पुणे : दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (Marathi Sahitya Sammelan) पुणे ते दिल्ली विशेष रेल्वेची व्यवस्था करण्याच्या सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याकरिता केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी पुढाकार घेत रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला.
दिल्लीत दि. २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलन होणार आहे. सरहद, पुणे ही संमेलनाची आयोजक संस्था आहे. सरहदकडून विशेष रेल्वे सेवेसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु, रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे सरहदकडून सांगण्यात आले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच संमेलन दिल्लीत होत आहे. त्यामुळे भव्यदिव्य स्वरूपात संमेलन करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे. यापुर्वी पंजाबच्या घुमान येथे झालेल्या संमेलनाला तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी दोन रेल्वे गाडीची व्यवस्था केली होती.
दरम्यान, रेल्वेमंत्र्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच ही बाब मुरलीधर मोहोळ यांना लक्षात आणून देण्यात आली. मोहोळ यांनी रेल्वमंत्र्यांशी चर्चा करत रेल्वे गाडीची व्यवस्था करण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत कार्यवाही करण्याच्या सूचना वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
याबाबत मोहोळ म्हणाले (Murlidhar Mohol), महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो साहित्यिक दिल्लीतील संमेलनात सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने साहित्यिकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी पुणे ते नवी दिल्ली दरम्यान १९ फेब्रुवारी रोजी आणि नवी दिल्ली ते पुणे दरम्यान २४ फेब्रुवारी रोजी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली. माझ्या विनंतीचा मान राखून त्याची सकारात्मक दखल घेत संमेलनासाठी विशेष गाडीची तरतूद करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना वैष्णव यांनी दिल्या आहेत.