही. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. कॉमर्स शाखेतून पुढील शिक्षण पूर्ण केले. असे आदर्श पालक ज्या मुलांना लाभतात, त्या मुलांच्या भविष्याला आकाशाला गवसनी घालण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.
नाटक बघणं, नाटकाच्या परिघात राहणं. हे त्याचे आवडते विषय ठरले.
त्यांना एकदा प्रश्न विचारला गेला की, आपल्या आयुष्यातला आनंदाचा क्षण कोणता? उत्तर ऐकून आपणही चकीत व्हाल.
मी बारावी नापास झालो हा माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण… मी नापास झालो नसतो, तर मला माझा स्वतःचा शोध लागला नसता, बलस्थानची जाणीव झाली नसती. नाटक हाच त्यांचा छंद, ध्यास झाला होता.
वाचन छंद, प्रचंड मेहनत, एखाद्या भूमिकेशी समरस होणं, समर्पण सहनशीलता, यशाने बेभान न होणं, संघर्ष व अपयशांना न खचणं, अभिनेता, दिग्दर्शक, सूत्रसंचालक, लेखक, गायक, अभिनय अशा विविध अंगाने नटलेलं, बालगंधर्व, लोकमान्य टिळक यांसारख्या भूमिका करून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सर्वांचे लाडके कलाकार सुबोध भावे.
ज्या नूतन मराठी शाळेत ते शिकले, त्या शाळेचे एक बीद्रवाक्य होतं, ‘‘हाती घ्याल ते तडीस न्याल.” महाराष्ट्राच्या या लाडक्या कलाकाराला अभिनयाचा साक्षात्कारी स्पर्श होऊन या वाक्याची अनुभूती रसिक प्रेक्षक घेत आहेत.