श्रीनिवास बेलसरे
जगात सर्वात जास्त चित्रपट भारतात तयार होतात. त्यात हिंदीची संख्या खूप मोठी असली तरी हिंदीचीच एक बोली असलेल्या भोजपुरी चित्रपटांची संख्याही लक्षणीय आहे. केवळ, बिहार, उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या काही भागांत बोलल्या जाणाऱ्या भोजपुरीत दरवर्षी जवळजवळ १०० चित्रपट तयार होतात. त्यांची सुरुवात झाली ती १९६० साली नौशादजींनी केलेल्या एका भविष्यवाणीने. दिलीपकुमार आणि वैजयंतीमालाच्या ‘गंगा जमुना’चे चित्रीकरण सुरू होते. बहुतांश दिग्दर्शन दिलीपकुमारनेच केले असले तरी दिग्दर्शकाच्या जागी नितीन बोस यांचे नाव टाकले होते. गंगा-जमुनाचे संवाद आणि दिलीपकुमारचा प्रभावी अभिनय बघून नौशाद म्हणाले की, “या चित्रपटापासून हिंदीत भोजपुरी सिनेमांचा दौर सुरू होईल.” त्यापूर्वी भोजपुरी भाषेत एकही चित्रपट आलेला नव्हता. पहिला भोजपुरी सिनेमा आला १९६३ साली – “गंगा मैया तोहे पियरी चढ़इबो.” त्याचे निर्माते होते विश्वनाथ शाहाबादी. भोजपुरीमधला अलीकडचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता ‘ससुरा बड़ा पैसावाला’ (२००३). त्यात भाजपाचे नेते मनोज तिवारी प्रमुख भूमिकेत होते. आज भोजपुरी चित्रपट उद्योग तब्बल २००० कोटी रुपयांचा झालेला आहे.
तशी गंगा-जमुनाच्या संवादाची भाषा बदलण्याची सूचना संगीतकार नौशादजींची होती. कोणत्याही भाषेपेक्षा तिच्या बोलीचा गोडवा अधिक असतो. प्रमाणभाषा अर्थाचे अधिकाधिक काटेकोर वहन करण्याचा प्रयत्न करते, तर बोलीभाषा एखाद्या लेकुरवाळ्या सुवासिनीप्रमाणे असते. ती मूळ आशयाला बिलगलेली त्याच्या विविध छटांची लेकरे अंगावर घेऊन वावरत असते. ‘गंगा-जमुना’साठी दिलीपकुमार ‘पुरबीया’ ही हिंदीची बोलीभाषाही शिकले. गोड बोलीतले संवाद आणि दिलीपकुमारचा बावनकशी अभिनय यामुळे आपण सिनेमा पाहत आहोत हे विसरून उत्तरेतील एका खेड्यात तिथल्या ग्रामस्थांच्या सहवासात बसलो आहोत असेच वाटू लागते. विशीतली लाजरीबुजरी वैजयंतीमाला इतकी लोभस दिसते की, तिच्या चेहऱ्यावरून नजर हटत नाही. कथा साधीसरळ होती. गंगा (दिलीपकुमार) गावातील जमीनदाराच्या घरी आईसोबत नोकरीला आहे. तो धन्नोच्या (वैजयंतीमाला) प्रेमात पडला आहे. त्याचा भाऊ जमुना (नासीर खान, जो दिलीपकुमारचा खऱ्या जीवनातीलही भाऊ होता), हुशार असून शाळेत मनापासून शिकतो आहे. एकदा गंगावर चोरीचा आळ येतो आणि घरातच चोरीचे दागिने सापडल्याने आईला मानसिक धक्का बसून तिचा मृत्यू होतो. गंगावर झालेल्या खोट्या आरोपामुळे तो धन्नोला घेऊन डोंगरात पळून जातो आणि डाकूंच्या एका टोळीत सामील होतो. पुढे अनेक घटना घडून त्याला अटक होते. डाकू त्याला चौकीवर हल्ला करून सोडवतात. त्यावेळच्या झटापटीत धन्नोला गोळी लागून तिचा मृत्यू होतो. संतापलेला गंगा त्याच्या जीवनाची वाताहत करणाऱ्या सावकाराला ठार करतो. पळून जाताना तोही पोलीस अधिकारी बननेल्या धाकट्या भावाच्या गोळीला बळी पडतो. अशी ही शोकांतिका. त्याकाळी देशात गंगा-जमुनी तहजीब कशी खरोखर अस्तित्वात होती. त्याचा एक पुरावा म्हणजे सिनेमाचे बहुतेक दिग्दर्शन खुद्द युसूफ खान यांनी स्वत:चं केले होते, तर संवादलेखन होते वजाहत मिर्झा यांचे. दोघांनी शेवटी मरणाऱ्या गंगाच्या तोंडात भाऊ गंगाजल टाकतो असे दृश्य टाकले. इतकेच नाही, तर जखमी दिलीप जाणार हे कळताच तिथे जमलेल्या अनेक व्यक्ती भगवद्गीतेतील ‘वांसासी जीर्णानि यथा विहाय’ हा श्लोक म्हणू लागतात. दिलीप शेवटचा श्वास घेऊन प्राण सोडतो तेव्हाही त्याच्या तोंडी मिर्झाजींनी दिलेला शेवटचा संवाद होता ‘हे राम.’ कलाकार परस्परांच्या संस्कृतीशी किती समरस असत तेच यावरून दिसते.
शायर-ए-आझम शकील बदायुनी यांनीही गाणी मुद्दाम लोकभाषेत लिहिली. ती लोकप्रियही झाली – ‘ढूंडो, ढूंडो रे साजना ढूंडो, मोरे कानका बाला’, ‘दगाबाज तोरी बतिया ना मानू रे’ ‘दो हंसोका जोडा बिछड गयो रे’, ‘इन्साफकी डगरपे बच्चो दिखाओ चलके’ अशी एकापेक्षा एक गाणी. एका गाण्यात दिलीप कुमार सुंदर नाचला होता. नौशाद साहेबांच्या संगीत दिग्दर्शनात, महंमद रफींनी तबियतमध्ये गायलेल्या त्या गोड गाण्याचे शब्द होते – ‘नैन लड गयी हैं तो मनवा मा कसक हुईबे करी.’गाणे सुरू होण्यापूर्वी दिलीपच्या तोंडी दोन ओळी आहेत. त्या वैजयंतीमालाच्या प्रेमातली त्याची प्रेमवेडी अवस्था स्पष्ट करतात. तो म्हणतो, ‘माझ्या सुंदर प्रियेशी प्रेम असे जुळले की, मी वेडाच झालो, माझे कामातले लक्ष पूर्ण उडून मी आता बेकार झालो आहे!’
‘लागा गोरी गुजरियासे नेहा हमार,
होइगवा सारा चौपट मोरा रोजगार.’
त्याकाळचे प्रेम नुसत्या नजरानजरेतही सुरू होत असे. तो म्हणतो, ‘तिच्याशी नजरानजर झाली आणि मनात घालमेलच सुरू झाली. जणू आम्हा दोघांत प्रेमाचा फटाकाच फुटला आणि धमाका झाला! ‘नैन लड़ गैहे तो मनवा मा कसक होइबे करी, प्रेमका छुटिहैं पटाखा तो धमक होइबे करी, नैन लड़ गैंहे…’मी मतात तिचे रूप साठवून घ्यायचा प्रयत्न केला, तर त्यात वाईट ते काय होते? कुणावर प्रेम बसले, तर त्यातून वाईट काय होणार? प्रेमनगरीत माझाही काही हक्क आहे की नाही?
रूपको मनमा बसैबा तो बुरा का होइहैं
कोहूसे प्रीत लगैबा तो बुरा का होइहैं
प्रेम की नगरीमा कुछ हमरा भी हक होइबे करी नैन लड़ गैंहे…
तिने नुसते तिरप्या नजरेने माझ्याकडे पाहिले तर मला तो माझ्यावर तिच्या नयनबाणांचा हल्लाच वाटला. आता, तर तिला एकदा तरी पाहिल्याशिवाय झोपच येत नाही. फाशी दिल्यावर गळ्यातून खटक आवाज येऊन हृदय बंद पडते तशी माझी गत झाली आहे.होई गवा मनमा मोरे तिरछी नजरका हल्ला, गोरीको देखे बिना निंदिया न आवै हमका. फाँस लगिहैं तो करजवामा खटक होइबे करी, नैन लड़ गैहे तिच्याशी पुन्हा नजरानजर झाली, तर नाचावेसेच वाटू लागते. मनाला प्रेमाची मधुर गाणी गावीशी वाटताहेत. झांजांचा आवाज आला की, कंबर लचकावून मनमुराद नाचावेसे वाटते.
आँख मिल गयी है सजनियासे तो नाचन लगिहैं, प्यारकी मीठी गजल मनवा भी गावन लगिहैं, झाँझ बजिहैं तो कमरियामा लचक होइबे करी, नैन लड़ जैंहे… देवा रे! कोणती जादू करून ती माझे मन घेऊन गेली, काय जादूटोणा केला आणि माझे मन तिच्या ताब्यात गेले, देवच जाणे! मन ले गयी रे धोबनिया रामा कैसा जादू डारके, कैसा जादू डारिके रे, कैसा टोना डारिके.आता सगळेच बदलले आहे. मराठीचे सात्विक अंगण जसे इंग्रजी शब्दांच्या अनधिकृत झोपड्यांनी व्यापून टाकले आहे तसेच हिंदीवरही इंग्रजीचे, पाश्चिमात्य संस्कृतीचे, अमेरिकी विधीनिषेधशून्य चंगळवादाचे आक्रमण वाढते आहे. म्हणून जुन्या अस्सल भारतीय वातावरणात फेरफटका मारायचा असेल तर अशा जुन्या सिनेमांना आणि गाण्यांना
पर्याय नाही.