छत्तीसगड : फोनवरून झालेल्या भांडणात रेल्वे कर्मचारी आणि त्याची पत्नी यांच्यात ‘OK’ म्हणण्यावरून झालेल्या गैरसमजामुळे रेल्वे नक्षलग्रस्त भागात गेली आणि रेल्वे विभागाचे तब्बल ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले. याबाबत रेल्वे विभागाने पतीवर कारवाई केली असता पतीने थेट न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. तो अर्ज कौटुंबिक न्यायालयाने फेटाळला. मात्र छत्तीसगड उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर पतीचा अर्ज स्वीकारला आहे.
पतीने केला घटस्फोटासाठी अर्ज
उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणमचे रहिवासी गोरा पल्लई वेंकटगिरी आणि दुर्ग जिल्ह्यातील रहिवासी येरनाकुला मीरा यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर छत्तीसगड उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रजनी दुबे आणि न्यायमूर्ती संजय कुमार जयस्वाल यांच्या दुहेरी खंडपीठाने हा निर्णय स्वीकारला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दुर्ग कौटुंबिक न्यायालयाने पती व्यंकटगिरीचा घटस्फोट अर्ज फेटाळला होता, त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
लग्न झाल्यापासून बायको सुखी नव्हती
उच्च न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम येथील रहिवासी व्यंकटगिरी आणि दुर्ग जिल्ह्यातील मीरा यांचा विवाह १२ ऑक्टोबर २०११ रोजी दुर्ग जिल्ह्यात पार पडला. व्यंकटगिरी हे विशाखापट्टणममध्ये रेल्वेत काम करत होते आणि मीराचे वडीलही रेल्वे विभागातच कार्यरत होते. वेंकटगिरी यांनी म्हटले आहे की, लग्नानंतर विशाखापट्टणममध्ये रिसेप्शन झाले तेव्हा त्यांची पत्नी मीरा खूश नव्हती. नंतर या संदर्भात पत्नीकडे विचारपूस केली असता, पत्नीने सांगितले की, लग्नापूर्वी तिचे एका पुरुषाशी प्रेमसंबंध होते, ज्याला ती विसरू शकत नाही.
व्यंकटगिरीच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर त्यांनी मीराच्या वडिलांना ही माहिती दिली. मीराला तिच्या पतीने तिच्या वडिलांना सदर अनैतिक संबंधांबाबबत कळवल्याची माहिती मिळताच तिने व्यंकटगिरीला धमक्या देण्यास सुरुवात केली. तसेच मी त्याच्याशी संबंध ठेवणारच असे म्हणत तिचे प्रियकराशी बोलणे सुरूच राहिल्याने घरात आणखी कलह वाढला.
पत्नीला OK म्हटले पण स्टेशन मास्तरांनी दिला रेल्वेला ग्रीन सिग्नल
व्यंकटगिरी यांनी कोर्टात सांगितले की, २२ मार्च २०१२ रोजी ते ड्युटीवर असताना त्यांची पत्नी फोनवरून त्यांच्याशी भांडू लागली. यावेळी ते कमलूर येथील स्टेशन मास्तर यांच्याशीही ट्रेन पुढे पाठवावी का या कामासंदर्भात दुसऱ्या फोनवर बोलत होते. मोबाईलवर बोलत असताना पत्नीचे भांडण सुरू झाले, तेव्हा त्याने घरी येऊन तिच्याशी बोलू असे सांगितले आणि पत्नीला ‘OK OK’ असे सांगितले. पण ते OK OK ऐकून कमलूरच्या स्टेशन मास्तरांनी ट्रेनला ग्रीन सिग्नल दिला आणि ट्रेन नक्षल प्रभावित क्षेत्रातील नक्षलवाद्यांकडे गेली. या भागात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत गाड्यांची वाहतूक बंदी असते.
पत्नीने केला हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप
व्यंकटगिरी यांच्या म्हणण्यानुसार, या चुकीमुळे रेल्वे विभागाचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून विभागाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. व्यंकटगिरी यांनी कोर्टात सांगितले की, यानंतरही पत्नी त्यांच्याशी भांडत राहिली आणि तिच्या वडिलांनी त्यांना गुंडांकडून मारहाण केली. त्यांच्या कार्यालयात त्यांच्याशी भांडणही झाले. त्यानंतर अत्यंत चपळाई करत काही वेळाने पत्नी मीरा दुर्ग जिल्ह्यात वडिलांकडे गेली. व्यंकटगिरीच्या म्हणण्यानुसार, १३ मार्च २०१३ रोजी मीराने तिचा पती आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
पत्नीने केले अत्यंत घृणास्पद आरोप
मीराने न्यायालयात सांगितले की, तिच्या पतीने तिचे अश्लील फोटो काढले आणि हुंड्यासाठी तिचा छळ केला. मीराने असेही सांगितले की, तिच्या पतीचे त्याच्या वहिणीसोबत अवैध संबंध होते. त्यामुळे पतीने घटस्फोटासाठी दबाव टाकून कट रचला. हुंडा मागणे, मारहाण करणे, घरातून हाकलून देणे इत्यादी छळामुळे तिने पोलिसात गुन्हा दाखल केल्याचेही मीराने न्यायालयाला सांगितले. त्यामुळे तिच्या पतीला आणि कुटुंबीयांना अटक करण्यात आली.
उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने आपल्याशी क्रूर वर्तन केल्याचे पती सिद्ध करू शकत नसल्याच्या सुनावणीनंतर कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय दिला होता. या निर्णयाला नंतर पती व्यंकटगिरी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, पतीवरील हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाला पुष्टी मिळालेली नाही. तसेच पत्नीने पतीवर त्यांच्या वहिणीसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप केला आहे, मात्र या संदर्भात ती कोणतेही पुरावे सादर करू शकली नाही. हे अत्यंत घृणास्पद आहे.
व्यंकटगिरीच्या आईचे निधन झाले होते आणि लग्नाच्या वेळी त्यांच्या आईच्या अनुपस्थितीत, त्यांच्या भावाने आणि वहिणीने हा सोहळा पार पाडला.
न्यायालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती रजनी दुबे आणि न्यायमूर्ती संजय कुमार जयस्वाल यांच्या दुहेरी खंडपीठाने सुनावणीनंतर पतीची घटस्फोटाची याचिका स्वीकारली. क्रूरतेच्या आधारावर पती घटस्फोट घेण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.