युवराज अवसरमल
लोभसवाणे आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर खास आपला प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. स्टार प्लस वाहिनीवर ‘तिची प्रेमाची गोष्ट’ही मालिका लोकप्रिय आहे. ‘हॅश टॅग तदेव लग्नंम’ हा तिचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तेजश्रीच शालेय शिक्षण डोंबिवलीच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयात झाले. तिथे गाण्याच्या, समूहगीतांच्या कार्यक्रमात तिने भाग घेतला होता. वझे-केळकर कॉलेजमध्ये तिचे पुढील शिक्षण झाले. तिथे तिला सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जास्त भाग घेता आला नाही. कॉलेजमध्ये असताना तिने एक चित्रपट केला, नंतर मालिका केली व नंतर नाटक केले. ‘सप्तपदी’ हा तिचा पहिला चित्रपट होता; परंतु दुर्दैवाने तो चित्रपट पूर्ण झाला नाही. त्या चित्रपटाद्वारे तिला अभिनयाचे दार उघडले गेले. त्यानंतर ‘कर्तव्य’, ‘चित्रा’ हे चित्रपट तिने केले; परंतु नंतर तिची खरी ओळख अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘झेंडा’ या चित्रपटामुळे झाली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिची अभिनयाची गाडी सुस्साट धावू लागली. ‘लग्न पहावे करून’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे- दि रिअल हिरो’, ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘अन्या-दी अदर’, ‘हाजरी’, ‘जजमेंट’, ‘बबलू बॅचलर’ या चित्रपटात तिने काम केले. त्याचबरोबर या गोजिरवाण्या घरात, ‘तुझं नि माझं घर श्रीमंताच’, ‘लेक लाडकी या घरची’, ‘सावधान इंडिया’ या मालिकेत काम केले.
‘हॅश टॅग तदेव लग्नमं’ हा तिचा पंचविसावा चित्रपट आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी विचारले असता ती म्हणाली,” या चित्रपटामध्ये गायित्री नावाची माझी व्यक्तिरेखा आहे. माझ्या सोबत सुबोध भावे आहे. चाळीस वयाच्या आसपास असणाऱ्या दोन व्यक्ती जेंव्हा लग्नासाठी एकमेकांसमोर येतात, त्यावेळी त्यांच्या कोणत्या अपेक्षा असतात, त्यांची एनर्जी लेव्हल कशी असते, त्यांचे लग्न होते की नाही यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या चित्रपटाचे कथानक एका दिवसाचे आहे. नायक व नायिका सकाळी भेटतात व साधारणपणे रात्रीपर्यंत ते एकत्र असतात.
या चित्रपटामध्ये तिला सुबोध भावे सोबत काम करण्याची संधी मिळाली. या गोष्टीचा तिला खूप आनंद झाला. सुबोध सोबत भविष्यात काम करण्याविषयी ती आशावादी आहे. आनंद गोखले याचे दिग्दर्शक आहेत. त्यांच्यासोबत तिने या अगोदर ‘ओली की सुकी’ हा चित्रपट केला होता. त्या चित्रपटाला पारितोषिक देखील मिळाले होते. हा तिचा त्याच्यासोबत दुसरा चित्रपट आहे. कलाकारांना समजून घेणारा, कलाकारांच्या मतांचा विचार करणारा, सेटवर उत्साही वातावरण ठेवणारा दिग्दर्शक आहे. या चित्रपटात ३-४ गाणी आहेत. या चित्रपटातील नृत्याचे दिग्दर्शन उमेश जाधवने केले आहे. नकारघंटा हे गाणं सोशल मीडियावर रिलीज झालेले आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुण्यात झाले. हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी आहे. याचे कथानक सरळ, साधे आहे ते प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा आशावाद तिने व्यक्त केला. आतापर्यंत तिला पाहिजे तसे काम मिळत गेले.
‘होणार सून मी या घरची’ ही मालिका तिच्या जीवनात टर्निंग पॉइंट आहे असे ती मानते. या मालिकेच्या कोणत्या प्रतिक्रिया मिळाल्या असे विचारले असता ती म्हणाली,” तुम्ही अगदी आमच्या घरच्या वाटता. आपल्या घरचीच मुलगी वाटते. तुम्ही जर रडलात तर आमच्या डोळ्यांतून देखील पाणी येते. तुम्ही खऱ्या वाटता. या प्रतिक्रिया मला आवर्जून व सातत्याने येत असतात. त्या प्रतिक्रियाच मला पुढे काम करण्यास प्रोत्साहन देत असतात.” तेजश्रीला तिच्या आगामी ‘हॅश टॅग तदेव लग्नमं’ या चित्रपटासाठी व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!