नवी दिल्ली : जगाने शांततेच्या मार्गावर चालण्यासाठी बुद्धाच्या शिकवणीतून शिकले पाहिजे. जग अस्थिरतेने ग्रासलेले असताना बुद्ध केवळ प्रासंगिकच नाही तर गरजही आहेत. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.
युद्धातून नाही तर भगवान बुद्धांच्या शिकवणीतून तोडगा काढून शांतता प्रस्थापित करा, असे आवाहन त्यांन संपूर्ण जगाला यावेळी केले. दिल्लीतील विज्ञान भवन येथे आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी गौतम बुद्ध आणि पाली भाषा याविषयी आपले विचार मांडले. पाली भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने अभिधम्म दिनाचे महत्व वाढले असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझ्या जन्मापासूनच भगवान बुद्धांशी जुळण्याचा प्रवास सुरू झाला होता आणि आजही सुरू आहे.
स्वातंत्र्यापूर्वी आक्रमकांनी भारताची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. नंतर गुलामा मानसिकतेने ग्रस्त असलेल्या लोकांनी हे केले.
एका गटाने देश ताब्यात घेतला आणि आपल्या वारशाच्या विरुद्ध दिशेने नेला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पाली भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता देणे, ही भगवान बुद्धांच्या महान वारशाला श्रद्धांजली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.