Tuesday, February 11, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सतुलसी विवाह आणि दशावतारी नाटके

तुलसी विवाह आणि दशावतारी नाटके

भालचंद्र कुबल

हल्लीच्या नाट्यसमीक्षकांना नाटक करणारे हिंग लावून सुद्धा विचारत नाहीत. त्यांनी लिहिलेल्या लिखाणाने जर सामान्य प्रेक्षक/वाचक इंप्रेस होत असेल तर ते लेख सोशल मीडियावरून सुसाट व्हायरल करून नाटकांच्या मार्केटिंगची नवी व्याख्या जन्माला घातली गेलीय. त्यामुळे एखाद्या नाटकास सरसकट चांगले म्हणणेही धोकादायक आणि वाईट म्हणणे सुद्धा धोकादायकच…! मग अशावेळी दखलपात्र नाटकावर सकारात्मक चार शब्द लिहून ते बघावे की, नाही हा निर्णय वाचकांवर टाकून मोकळे होण्यातच शहाणपण असते. अशा या छोटेखानी मजकुरास समीक्षकीय लेखा-जोखा न म्हणता सर्वमान्य निरीक्षण म्हणावे या निर्णयावर मी आता ठाम होत चाललोय. नाटक म्हटले की, माझ्या दृष्टीने अनेक विषय असे आहेत की, ज्यावर अद्याप अवाक्षरही लिहिले गेलेले नाही. तेव्हा या माध्यमातून नाटक या विषयासंबंधी “अनसीन थिएटर” असे काहीसेे लिखाण करावेसे वाटतेय. त्यासाठी महाराष्ट्राच्या खेडोपाडी वाहत असलेल्या लोककलेच्या नाट्यगंगेपासून ते शहरातील आधुनिक विचारधारेने प्रेरित असलेल्या नाट्यप्रवाहावर हे लिखाण असेल, फक्त त्याला कालानुक्रम नसेल. असो. तर नमनाला ओतलेले घडाभर तेल संपण्याच्या आत हा लेख संपवावा…!

आज कार्तिक शुद्ध द्वादशी. कोकणात तुळशीची लग्ने धुमधडाक्यात साजरी करतात. प्रत्येक घरी आणि देवळात तुळशी वृंदावनाला सजवून प्रथेप्रमाणे लग्नसोहळा पार पडतो आणि दशावतारी नाटककार आपल्या नाट्यप्रयोगांसाठी सिद्ध होतो. गेली कित्येक वर्षांची ही परंपरा आजतागायत अव्याहत सुरू आहे. साधारणतः शक्य झाल्यास देवळात लागणाऱ्या तुळशीच्या लग्नाप्रीत्यर्थ रात्री दशावतारी नाटकाचा खेळ ठरलेले मंडळ करते आणि त्या सीझनचा श्रीगणेशा होतो. पौष पौर्णिमेपर्यंत हे दशावतारी खेळ सुरू असतात. आमच्या लोकल भाषेत या दशावतारी खेळाला दहिकाला असेही म्हणतात. पहाटे कधीतरी जेव्हा हा खेळ संपायला येतो, तेव्हा प्रत्यक्ष नटांकरवी मंचावर बांधलेली हंडी कृष्णावताराने फोडली जाते. अशा अनेक रूढी, रिती व पद्धती या दशावतारी नाटकाच्या रूपाने जागृत होतात. पौष पौर्णिमेनंतर पावसाळा उजाडेपर्यंत होतात ते दहिकाले नव्हेत, तर दशावतारी नाटके. हा मूळ फरक दशावतारी नाटके आणि दहिकाल्यात आहे. एकेकाळी मुंबईत दिवाळीच्या हंगामात दशावतारी कलावंतांचे पेटारे कामगार भागात येऊन थडकत असत. एकीकडे कोकणातला दशावतार रंगत असे, तर दुसरीकडे घाटावरील तमाशा परळच्या सेंट झेवियर्स मैदानावर हलगी-ढोलकीच्या सलामीत सुरू असे. कापड गिरण्यांचा ऐतिहासिक संप झाला आणि मुंबईतला कष्टकरी रसिक, तमाशा आणि दशावतार या पारंपरिक लोकप्रिय लोककलांना जणू पारखा झाला. या लोककला प्रकारांच्या खेळांना शाळांची पटांगणे दिवाळीत प्राप्त होत असत आणि अगदी मध्यरात्रीपर्यंत खेळ सुरू असत. आता शाळांची पटांगणे मिळणे बंद झाले. रात्री दहापर्यंतच लाऊडस्पीकरची परवानगी असल्याने कलावंतांना आपले नऊवारीतले विस्तारीत खेळ घेऊन सहावारीतले झटपट रंजन करणे मुश्कील झाले हा काळाचा महिमा.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाप्रेमी नेते नारायण राणे, गुरुनाथ कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रांगोळी कलाकार गुणवंत मांजरेकर, राजा मयेकर, तुलसी बेहरे यांच्या पुढाकारातून दशावतारी महोत्सव साजरे व्हायचे. नंतर हे महोत्सव बंद झाले आणि मालवणी जत्रोत्सव, कोकण महोत्सव असे उत्सव दिवाळीच्या सुमारास मुंबईच्या उपनगरांमध्ये ठाणे, मुलुंड, भांडुपमध्ये सुरू झाले. त्यातून मालवणचे खाजे आणि मसालेदार बांगड्यांच्या तिरफळं घातलेल्या चवींसह कोकणवासीय दशावतारी खेळ पाहू लागले. कोकणच्या लोककला चळवळीला डॉ. तुलसी बेहरे, राजा मयेकर, मच्छिंद्र कांबळी आदींचे मोठे योगदान होते. बाळकृष्ण लिंगायत मुंबईत गोरेगाव परिसरात सातत्याने दशावतारी खेळ करत होते. नाईक मोचेमाडकर, पारसेकर, कलिंगण, वालावलकर, गोरे, चेंदवणकर, खानोलकर, आजगावकर, आरोलकर, मामा मोचेमाडकर ही पारंपरिक दशावताराची नऊ मंडळे. ही मंडळे मुंबईत दशावतारी खेळ करीत. आजही जर चांगले बजेट एखाद्या कपाळ-माथ्यावर उभा टिळा लावणाऱ्या नेत्याकडून अथवा मालवणी जत्रा भरवणाऱ्या संस्थेकडून मिळाल्यास ह्या पारंपरिक मंडळांचा खेळ पाहायला मिळू शकतो.

तुम्हाला नेटकचं नाटक आठवतंय ?

दशावतारी नाटकाबद्दल लिहायला गेले तर प्रचंड कटेंट यात सामावलेला आहे. आजपर्यंत या लोककला प्रकारावर मुंबई विद्यापीठातच तिघांचे संशोधनपर प्रबंध उपलब्ध आहेत. डाॅ. तुलसी बेहरे हे त्यापैकीच होत. रात्र चढू लागते. जत्रेसाठी जमलेला मंदिराचा परिसर आणखी फुलून जातो. पखवाज वाजू लागतो. हार्मोनियमचे स्वरसुद्धा टिपलेला पोहोचतात. तसतशी गर्दी आणखी वाढू लागते. इतर वेळी शांततेच्या पांघरुणात गुडुप झालेले गाव त्या रात्री मात्र मंदिराच्या प्रांगणात जमते. दरवर्षी एकदाच हे असे घडत असते. अख्खं गाव रात्र जागून काढते आणि पहाट झाल्यावर दशावतारातल्या प्रयोगामधल्या आख्यानविषयाची चर्चा करते. प्रयोगाचा समारोप होत असताना राम, कृष्ण किंवा त्या प्रयोगातल्या प्रमुख दैवताला मनोमन आठवत आपल्या आयुष्यातला दुर्दैवाचा दशावतार संपावा, असे साकडे घालत घरोघरी परतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी कार्तिकी एकादशीपासून पुढचे साडेतीन ते चार महिने वेगवेगळ्या गावांमध्ये हे असेच चित्र असते. त्याचे मुख्य कारण असते ते ग्रामदैवताचा वार्षिक जत्रोत्सव आणि त्यानिमित्ताने होणारे दशावतारी नाट्यप्रयोग. दशावतार ही एक पारंपरिक लोककला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामदैवतांच्या जत्रोत्सवाशी या लोककलेचे जवळचे नाते आहे. आठशे वर्षांपासून जत्रोत्सव आणि दशावताराची परंपरा असल्याचे सांगितले जाते.

मंडळाचा गणपतीचा पेटारा ही सर्वांत मोठी जमानत असते. हा गणपती नवसाला पावतो, अशी अनेक ग्रामस्थांची श्रद्धा असते. म्हणूनच नाट्यमंडळ गावात दाखल झाले आणि त्यांनी पेटारा आणला की, ग्रामस्थही त्या गणपतीची आवर्जून पूजा करतात. जत्रांमधल्या नाटकांमध्ये या गणपतीची आरती केली जात नाही. पण व्यावसायिक स्वरूपात करावयाच्या नाटकांची सुरुवात गणपतीच्या आरतीने केली जाते. पेटाऱ्यातील गणेशदर्शनाबरोबरच शस्त्रे, अस्त्रे दाखवायची पद्धतही पूर्वी होती. मध्यरात्रीनंतर सुरू झालेले हे नाटक सूर्योदयाच्या सुमाराला संपते. खलनायकाचा वध होतो. कृष्ण किंवा विष्णूसह कलाकार मंदिराला प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर दहिकाला केला जातो. दहीहंडी आधीच बांधलेली असते. ती मुख्य पात्राच्या हस्ते फोडली जाते. प्रसाद सर्वांना वाटला जातो आणि त्या दिवशीच – म्हणजे आदल्या रात्री सुरू झालेले नाटक संपते. साधारण अशीच पद्धत प्रत्येक गावात असते. पण हे त्या त्या मंदिरातल्या प्रथेनुसार होत असते. असे दशावतार हे काल-परवा झालेल्या तुळशी विवाहाबरोबर सुरू झालेत. कोकणातील लोककलाकार आपली कला घेऊन सज्ज झालेत, त्याना फक्त प्रोत्साहनाची गरज आहे, बाकी काहीही नाही दिले तरी चालेल…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -