जागतिक पर्यावरणातील बदलाची चर्चा जशी ती अमेरिकेतील हवामान शास्त्रज्ञांच्या चर्चासत्रात होते. तशी ती कोकणातील एखाद्या टपरीवजा हॉटेलमध्येही चहा-भजीचा आस्वाद घेताना गावातला शेतकरी चर्चा करतो. या चर्चा करण्याला एक अनुभवाची किनार असते. त्या आधारे महाराष्ट्रातील कोकणातील आणि जागतिक हवामानावरही चर्चा होते. गेल्या काही वर्षांमध्ये हवामान खात्याचे अंदाज काहीसे अचूक म्हणता येणारे नसले तरीही ते अंदाज जवळपास पोहोचणारे असतात; परंतु पूर्वी आकाशाकडे पाहत आपला शेतकरी अचूक सांगायचा, आता पाऊस कुठे पडत असेल किंवा किती वेळात पाऊस पडेल हा अंदाज बरोबर यायचा. घराबाहेर पडताना एवढ्यात पाऊस पडणार नाही या कुटुंबातील जाणत्या व्यक्तीच्या विश्वासक शब्दांवर कोणीही निधिस्तपणे छत्री न घेता सहज घराबाहेर पडायचा; परंतु अलीकडच्या काळात मात्र वातावरणाविषयी कोणताच अंदाज बांधणे कठीण आहे. यावर्षी वादळ वाऱ्याने बागायती, विजेचे खांब फार मोठ्या प्रमाणात कोकणात नुकसान केले आहे. भातशेतीचेही नुकसान पडणाऱ्या पावसाचे होत आहे. भातपीक तयार झाले आहे. भातशेती कापणीचा हा हंगाम आहे. कोसळणारा पाऊस आणि होणार वादळ होत्याच नव्हत करून टाकते. कोकणातील अनेक भागात गेल्या दोन महिन्यात मोठ्याप्रमाणात पाऊस कोसळत आहे. कोसळणारा हा पाऊस ढगफुटीचा पाऊस येतोय. यामुळे साहजिकच जनजीवन कशाप्रकारे विस्कळीत होत याचा अनुभव महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून घेतला जात आहे. पूर्वी असा काही पाऊस कोसळला की ढगफुटीसदृश असा शब्द वापरला जायचा. आता तर ढगफुटीसदृश नव्हे तर ढगफुटीने निर्माण होणारी भयानक स्थिती आपण अनुभवतो.
जो पाऊस दोन-पाच दिवसांमध्ये व्हायचा तोच पाऊस आता तास-दीड तास कोसळतो. होत्याचं नव्हतं करणारी ही ढगफुटी असते. खरंतर कोकणाला पावसाच काहीच नवल वाटत नाही. एकदा जून महिन्यात पाऊस सुरू झाला की, तो सर्वसाधारणपणे नोव्हेंबर अखेरीस थांबायचा. अलीकडे वर्षभर पाऊस पडतो. बरं कोणत्या महिन्यात पाऊस पडेल हे कोणालाच सांगता येत नाही. ज्या ज्या भागामध्ये ढगफुटी झाली त्या भागातील शेती-बागायतीची फार मोठी हानी झाली आहे. या ढगफुटीच्या पूर्वी मोठ्ठं वादळ होतं. या वादळात मोठं-मोठी झाडं जमिनीवर येतात. यातून कोकण भागात विजेचा प्रश्न गावो-गावी निर्माण होत आहे. अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्याची देखभाल दुरुस्ती करायची ठरवली तरी तातडीने शक्य होत नाही. ग्रामीण भागात तर आठ-पंधरा दिवस देखील वीजपुरवठा खंडित होतो. गावो-गावी वीजच नसते. शहरातील नागरिक पंधरा मिनिटे वीज नसेल तर वीज वितरणचे कार्यालय गाठतात. वीज वितरणच्या कार्यालयात जाऊन आकांड-तांडव करतात. ग्रामीण भागातील जनता यापेक्षा अंधारात राहाणे पसंद करते. कारण वीज वितरणचा कर्मचारी लाईनमन जेव्हा लक्ष घालेल तेव्हा वीज येणार नाही तर ग्रामीण भागातील जनतेला अंधारातच राहावे लागते. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वारा, वादळ, पाऊस, ढगफुटी या सर्वांचा सर्वाधिक त्रास हा गावच्या ग्रामस्थांनाच अधिक होतो. ऋतुचक्रामध्ये झालेला हा बदल कोकणातील शेतकरी अनुभवत आहे. सध्या ऑक्टोबर हिट सुरू झाली आहे. या उष्णतेचा परिणामही जाणवत आहे. कोकणातला शेतकरी जरी त्याचं नुकसान झालं तरीही तो सरकारदरबारी कधी ओरड करत बसत नाही आणि नुकसानभरपाईसाठी आग्रही राहात नाही हे कदाचित कोकणच्या शेतकऱ्याचं चुकीचंही होत असेल. उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी प्रत्येक नुकसानीचं चित्र असं काही महाराष्ट्रासमोर उभं होतं की, सगळंच संपलं; परंतु तशीच स्थिती जरी कोकणातील शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्माण झालेली असली तरीही तो माध्यमांसमोरही येण्याच्या मानसिकतेत नसतो. तो पुन्हा नव्या उमेदीने नव्या ऊर्जेने उभा राहातो. काम करत राहातो; परंतु हवामानातील बदलाच्या परिणामाने काजू, आंबा या फळ बागायतीत जसा परिणाम होतो तसा तो कृषी विभागातील सर्वच पिकांच्या बाबतीत होत असतो.
परतीच्या पावसाने शेतकरी हैराण आहे. विजांचा लखलखाट अनेक उपकरणं जळत आहेत. म्हणजे घरातील उपकरणं जशी जळतात तशी शेती पंप देखील जळण्याचे प्रमाण यामुळे अधिकच आहे. मागील आठवडाभराचाच विचार केला तर कोकणात पावसाचं आक्राळ-विक्राळ रूप कोकणवासीय अनुभवतोय. ढगफुटीचा पाऊस, प्रचंड वादळ, विजेचा लखलखाट मध्येच उष्मा असं समिश्र वातावरणाचा अनुभव कोकणात येत आहे. एकिकडे महाराष्ट्रात आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांचं वातावरण ढवळून निघत आहे. राजकीय वातावरणातील बदल महाराष्ट्रातील जनता रोजच पाहत आणि अनुभवत असताना हवामानातील बदलाचा परिणाम आणि होणारं नुकसान कसं टाळायचं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. अनेक भागांत भातशेती पाण्याखाली गेली आहे. शेतात तयार झालेलं भात घरात कसं पोहोचं करता येईल अशा चिंतेत कोकणातील शेतकरी आहे. एकीकडे सकाळी उन्ह पडल्यासारखं वाटतं पण दुपारी पावसाचा धुमाकूळ सुरू होता, यामुळे भात कापणीचा हंगाम असतानाही भात कापणी अनेकांची राहून गेली आहे. एकूणच या ढगफुटीने सारंच बिघडवलं आहे.