मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
पालघर आणि बोईसरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतल्या प्रचार सभा
विरोधकांच्या सत्तेचा दरवाजा राज्यातील लाडक्या बहिणींनी बंद केला
पालघर/बोईसर : पालघर जिल्ह्यात ७६००० कोटींची गुंतवणूक असणारे वाढवण बंदराचे काम सुरु झाले आहे. याशिवाय सी लिंकचा विस्तार पालघर डहाणूपर्यंत करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. वाढवण बंदराबरोबरच येथे सरकारने विमानतळ करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे पालघर जिल्ह्यात विकासाची गंगा येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी व्यक्त केला. पालघरचे उमेदवार राजेंद्र गावित आणि बोईसरचे उमेदवार विलास तरे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की पालघरचा विकास हाच ध्यास घेऊन सरकार काम करत आहे. या राज्यात विकासाचे विकेंद्रीकरण करणार असून राज्यात कुठूनही पोहोचण्यासाठी सहा तांसावर वेळ लागणार नाही असा अँक्सिस कंट्रोल ग्रीड तयार केला जात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. वर्सोवा ते विरार, विरार ते पालघर आणि पालघर ते डहाणू हा एक्सप्रेस सी लिंक तयार होणार आहे. त्यामुळे इथल्या जनतेला कमीवेळत मुंबईत पोहोचता येईल. त्याशिवाय ‘एमएमआरडीए’चा पालघरपर्यंत विस्तार केलाय. पालघरमध्ये नवीन विमानतळ उभारतोय. मोठ्या प्रकल्पांमुळे पालघर एक ग्रोथ सेंटर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की वाढवण बंदरात केंद्र सरकारने ७६००० कोटींची गुंतवणूक केली आहे. इथल्या मच्छिमारांना त्याचा फायदा होईल. राज्य सरकार मच्छिमार समाज बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विरोधकांनी कितीही टीका केली तरी जनता सोबत असल्याने आपल्या केसालाही धक्का लागणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.
महायुतीचे उमदेवार राजेंद्र गावित हे प्रचंड मतांनी विजयी होतील, असे ते म्हणाले. राज्यात केंद्र आणि राज्य मिळून डबल इंजिन सरकार काम करत आहे. सरकारने लोक कल्याणच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. लाडक्या बहिणीच्या खात्यात नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबर मध्ये दिले. यामुळे विरोधकांची बोलती बंद झाली. आता मतदान झाले की लगेच डिसेंबरचे पैसे देणार असे त्यांनी सांगितले. लाडक्या बहिणीला केवळ १५०० रुपयांपर्यंत थांबवणार नाही तर त्यात आणखी वाढ करु असे शिंदे म्हणाले. अडीच वर्षात महाविकास आघाडीने जनतेला काही दिले नाही. आता महायुतीच्या योजनांची चौकशी करुन जेलमध्ये टाकायची भाषा करताय. राज्यातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी यांच्यासाठी एकदा काय शंभरदा जेलमध्ये जायला तयार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले. हलक्यात घेतले म्हणून दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक या राज्यामध्ये निवडणुकीत काँग्रेसने खोटी आश्वासने दिली आणि मते मिळवली. सत्ता आल्यावर काँग्रेसने लोकांची फसवणूक केली. योजनेसाठी पैसे नाहीत असे बोलून केंद्राकडे हात पसरले, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. शासन आपल्या दारी उपक्रमात ५ कोटी नागरिकांनी लाभ घेतला. त्यापूर्वी महाविकास आघाडीने अडीच वर्ष प्रकल्पांमध्ये खोडा घातला. समृद्धी एक्सप्रेस, जलयुक्त शिवार योजनेत खोडा घातला होता. मात्र मागील दोन वर्षात सरकारने सर्व स्पीडब्रेकर काढून टाकले, असे ते म्हणाले.
बोईसर येथे महायुतीचे उमेदवार विलास तरे यांच्यासाठी मुख्यमंत्री यांनी प्रचार सभा घेतली. ते म्हणाले की विलास तरे हा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे. त्याला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. २०१९ ला संतोष जनाठे हे विलास तरे यांच्या विरोधात उभे होते, आता ते सोबत आहेत त्यामुळे विलास तरे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
महायुती सरकारने लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्याचा निर्णय घेतलाय, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वर्षाला १५००० रुपये, वृद्धांचे पेन्शन २१०० रुपयांपर्यंत वाढवणार, प्रत्येकाला अन्न आणि निवारा देणार, २५ लाख रोजगार आणि १० लाख तरुणांना १० हजार रुपयांना दरमहा प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री (CM Shinde) म्हणाले.