मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पुणेतील पोर्शे प्रकरणासारखे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. येथे अल्पवयीन चालकाने एका बाईकस्वाराला चिरडले. या अपघातात या २४ वर्षीय बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर अल्पवयीन आरोपी चालकाला पकडण्यात आले. अल्पवयीन मुलाव्यतिरिक्त आणखी दोन जणांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलाने तेथून पळून जाण्यचाा प्रयत्न केला होता.
हा अपघात मुंबईच्या गोरेगाव परिसरात घडला. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी धरपकड केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी वेगवान महिंद्रा स्कॉर्पिओने २४ वर्षीय बाईकस्वाराला उडवले. जखमी तरूणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणात कार ताब्यात घेतली आहे.
अपघातानंतर खांबाला आदळली एसयूव्ही
पोलिसांच्या माहितीनुसार बाईकस्वाराला धडक मारल्यानंतर ही गाडी एका विजेच्या खांबाला जाऊन आदळली. यात अल्पवयीन चालकालाही जखमा झाल्या आहेत. यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडले.
मृत २४ वर्षीय तरूणाचे नाव नवीन वैष्णव असे होते. तो गोरेगाव परिसरात दूध वाटत होता. हा अपघात सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आरे कॉलनीमध्ये घडला. आरोपी चालकाचे वय १७ वर्षे आहे.