Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

वारकरी मतदानाला मुकणार; कार्तिकी यात्रेसाठी लाखो वारकरी आळंदीच्या वाटेवर

वारकरी मतदानाला मुकणार; कार्तिकी यात्रेसाठी लाखो वारकरी आळंदीच्या वाटेवर

मुंबई : संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी दिन सोहळा अर्थात कार्तिकी यात्रा ही कार्तिक वद्य अष्टमी दि. २३ नोव्हेंबर ते अमावास्या दि. १ डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी आळंदीच्या वाटेवर असणार आहेत, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेला लाखो वारकरी मुकणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.


अष्टमीला गुरुवर्य हैबतबाबा पायरीपूजनाने कार्तिक यात्रेला प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी, या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील दिंड्या सुमारे १० दिवस ते १५ दिवस अगोदरच आपल्या गावावरून निघत असतात. विशेषतः मराठवाड्यातून येणाऱ्या दिंड्या लवकर प्रस्थान करत असतात. त्यामुळे २० नोव्हेंबरच्या मतदानाच्या दिवशी शेकडो दिंड्यांतील लाखो वारकरी आळंदीकडे येत असतील. त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना आपल्या हक्काच्या मतांवर पाणी सोडावे लागणार आहे.


दिंड्यांचे प्रस्थान परंपरेनुसार तिथीनुसार होत असते, त्यात बदल होत नाही. त्यामुळे वारकरी मतदानाला मुकण्याची शक्यता आहे. परिणामी, मतदानाच्या टक्केवारीत घट होणार आहे. एकंदरीत, राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना राज्यातील सर्वांत मोठी भरणारी आळंदीतील कार्तिकी यात्रा लक्षात घेतली की नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.



असा असणार दिंड्यांचा प्रवास


कार्तिकी यात्रेच्या आठवडाभरापूर्वी म्हणजे दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान दिनांकापूर्वी निघालेल्या मराठवाड्यातील दिंड्या सप्तमीला दि. २२ नोव्हेंबर रोजी आणि पंढरपूरच्या दिंड्या अष्टमीला दि. २३ नोव्हेंबरला आळंदीत पोहचतील. तर, नवमी दि. २४ आणि दशमी दि. २५ नोव्हेंबरला मुंबई परिसरातील दिंड्या येतील. या सर्व दिंड्या मतदानादिवशी वाटेत असणार आहेत, तर संत नामदेवराय आणि पांडुरंग पालखी सोहळा वाल्हे (ता. पुरंदर) येथे मुक्कामी असणार आहे.


यंदा २० नोव्हेंबर म्हणजेच कार्तिक वद्य पंचमीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या तिथीला माउलींच्या समाधी उत्सवासाठी महाराष्ट्रातील सर्वच भागांतून साधारण ५० पालख्या तसेच जवळपास ४०० ते ५०० दिंड्या आळंदीकडे येत असतात. यातील जवळपास लाखभर वारकरी मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतील, अशी शक्यता दिसून येत आहे. - रामभाऊ चोपदार, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, आळंदी

Comments
Add Comment