Friday, March 28, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकएसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

नाशिक : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच राज्यभरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या विविध संघटनांनी संप पुकारला आहे. आता सणासुदीच्या काळातच लाल परीच्या चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नाशिक विभागातील आगार क्रमांक एक आणि दोन तसेच पिंपळगाव आणि पेठ आगारातून आज सकाळपासून एकही बस सुटलेले नाही. सुमारे ३०० पेक्षा जास्त बस गाड्या जागेवरच उभ्या असत्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

या संदर्भात अधिक माहिती देताना एसटीचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यातील १३ आगारांपैकी ९ आगारांमधून एसटी बस सुरू आहेत. मात्र नाशिक एक आणि दोन असेच पिंपळगाव आणि पेठ आगारातील बस गाड्या पूर्णतः बंद असल्याने या ठिकाणी बस स्थानकात बस उभ्या असलेल्या दिसून येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा बेमुदत बंद पुकारल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शहरातील महामार्ग बसस्थानक, ठक्कर बाजार बसस्थानक, मेळा बसस्थानक, जुने सीबीएस या ठिकाणी बस गाड्या बंद असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून अनेक प्रवासी बसची वाट पाहत बसलेली दिसून आले. मात्र या बसस्थानकात बस का बंद आहेत याची माहिती देण्यासाठी कोणीही संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नव्हते. महामार्ग बसस्थानक बाहेरच्या आगारातून आलेल्या बस देखील उभ्या होत्या.

सदर बस या गणपती उत्सव काळात कोकणात जाण्यासाठी येथे आलेल्या आहेत. मात्र संपामुळे या बस येथेच उभ्या असल्याचे वाहक – चालकांनी सांगितले. तर ठक्कर बाजार बसस्थानकात एकही बस उभी नव्हती. प्रवासी मात्र बसची वाट पाहत उभे असलेले दिसून आले. मेळा बसस्थानकातून सकाळपासून पुणे येथे केवळ २ बसेस सुटल्या असून याठिकाणी दररोज सरासरी २३५ बस फेऱ्या होतात. मात्र आज जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील विविध भागात सकाळपासून एकही बस सुटलेली नाही. जुने सीबीएस येथून दररोज सरासरी २७४ फेऱ्या होतात मात्र आज सकाळपासून कळवण, वणी, दिंडोरी भागात जाणाऱ्या सुमारे दहा ते बारा बसेस रवाना झाल्या आहेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. दरवर्षी लाखो संख्येने नागरिक कोकणात आणि आपआपल्या गावी जात असतात. मात्र लाल परींच्या चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राज्यभरातील अनेक जिल्ह्यातील एसटी बस डेपोमधून फारशा बस सोडण्यात आलेल्या नाहीत. हा संप केव्हापर्यंत सुरू राहील याबाबतही साशंकता आहे. या संपामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज राज्यस्तरीय धरणे आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन चिघळल्यास सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसू शकतो.

दरम्यान एसटी सेवेच्या माहितीसाठी अनेक स्थानकांत फोन करणाऱ्या प्रवाशांना स्थानकातून प्रतिसाद मिळेना झाला आहे, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे अकरा एसटी कामगार संघटनाच्या कृती समितीने आज राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतन देण्यात यावे, यांसारख्या अनेक मागण्यांसाठी आजपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या आंदोलन सुरू केले आहे. कृती समितीतर्फे शासनाला मागण्या मान्य करण्यासाठी दोन सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत मागण्या मान्य न केल्यास ३ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आजचा बंद करा संप करण्यात आला आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना देखील न्याय द्यावा वेतन आयोगाच्या धर्तीवर करार करून राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगारवाढ द्यावी अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून सुरू केलेली आंदोलन बंद केली जाणार नाही असा इशारा समितीने दिला आहे.

विविध मागण्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे. एस टी कामगारांच्या आर्थिक मुद्यांची सोडवणूक तातडीने व्हावी, एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपराज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळायला पाहिजे, प्रलंबित महागाई भत्ता व फरक, वाढीव घरभाडे भत्ता व फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच ४८४९ रूपये कोटींमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या ५००० रू. ४००० रु., २५०० रु. ऐवजी सरसकट पाच हजार मिळावेत, यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.

सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचा-यांना निवृत्ती वेतन (पेंशन) मिळण्यासाठी येणा-या अडचणी दूर करा. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणा पत्रानुसार दुरूस्ती करण्यात यावी..विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या. या व इतर मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर कराव्यात, असे एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -