जाणून घ्या काय आहे वेळ, तारीख आणि तिकीट बुकींग प्रक्रिया
मुंबई : मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपा (BJP) पक्षाकडून कोकणात ‘मोदी एक्सप्रेस’ (Modi Express) सोडण्यात येणार आहे. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ही गणेशभक्तांसाठी अभिनव प्रवास योजना सुरु केली आहे. १२ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास सुरुवातीला बसमार्फत सुरु केला होता, कालांतराने हा रेल्वेप्रवास सुरु केला. दरवर्षीप्रमाणे नागरिकांनी यंदाही या योजनेला भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन नितेश राणे यांनी केले.
त्याचबरोबर, मोदी एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे तिकीट काढावे लागणार नाही. त्याचा प्रवास पूर्णपणे मोफत असेल. या गाडीचा संपूर्ण खर्च भाजपाकडून केला जाणार आहे. ही सुविधा फक्त एका दिवसासाठी असून प्रवासादरम्यान गणेशभक्तांना जेवण व पाण्याची सोय देखील उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
मोदी एक्स्प्रेस कधी सुटणार?
ही गाडी ४ सप्टेंबर रोजी दादर स्थानकावरील ८नंबर प्लॅटफॉर्मवरुन सकाळी १० वाजता रवाना होणार आहे. या एक्सप्रेसच्या तिकीट बुकींगसाठी प्रवाशांना देवगड, कणकवली, वैभववाडी येथील भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना संपर्क करावा लागणार आहे. तसेच २८, २९ आणि ३० ऑगस्ट हे तीन दिवस तिकीट बुकींग करु शकणार आहेत.