आता आला हिवाळा तब्बेत थोडी सांभाळा! दिवाळीनंतर सर्वत्र हळूहळू थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिना सुरू होताच वातावरणात थोडा बदल झाला असून हलकी थंडी जाणवू लागली आहे. थंड गार वाटू लागल्यानंतर आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. हिवाळ्यात थंडीच्या सुरुवातीस आजारी पडणे सामान्य आहे, मात्र प्रत्यक्षात थंड हवामान आपल्याला आजारी बनवत नाही. थंडीच्या दिवसात आपल्या शरीराचे तापमान कमी होते आणि शरीर नवीन ऋतूशी जुळवून घेते. कधी-कधी या वातावरणाच्या बदलामुळे हिवाळ्यातील अनेक आजारही येऊ शकतात. थंडी वाढल्यानंतर सगळीकडे साथीच्या आजारांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो. थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला यांसारख्या साथीचे आजार वाढू लागतात. त्यामुळे या दिवसांमध्ये बाहेरचे पदार्थ टाळा आणि घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील आणि थंडीचा आनंदसुद्धा लुटता येईल. पण त्याआधी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, थंडीच्या दिवसांमध्ये सारखं आजारी पडत असाल तर आरोग्याची घरगुती उपाय करून कशी काळजी घ्यावी, चला तर मग जाणून घेऊया.
‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी:
व्यायाम करा
थंडीच्या दिवसात निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली करणं खूप गरजेचं आहे. त्यामुले तुम्ही व्यायाम, योगासने, धावणे, चालणे किंवा मेडिटेशन करून तुमचे शरीर उबदार ठेवू शकता आणि थंडीत आरोग्य सुद्धा चांगलं राहील.
पौष्टीक आहार घ्या
शरीराला कोणत्याही ऋतूमध्ये पौष्टिक आहाराची गरज असते. हिवाळ्यात जॉर्जच्या आहारामध्ये तुम्ही कडधान्य, कोंबडी, शेंगा, सुका मेवा, बियाणे, मासे, औषधी मसाले, ताजी फळे, वनस्पती, आणि भाज्या यांचा समावेश केला की रोगप्रतिकारशक्ती निर्माण करता येते आणि शरीराला अनेक फायदे होतात.
पुरेसं पाणी प्या
हिवाळ्यात तहान खूप लागते. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन देऊ नका. आपल्या शरीरातील पाणी कमी झाल्यास अशक्तपणा , चक्कर येणे थकवा, आणि अनेक समस्या उद्भवायला चालू होतील. त्यामुळे शरीराला पुरेसं पाण्याचं सेवन नियमित करावं. शरीराला पाणी हायड्रेट ठेवण्याचे काम करते. जितकं पाण्याचे सेवन कराल तितके शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होईल. ज्यामुळे आरोग्य बिघडणार नाही.
मॉइश्चरायझर
हिवाळ्यात अनेकांना त्वचेच्या समस्या उद्भवतात. थंडीमुळे त्वचेचे नुकसान होते, जस की त्वचा कोरडी पडणे, ओठांवर भेगा पडणे, आणि पायांच्या टाचांना भेगा पडतात. कोरडी पडलेली त्वचा पुन्हा मऊ करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. नियमित मॉइश्चरायझरचा वापर केल्यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहील आणि कोरडी त्वचा जाणवणार नाही.