पाचवा वेद
पब्लिक मेमरी ही खरोखरच शाॅर्ट असते. महिन्याभरापूर्वी घडून गेलेला एखादा इव्हेंट अथवा एखादे नाटक महिन्याभरानंतर आपण विसरलेले असतो. विद्यार्थ्यांना मात्र ही मुभा नाही. पूर्वी वर्षभरात शिकवलेला सारा अभ्यासक्रम परीक्षेसाठी तरी लक्षात ठेवणं भाग असायचं, पण आता सेमिस्टर सिस्टिम आली आणि वर्षभराचं लक्षात ठेवणं सहा महिन्यांवर आलं. कंपल्सरी पाठ करायला लागणारे पाढे गेले, कविता नामशेष झाल्या, देवघरातून पर्वचा, तर कधीच हद्दपार झाला. खरंतर पर्वचा म्हणजे काय? हे आपल्यापैकी काही वाचक नक्की गुगल करून पाहतील. त्यामुळे एकंदर पाठांतरीत स्मरणशक्ती आपल्या स्मृतीपटलावरून हळूहळू लोप पावत चाललीय. आम्हां नाटकवाल्यांमध्ये या पाठांतराला अनन्य साधारण महत्त्व आहे. नाटक हे “बाय हार्ट” केल्याशिवाय होऊच शकत नाही, म्हटल्यावर आजच्या उगवत्या पिढीतल्या ५० टक्के कलाकारांनी या माध्यमाच्या वाटेला न जाण्याचे ठरवलेलेच असते. म्हणजे नव्या पिढीत नाटक रुजत नाहीये म्हणून जी बोंब मारली जातेयं, त्याचा उगम आणि एक सबळ कारण पाठांतर आणि शाॅर्ट मेमरी यात सापडते. पल्लेदार संवादाची नाटकं आणि त्या नाटकातील स्वगतं सुद्धा लोप पावली आहेत. मध्यंतरी मराठीतील हाऊसफुल्लचे बोर्ड मिरवणाऱ्या एका नटाने चक्क पाठांतर कोण करेल ? या ‘कटकटी’पायी नाटक नाकारल्याचे कानावर आले होते. असे एक ना अनेक चुकीचे पायंडे पडत पडत मराठी रंगभूमी पुढे जाते आहे. मी मागील एका लेखामध्ये संहितांमधून वापरल्या जाणाऱ्या चित्रपटसंमत टर्मिनाॅलाॅजी नाटकातून वापरल्या जाऊ लागल्याबद्दल कडाडून विरोध केला होता.
हल्ली बऱ्याच लेखकांच्या संहितेत माँण्टाज हा शब्द येतो. काय असतो हा माँण्टाज? तो कुठे वापरावा लागतो? माँण्टाजचे संहितेच्या अानुषंगाने परीणाम स्वरूप वापर नैतिक आहे का ?… तर, हे सर्व प्रश्न गेले खड्ड्यात, एकांकिकेला बक्षीस मिळालं ना ? मग बाकी कशाचा विचारच करायचा नाही. पण एक गोष्ट मान्य करावीच लागेल की, एकंदर चित्रपट माध्यमाचा परिणाम जसा समाजमनावर होतो तसा तो नाटकांच्या संहितांवर सुद्धा झालाय. माँण्टाजेस सारखे अवाजवी सिनेप्रयोग आले. व्हिज्युअल्सना महत्त्व आले, संवादांची लांबी चित्रपटांच्या संवादांप्रमाणे कमी झाली; परंतु याने साध्य काय झाले? नाटक या माध्यमाला कॅमेरा, तर जोडला गेला नाही? शक्य असतं तर ते ही करायला मागे पुढे पाहिले नसते, या अज्ञानी आणि उतावळ्या आजच्या तरुण नाटककारांनी. माध्यमांतरावर अनेक विद्वानांचे ऐकून घेतील; पण शेवटी स्वतःला हवे तेच करून नाटकाची भाषा बिघडवायला सुरुवात झाली आहे. नाटकाच्या सादरीकरणाची एक भाषा असते, जी दिग्दर्शक वापरत असतो. आज अनेक नाटके रंगभूमीवर अशी अवतरली आहेत. ज्यात प्रत्येकाच्या सादरीकरणाची स्वतंत्र भाषा आहे…! म्हणजे नट मंडळी एखादे नाटक असेच सादर व्हायला हवे, असे स्वतःच ठरवून तसा प्रयत्न सुरू करतात, दिग्दर्शक स्वतःची भाषा बोलू लागतो. संगीत स्वतःची भाषा बोलते आणि उरल्या सुरल्या बाकी तांत्रिक बाबी स्वतःची भाषा बोलत असतात. इथे भाषा म्हणजे स्टाईल किंवा पद्धती ही संज्ञा अभिप्रेत आहे, हे लक्षात घ्यावे. या सर्व भेसळीमुळे “आमचे नाटक थोडे सिनेमॅटीक आहे” अशी पुस्ती नाट्यसूत्रांद्वारे ऐकू येऊ लागली आहे. हे सर्व आठवण्याचे कारण काय, तर तुम्हाला मोगरा नामक ऑनलाईन नाट्यप्रयोग आठवतो? कोविड काळात मराठी नाट्यकर्मींनी एकत्र न येता एकत्र येऊन केलेला नाट्यप्रयोग विसरलात? सुरुवातीलाच म्हटलं नव्हतं की पब्लिक मेमरी ही नेहमीच शाॅर्ट असते म्हणून …!
कोविड काळात नाटक जगावे म्हणून केलेला “नेटकं” नावाचा तो आगळा वेगळा प्रयोग होता म्हणे. आता कुठाय ते नेटकं ? संपलं, आटलं, विरघळलं, लोप पावलं ..काय झालं काय त्या नेटकचं ? पाच स्त्री कथांच पाच नामवंत नट्यांनी, हृषिकेश जोशी दिग्दर्शित प्रत्येकीने आपापल्या घरुन मोबाईल किंवा हायएण्ड कॅमेऱ्यावरून सलग असा तो एकपात्री नाट्यप्रवेशास तद्दन प्रेक्षकांना फसवून केलेला तो ऑनलाईन “प्रयोग” होता. या मोगरा नामक नेटकचे म्हणे २२/२३ प्रयोग झाले. म्हणजे लोकांनी ऑनलाईन तिकिटांचे पैसे भरून असले थुकरट प्रयोग पाहिले असतील, का काही प्रेक्षक वेबसिरीज आणि चित्रपटांकडे वळणार? बरं हे फक्त आणि फक्त मराठीतच घडलं. हिंदी, गुजराती प्रेक्षक जे दिसेल त्यावर कोविड काळात समाधान मानत होते. पण आपल्या आरंभशूर मराठी नाट्यकर्मींनी कोविडकाळ संपताच, नेटकंवर पडदा टाकला. त्यावेळी मी आणि माझ्यासारखे अनेक ब्लाॅगर्स परोपरीने सांगत होतो की ही नाटकाची भाषा नाही, नाटकाच्या नावाखाली माध्यमांतर होतंय. तुम्ही दुसरं तिसरं काही नाही, चित्रिकरणरूपात नाटक सादर करताय, ज्याला नाटकाच्या थिएटरचा फिल येणे शक्य नाही. कारण नाटक या माध्यमाची जादूच निराळी आहे. त्यात बाकीच्या माध्यमांची टर्मिनाॅलाॅजी घुसडू नका. रतन थिय्याम सारखा नाट्यमहर्षी आयुष्यभर हेच सांगत राहिला. याच कोविड काळात जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इकोल माॅडियाल या शाळेतल्या मुलांना मी आणि प्रमोद शेलारने लोककला सादरीकरणातून शिकवण्याचा प्रयत्न केला. अनेक क्लासेस घेतले, भरपूर पैसेही मिळाले; परंतु ऑनलाईन नाट्यकला किंवा नाटक करता येते असे जे म्हणतात, ते प्रथम स्वतःला फसवतात आणि नंतर जगाला. नेटकंच्या वेळी “हेच ते पुढील पिढीचे नाटक, हेच प्रयोग सर्वांगीण नाटकांचा विकास घडवतील” म्हणून जी बोंब मारली गेली, ती विरली ? उगाच कुठल्याच माध्यमाचा विचार न करता ऑनलाईन नाटकांचा केलेल्या प्रयोगामुळे उदयास येणाऱ्या नव नाट्यकर्मींवर नाटकाच्या संरचनेबाबत अत्यंत घातक संस्कार या अर्धवट नेटककारांनी केलेत, ज्याला कधीही नव्हता, शेंडा वा बुडखा. बिघडलेल्या मराठी नाटकांचे खरे दोषी तेच आहेत, जे आम्ही नाटक पुढे नेत असल्याचा अविर्भाव आणून नाट्यकर्मींची दिशाभूल करत आहेत.