मुंबई: भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला २-१ अशी धूळ चारली आहे. भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंहने कमाल करताना दोन गोल केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना शनिवारी हिरो एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४मध्ये खेळवण्यात आला. स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पाचवा विजय आहे. आता टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले आहे.
असा होता सामना
सामन्याच्या सुरूवातीला पाकिस्तानचा दबदबा पाहायला मिळाला. सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानने केला. हा गोल पहिल्या क्वार्टरमध्ये ८व्या मिनिटाला पाकिस्तानच्या अहमद नदीमने केला. सुरूवातीला आघाडी घेणाऱ्या पाकिस्तानचे त्यानंतर टीम इंडियापुढे काहीच चालले नाही. त्यांना केवळ एकच गोल करता आला.
सामन्यात पिछाडीवर असलेल्या कर्णधार हरमनप्रीत सिंहने १३व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. हा गोल पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून करण्यात आला. या पद्धतीने १५व्या मिनिटाला पहिल्या क्वार्टरमध्ये भारत आणि पाकिस्तान १-१ असे बरोबरीत राहिले.
त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंहने भारतासाठी दुसरा गोल १९व्या मिनिटाला केला. कर्णधाराने दुसरा गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे केले. आता भारताने २-१ अशी आघाडी घेतली. भारताची ही आघाडी कायम राहिली. टीम इंडियाने २-१ असा विजय मिळवला.