Tuesday, February 11, 2025
Homeब्रेकिंग न्यूजElection 2024: राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद, मतदारांचा खोळंबा

Election 2024: राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद, मतदारांचा खोळंबा

अकोला, मालेगाव, जळगाव, कोल्हापूर, छ. संभाजी नगर आदी ठिकाणी तक्रारी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र, त्यातच अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बी. आर‌ हायस्कूलमधील बूथ क्रमांक १६९ मधील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. सकाळी मतदान सुरू झाल्यापासूनच मतदान यंत्रात बिघाड झाला आहे. या मतदान केंद्रावरील मतदान बराच काळ सुरू झाले नाही. मतदान केंद्रावर मतदार ताटकळत उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात बूथ क्रमांक २९२ या ठिकाणी असलेले ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. या बूथवर असलेले ईव्हीएम मशीन हे इनव्हॅलिड दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मालेगावातील अनेक मतदार हे ताटकळत असल्याचे दिसत आहेत. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात अनेक नागरिक हे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लावून उभे आहेत. मात्र ईव्हीएम मशीन बंद असल्याने नागरिकांचा खोळंबा होत आहे.

जळगावच्या जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरु होत नसल्याने अनेकांचा गोंधळ झाला. ईव्हीएम मशीन सुरू होत नसल्यामुळे मतदानाला १५ ते २० मिनिटे उशीर झाला. हे ईव्हीएम मशीन सुरु व्हावे यासाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांची मदत घेतली. यानंतर साधारण १५ ते २० मिनिटांनी मशीन सुरु झाल्यावर त्याला सील करण्यात आले. यानंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.

BloodBank : राज्यात रक्ताचा तुटवडा; चार दिवस पुरेल इतकाच साठा

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रुक येथील २२६ केंद्रावरील ईव्हीएम मशीन तब्बल तासभर बंद पडले. प्रशासनाकडून मशीन बदलण्याचे काम तातडीने करण्यात आले. नागरिकांची मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लागली आहे. मतदान करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे मतदार वैतागले होते.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील विक्रम हायस्कूल मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. त्यामुळे मतदार केंद्राबाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे.

जळगाव जामोद मतदारसंघातील मनसगावात मतदानयंत्रात बिघाड झाल्याने तेथे काही वेळ मतदान थांबले. खामगाव मतदारसंघात मतदान यंत्रातील बिघाड हा अभिरूप मतदानाच्या वेळीच पुढे आला. त्यानुसार एक सीपीयु आणि तीन व्हिव्हिपँट युनिट बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -