Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीदहावी-बारावी परीक्षांच्या तारखा पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता

दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता

मुंबई: पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान बारावीसाठी ३० ऑक्टोबर तर दहावीसाठी १० नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून हे अर्ज भरुन घेतले जात आहेत. त्यामुळे सध्या प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध विषयांच्या असाइनमेंटस् चे अहवाल सादर करण्यासोबतच परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय यंत्रणेने स्वतंत्र वेळापत्रक तयार करुन दिले असून त्यानुसार त्या-त्या शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना निर्गमित केल्या आहेत. वर उल्लेखीत दोन्ही तारखा ह्या विना विलंब शुल्काशिवायच्या आहेत. परंतु जे विद्यार्थी या वेळांमध्ये परीक्षा अर्ज भरु शकणार नाहीत, त्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरुन देण्याची मुभा देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे पश्चिम विदर्भाच्या पाचही जिल्ह्यात व्यापले आहे. त्यामुळे अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये आणि दहावीच्या सर्व शाळांना मंडळातर्फे योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दहावी, बारावीचे परीक्षा अर्ज ऑनलाईन भरावयाचे आहेत. परंतु त्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांचे प्रशासन विद्यार्थ्यांना मदत करीत आहे. किंबहूना त्यासाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आले असून त्याठिकाणी पूर्णवेळ शिक्षक, प्राध्यापकांची नियुक्तीही करण्यात आली आहे.

परीक्षेच्या तारखांची पुढील आठवड्यात होणार घोषणा 

दहावी-बारावीचे परीक्षा अर्ज दाखल करण्यासंदर्भात दुजोरा देत असतानाच विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष निलीमा टाके यांनी आगामी आठवड्यात या दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक घोषित होण्याची शक्यता वर्तविली आहे. पुण्यातील शिखर मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा यापूर्वीच घोषित केल्या असून त्यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. राज्यभरातून अशा अनेक सूचना व हरकती शिक्षण मंडळाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शिखर मंडळ लवकरच परीक्षांचे वेळापत्रक घोषित करेल, असे टाके यांचे म्हणणे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -