राही भिडे – ज्येष्ठ पत्रकार
अलीकडे दिवाळी साजरीकरण हा प्रदूषणाचा समानार्थी शब्द बनला आहे. लोक साक्षर झाले; परंतु सांस्कृतिकदृष्ट्या सजग झाले नाहीत. हल्ली दिवाळीत फटाक्याच्या वापरावर बंदी घालण्यात येते; परंतु या बंदीचा फारसा परिणाम होत नाही. दिवाळीप्रसंगी वाढणारे प्रदूषण कमी करण्याचे मार्ग शोधा आणि सण जबाबदारीने साजरा करा, हे आवाहन कागदावर राहते. हे वर्षही त्याला अपवाद ठरले नाही. त्यानिमित्ताने घेतलेला वेध. दिवाळी किंवा दीपोत्सव हा भारतातील सर्वाधिक साजरा केला जाणारा सण आहे. दिव्यांचा सण म्हणून ओळखली जाणारी दिवाळी अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. दिवाळी हा आनंद वाटण्याचा सण आहे; परंतु अलीकडच्या काळात आनंद वाटण्याऐवजी इतरांना दुःख देण्याची विकृती वाढत आहे. इतरांच्या जीवनातला अंधकार दूर करून प्रकाश पसरवण्याचे काम करण्याऐवजी आपला आनंद साजरा करताना इतरांच्या जीवनात अंधकार निर्माण केला जात आहे. अलीकडच्या वर्षांमध्ये, फटाक्यांच्या मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे दिवाळी साजरीकरण हा प्रदूषणाचा समानार्थी शब्द बनला आहे. आपल्या देशात लोक साक्षर झाले; परंतु सांस्कृतिकदृष्ट्या सजग झाले नाहीत. संस्कृतीचा वेगळा अर्थ काढला जात आहे. दिवाळी जवळ येताच फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यात येते; परंतु या बंदीचा फारसा परिणाम होत नाही असे लक्षात आले आहे. दिवाळीच्या निमित्ताने प्रदूषणाच्या पातळीत होणारी वाढ कमी करण्याचे मार्ग शोधा आणि अधिक जबाबदारीने दिवाळी साजरा करा, हे आवाहन कागदावरच राहते. दिवाळीची परंपरा आणि महत्त्व मूळ हिंदू पौराणिक – आध्यात्मिक कथांमध्ये आहे. हा सण प्रभू रामाशी संबंधित आहे. रावणाचा केलेला वध आणि १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्यानंतर, लोकांनी आनंद साजरा करण्यासाठी रामाच्या सन्मानार्थ दसऱ्याला तेलाचे दिवे लावले. कालांतराने हा सण देवी लक्ष्मीशीही जोडला गेला, जो धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
दिवाळीच्या परंपरा वेगवेगळ्या प्रदेशात बदलतात; परंतु सामान्यत: दिवे आणि रांगोळीसह घरांची स्वच्छता आणि धार्मिक विधी यांचा समावेश होतो. मित्र आणि कुटुंबीयांमध्ये मिठाई आणि भेटवस्तू वाटणे हा अलीकडच्या काळातील प्रघात आहे. दिवाळी ही भारतात रामाच्या कथेशी संबंधित आहे, तर दक्षिण भारतात ती कृष्ण आणि सत्यभामा यांच्या विजय कथेशी संबंधित आहे. नरकासुराचा वध करून श्रीकृष्ण सत्यभामेसोबत परतले, तेव्हा लोकांनी दिवे लावले होते, अशी कथा आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण भारतात दिवाळी एकमेकांच्या एक दिवस पुढे साजरी होते. अलीकडच्या काळात दिवाळी साजरी झाल्यानंतर प्रदूषणाच्या पातळीत वाढ झालेली दिसते. शहरी भागात, फटाके वाजवणे हा अनेकांच्या दिवाळी साजरीकरणाचा अविभाज्य भाग बनला आहे. फटाके पीएम २.५ या घटकांसह लक्षणीय प्रमाणात वायू प्रदूषक सोडतात. त्याचे प्रमाण पीएम १० पर्यंत जाते. त्यात कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साईड्स आणि इतर विषारी पदार्थांचा समावेश असतो. त्यामुळे दिल्ली, मुंबई आणि कोलकत्तासारख्या शहरांची वायूची गुणवत्ता कमी होते.
दिवाळीच्या काळात फटाक्यांचे अवशेष, प्लास्टिकचे रॅपर आणि इतर प्रकारचा प्रचंड कचरा रस्त्यावर पडलेला असतो. हा कचरा कुरूप तर दिसतोच; पण त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. फटाक्यांमध्ये कॅडमियम, शिसे आणि पारा आदी जड धातू असतात. ते जमिनीत मिसळतात आणि शेती तसेच भूजल गुणवत्तेला धोका निर्माण करतात. दैनंदिन जीवनात मानवाकडून होणारी पर्यावरणाची हानी सर्वांनाच माहीत आहे. जमिनी नापीक होत चालल्या आहेत, महानगरांची हवा आता श्वास घेण्यास योग्य राहिलेली नाही. भाजीपाला, फळांपासून दुधापर्यंत विषारी रसायने पोहोचली आहेत. हवामानावरील पॅरिस करारावर अद्याप राष्ट्रीय पातळीवर काम सुरू झालेले नाही. प्रत्येक ऋतूचे चक्र घसरत आहे. हे पाहता आपण कोणताही सण साजरा करताना पर्यावरणाचे भान आवर्जून राखले पाहिजे. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या चिंतेमुळे अनेक राज्य सरकारांनी दिवाळीदरम्यान फटाक्यांच्या वापरावर मर्यादा घालण्यासाठी किंवा त्यावर बंदी घालण्यासाठी उपाय लागू केले होते. सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्री आणि फोडण्याबाबत निर्देश दिले होते. ‘ग्रीन फटाके’ वापरास प्रोत्साहन दिले गेले आहे. या नियमांची अंमलबजावणी करणे आव्हानात्मक आहे. कारण लोक पारंपरिक फटाके वापरतात. समाजप्रबोधनाशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, कारण राजकारण किंवा प्रशासन नियम बनवून शिस्त आणू शकतात; पण समाजाने निर्धार केला, तरच त्याचा वापर रोखता येईल.
या दिवाळीमध्ये दिल्लीमध्ये फटाके फोडण्याच्या अनेक वर्षांच्या आकडेवारीला तडा गेला, कारण जनतेने फटाक्यांवर बंदी पूर्णपणे स्वीकारली नाही. दिवाळी वगळता इतर दिवसांप्रमाणेच हवाही विषारी आहे. त्यामुळे जनतेच्या मनाची तयारी करूनच हे काम होऊ शकते. लोकांना जागरूक करणे हाच त्यावरील उपाय आहे. याशिवाय पर्यावरण संस्था आणि माध्यमांनी चालवल्या जाणाऱ्या जनजागृती मोहिमांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. होळी किंवा दिवाळीला वेळोवेळी अशा मोहिमा राबवून लोकांना पर्यावरण रक्षणाशी जोडले जाते; परंतु लोक या मोहिमेशी तेवढ्यापुरतेच जोडले जातात. दिवाळी हा लाखो लोकांच्या जीवनात प्रकाश, आनंद आणि आशा आणणारा सण आहे तथापि त्याच्याशी संबंधित प्रदूषण हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. शहरी भारतात अशाप्रकारे योग्य मानसिकतेने दिवाळी साजरी करणे शक्य आहे. यामुळे पर्यावरण रक्षण आणि उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व राखणे हे दोन्ही उद्देश साध्य होतील. फटाके टाळून, पर्यावरणपूरक सजावट निवडून आणि शाश्वत पद्धतींवर लक्ष केंद्रित करून दिवाळी खऱ्या अर्थाने आनंददायी आणि प्रदूषणमुक्त साजरी करण्यात लोक आपली भूमिका बजावू शकतात. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वेळी दिवाळीत बंदी असतानाही दिल्लीतील लोकांनी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली.
एका अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळीमध्ये दिल्लीतील आवाजाच्या पातळीत वाढ झाली आहे. संध्याकाळी ६ ते मध्यरात्रीदरम्यान डेसिबलमध्ये मोजण्यात आलेल्या रीडिंगवरून दिसून आले की, करोलबाग येथील आवाजाची पातळी सरासरी ८८.७ डेसिबल होती. २०२३ मध्ये आवाजाची पातळी ८४.५ डेसिबल होती. औद्योगिक भागातही मिश्र पातळी नोंदवली गेली. वजीरपूरमध्ये आवाजाच्या पातळीमध्ये तीन टक्के वाढ झाली, तर नरेलामध्ये १.६ टक्क्यांनी घट झाली. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने सलग पाचव्या वर्षी फटाक्यांची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि वापरावर बंदी घातली होती. तरीही दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. फटाक्यांमुळे हवा प्रदूषित होते. दिल्ली-एनसीआरमध्ये सध्या हवेची गुणवत्ता खूपच खराब आहे आणि प्रदूषणामुळे श्वसनाच्या समस्या वाढत आहेत. आरोग्यतज्ज्ञ मॉर्निंग वॉक टाळण्याचा सल्ला देत आहेत. हवा प्रदूषित होते, तेव्हा श्वास घेणे कठीण होते. त्याचवेळी आधीच श्वसनाचा त्रास असणाऱ्यांनी स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. सकाळ-संध्याकाळ वायू प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या काळात जास्तीत जास्त वेळ घरात राहण्याचा सल्ला दिला जातो.
श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आणि प्राणायाम श्वसनसंस्था मजबूत करतात. मोकळ्या हवेत योगासने किंवा इतर कोणताही व्यायाम करू नये, असे आवाहन केले जाते. हवेतील प्रदूषणामुळे श्वसनाच्या समस्या वाढू शकतात. आहारात फळे, भाज्या आणि नट यांसारख्या अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश केल्यामुळे वायू प्रदूषणामुळे होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होण्यास आणि श्वसनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. अर्थात या वरवरच्या उपाययोजना झाल्या; परंतु एखादा आजार मुळापासून दूर करायचा असेल, तर त्यावर उपायही तेवढाच जालीम असायला लागतो. जादा प्रदूषण करणाऱ्या, जादा आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या निर्मितीवर बंदी घातली, तरच ते फोडले जाणार नाहीत. सरकार नेमके तिथेच कच खाते. कायदेशीर कारवाई आणि प्रबोधन या दोन मार्गांनी एकाच वेळी प्रयत्न केले, तरच प्रदूषणाला आळा घालता येईल. शिवाय कोणत्याही गोष्टीवर बंदी घालायची म्हटले की, आमच्या सणाच्या वेळीच हे सुचते का, इतर धर्मियांच्या सणांप्रसंगी हे का सुचत नाही, असे प्रश्न उपस्थित होतात. मात्र हवा प्रदूषित झाली की, होणारा त्रास धर्म, जात, पंथ अशी विभागणी करत नाही. नुकत्याच सरलेल्या दिवाळीच्या निमित्ताने एवढा संदेश घेतला, तरी पुष्कळ झाले.