मुंबई : श्री गणपती उत्सवाच्या निमित्ताने कोकण विभागाला रेल्वे संपर्क प्रदान करण्याच्या हेतूने पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस आणि मडगाव स्थानकांदरम्यान नवीन द्वि-साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. या द्वि-साप्ताहिक रेल्वे सेवा गाडीचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, रेल्वे माहिती, प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात येणार आहे. बोरिवली रेल्वे स्थानकावरून उद्या गुरुवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी साधारण १ वाजता ही नविन रेल्वे सेवा धावणार आहे.
ही नवीन ट्रेन वांद्रे टर्मिनस – मडगाव एक्स्प्रेस,पश्चिम उपनगरीय भाग आणि महाराष्ट्राचा निसर्गरम्य किनारपट्टी आणि मडगाव शहर यांच्यातील संपर्क वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. ही रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रहिवाशांना कोकणात जाता येणार आहे. ही गाडी गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी १ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता मडगावला पोहोचेल. हि गाडी वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकात थांबेल.
वांद्रे टर्मिनस – मडगाव एक्सप्रेस द्वि-साप्ताहिक गाडी नियमित ४ सप्टेंबर पासून सुरू होईल. ही गाडी वांद्रे टर्मिनस येथून दर बुधवार आणि शुक्रवारी ६ वाजून ५० मिनिंटानी सुटेल वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगावला रात्री १० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे मडगाव – वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेसची नियमित धाव ३ सप्टेंबर पासून सुरू होईल.
ही गाडी मडगावहून दर मंगळवार आणि गुरुवारी सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल.