राजरंग – राज चिंचणकर
रोजच्या जगरहाटीत आपल्याला महत्त्वाच्या काही गोष्टींचा विसर पडलेला असतो. मात्र नियती तिचे कार्य तिच्या कलाने पार पाडतच असते. माणूस तिथे पूर्णतः हतबल असतो. मराठी रंगभूमीवर ‘यू टर्न’, ‘कथा’, ‘सूनेच्या राशीला सासू’, ‘जोडी जमली तुझी माझी’ या आणि अशा अनेक रंजक नाट्यकृती आणत, स्वतःचा ‘म्हसवेकर पॅटर्न’ निर्माण करणारे लेखक, दिग्दर्शक व निर्माते आनंद म्हसवेकर यांनी गेल्या शनिवारी आयुष्याच्या रंगमंचावरूनच अकस्मात एक्झिट घेतली आणि नाट्यसृष्टीला हे धक्कातंत्र पचवणे फारच कठीण गेले. ‘जिव्हाळा’ ही त्यांची नाट्यसंस्था होती आणि स्वतःच्या आनंदासाठी नाटक करत राहणे, हा या रंगकर्मीचा पिंड असल्याने कुणी स्तुती करो किंवा टीका; रंगभूमीवरचे त्यांचे काम ते अखंड करतच राहिले.
नाट्यक्षेत्रात तन-मन-धन ओतून कार्यरत राहिलेले आनंद म्हसवेकर यांनी त्यांचे आत्मचरित्र लिहून पूर्ण केले होते आणि १३ ऑक्टोबर रोजी त्यांच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा योजला होता. ‘मु.पो.वडाचे म्हसवे ते यू.एस.ए.’ या ‘ग्रंथाली’ प्रकाशित त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यासाठी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात तयारीही करण्यात आली होती. पण दुर्दैवाने, आदल्या रात्रीच त्यांचे अकस्मात निधन झाल्याची बातमी आली आणि सर्वच अवाक झाले. तब्बल ४० एकांकिका, प्रायोगिक व व्यावसायिक अशी ४५ नाटके, विविध चित्रपटांच्या कथा व संवादलेखन, अनेक मालिकांचे काही हजारांत एपिसोड्स, जाहिराती आदी अचाट कामगिरी त्यांनी करून ठेवली आहे. त्यांच्यासोबत अनेकांचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध होते. साहजिकच, या अघटिताने त्यांच्या निकटचा प्रत्येकजण हळहळला.
नाट्यसृष्टीत ते ‘आनंद म्हसवेकर’ म्हणूनच परिचित होते; परंतु त्यांचे मूळ त्यांना कदाचित स्वस्थ बसू देत नसावे. त्यांची मुळातली ‘आनंद कांबळे’ ही ओळख आणि त्या अानुषंगाने त्यांनी जे जे काही अनुभव गाठीशी बांधत नाट्यसृष्टीत प्रवास केला; याचे दस्तावेजीकरण व्हावे म्हणून त्यांनी आत्मचरित्राचा मार्ग जवळ केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही त्यांनी लिहिलेल्या ‘कुणा एकाची रंगयात्रा’ या त्यांच्या पुस्तकात त्यांनी याचे सूतोवाच केले आहे. त्या अानुषंगाने, ‘आनंद म्हसवेकर’ ते ‘आनंद कांबळे’ असा ‘यू टर्न’ त्यांनी घेतला आणि आधीच्या ओळखीला समोर आणले. स्वतःविषयीच्या लेखनाच्या निमित्ताने त्यांनी घेतलेल्या ‘यू टर्न’ची ‘कथा’ अतिशय संवेदनशील आहे.
‘मु. पो. वडाचे म्हसवे ते यू. एस. ए.’ या त्यांच्या आत्मचरित्राला ज्येष्ठ रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांनी प्रस्तावना लिहावी, असा आग्रह त्यांनी त्यांच्याजवळ धरला आणि पुरुषोत्तम बेर्डे यांनी तो पूर्णत्वासही नेला. आनंद म्हसवेकर यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला पुरुषोत्तम बेर्डे, नयना आपटे, विजय गोखले, संतोष पवार आदी मंडळी उपस्थित राहणार होती; पण आनंद म्हसवेकर यांच्या अचानक एक्झिट घेण्याने हे योजलेले सर्व रद्द करण्यात आले. या सगळ्या घटनेबद्दल, त्यांच्या आत्मचरित्राचे प्रस्तावनाकार पुरुषोत्तम बेर्डे म्हणतात, “आनंदचे असणे आणि अचानक असे निघून जाणे हे अघटीत आहे. ते त्याच्या आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी घडावे, हेही अगदी अनाकलनीय आहे. पण अशा अघटीत घटना त्याच्या आयुष्यात अगणित घडल्या असतील. तशीच त्याची ही एक्झिट ! वास्तविक, आत्मचरित्र लिहिण्यासारखे त्याचे वय नव्हते. पण आता त्याच्या जाण्याने त्याचे आत्मचरित्र लिहिण्यास योग्य टायमिंग त्याने साधले, असेच म्हणावे लागेल. मी प्रस्तावना लिहावी हा हट्ट त्याने धरला, कारण माझे ‘क्लोज एन्काऊंटर’ पुस्तक त्याला प्रचंड आवडले होते. ते वाचल्यावर, ‘तुझे आयुष्य माझ्यापेक्षा खतरनाक, म्हणून तूच प्रस्तावना लिहावीस’, हा त्याचा आग्रह मला संकोचित करून गेला आणि मी ती लिहिली. प्रस्तावना वाचून तो भारावला, सद्गदित झाला. पण…! खरे तर आनंद आजारी पडला असता, ॲडमिट झाला असता, बेडरिडन झाला असता तरी चालले असते. त्यामुळे प्रकाशन पुढे ढकलले असते तरी चालले असते. पण एकदम एक्झिट, म्हणजे जरा अतीच झाले. आता ज्यांनी आनंद म्हसवेकर यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली आहे, त्यांनाच त्याचे प्रकाशन होण्याआधी त्या लेखकाला आदरांजली वाहणे क्रमप्राप्त ठरावे; ही दुर्दैवाचीच गोष्ट ! अर्थात, ‘शो मस्ट गो ऑन’च्या धर्तीवर आनंद म्हसवेकर यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन पुढे-मागे होईलही; पण त्यात ‘आनंदा’चे हरपलेपण सतत जाणवत राहील. ‘कुणा एकाची रंगयात्रा’ व ‘मु. पो. वडाचे म्हसवे ते यू. एस. ए.’ या त्यांच्या लेखनाद्वारे मात्र आनंद म्हसवेकर त्यांच्या आयुष्याची ‘कथा’ कायम सांगतच राहणार आहेत.