माझे कोकण – संतोष वायंगणकर
महाराष्ट्रातील कोकणात रेल्वे येऊ शकते, धावू शकते यावर जर कोणी चर्चा केली असती तर त्याला एकतर हे कसं शक्य आहे? म्हणून त्याला अविचारी ठरवलं गेलं असतं; परंतु केंद्रीय रेल्वेमध्ये इंजिनीअर असणाऱ्या कोकणातील वालावलकर यांना कोकणात यायला पाहिजे असे वाटत राहायचे; परंतु त्याला प्राथमिक स्तरावरही मूर्तस्वरूप येत नव्हते. ते येण्यासाठी कोकणचं संसदेत प्रतिनिधित्व करणारे बॅ. नाथ पै यांनी भारतीय संसदेत कोकण रेल्वेच्या सर्व्हेची मागणी केली. ती सर्व्हेची मागणीही संसदेतील तांत्रिकदृष्ट्या सत्ताधारी असणारी काँग्रेस अडचणीत असताना बॅ. नाथ पै यांनी कोकण रेल्वेचा सर्व्हे करण्याची मागणी प्रथम मान्य करा तरच मी संसदेतील हक्कभंग मागे घेतो असे सांगितले. त्यावर सत्ताधाऱ्यांनी कोकण रेल्वे सर्व्हेला मंजुरी मिळाली आणि मग पुढे सर्व्हे होऊनही पुढे काहीच घडले नव्हते. जेव्हा रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि देशाचे अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते झाले तेव्हा कोकण रेल्वेसाठीची आर्थिक तरतूद होत टप्प्याप्प्प्याने मुंबईतून कोकणमार्गे कर्नाटक, केरळमध्ये हा रेल्वेमार्ग करण्यात आला.
तीस वर्षांपूर्वी कोकणात रेल्वे सुरू झाली. कोकणात रेल्वेच येऊ शकत नाही असं वाटत असतानाच कोकणातील डोंगर-दऱ्या पार करीत कोकणातून रेल्वे धावू लागली. बॅ. नाथ पै यांच्यानंतर कोकण रेल्वेचे स्वप्न प्रा. मधू दंडवते यांनी पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलं. प्रा. मधू दंडवते निवडणुकीत कोकण रेल्वेसंबंधी भरभरून बोलायचे. त्यांच्या त्या ओघवत्या शैलीत कोकण रेल्वेचं असं काही वर्णन ते करायचे. त्याकाळी रेल्वे न पाहिलेले कोकणातील गावकरी क्षणभर आपण रेल्वेतच बसलोय असा आनंद घ्यायचे; परंतु त्या सभेत होय, कोकणात रेल्वे येतली. आमच्याकडचे डोंगर बघून रेल्वेच हयसून पळतली असा नकारात्मक विचारावर चर्चा होत राहायची; परंतु प्रा. मधू दंडवते यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. सकारात्मक विचारातून प्रा. मधू दंडवतेंच्या हाती देशाच्या तिजोरीच्या चाव्या आल्या आणि प्रा. मधू दंडवते यांनी कोकण रेल्वेसाठी दक्षिणेपर्यंत जाणाऱ्या मार्गासाठी आर्थिक तरतूद करून दिली. स्वच्छ चारित्र्यवान राजकीय नेते म्हणून ज्यांची शेवटच्या श्वासापर्यंत आपली इमेज जपली त्या प्रा. मधू दंडवते यांच्या प्रयत्नातून कोकणात रेल्वे धावू लागली.
कोकणात अनेक शहरांमधून रेल्वे स्टेशन उभी झाली; परंतु त्यानंतर कोकणातील या रेल्वे स्टेशनवर फार निधी कधी खर्च झाला नाही. यात कोकण रेल्वे बोर्डाच्या असलेल्या आर्थिक मर्यादा यामुळे कोकण रेल्वे मार्गावर दररोज धावणाऱ्या रेल्वे गाड्या वाढल्या; परंतु रेल्वे स्टेशन जुनाट होती तशीच राहिली. त्यासाठीच्या सुविधाही रेल्वेकडून उपलब्ध करून दिल्या नाहीत. कोकण रेल्वेचं स्वतंत्र रेल्वे बोर्ड असल्याने आर्थिक मर्यादा त्यातही मधली दोन वर्षे कोरोनाचा काळ आर्थिक संकटाना सामोरे जात रेल्वे कशी तरी धावत राहिली; परंतु सकारात्मक विकासाचा विचार असेल तर काय घडू शकत हे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दाखवून दिले आहे. रेल्वे कधीही आपल्या मालमत्तेत राज्य सरकारला एक इंचही जागा देत नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन रेल्वे स्टेशन बाहेरील जागेत सुशोभीकरणाचा प्रस्ताव दिला. त्यासाठी लागणारा सर्व निधी रेल्वे बोर्ड नव्हे तर महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग निधी उपलब्ध करून खर्च करेल असे सांगितले आणि तशी तरतूदही केली. कोकणातील १२ रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. त्यातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले. कणकवली रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर येणाऱ्या प्रवाशांना रेल्वेचा नव्हे तर विमानतळावर उतरल्याचा फिल येईल. इतक सुंदर आणि कल्पकतेने सुशोभीकरण करण्यात आले आहे.
भारत देशातील पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित करण्यात आला. पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्याची संकल्पना माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी मांडली आणि त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नही केले. आताच्या घडीला कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या जी वाढत आहे त्यामागे पर्यटन जिल्हा घोषित झाल्यानंतरच पर्यटकांची संख्या वाढली आहे. येणाऱ्या पर्यटकांनी आकर्षण वाटेल, त्यांना रेल्वे प्रवासापासून सर्वच ठिकाणी सुखद वाटेल असं एक वेगळं पर्यटनाला पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे होतच राहायला पाहिजे. कोकणातील रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वार परिसरातील सुशोभीकरण झालेलं असताना रेल्वे स्टेशनवर अनेक सुविधांचा अभाव जरूर आहे; परंतु जे चांगलं झालंय त्याबद्धल बरं बोलायला काहीच हरकत नाही. जे व्हायचं आहे त्याची पूर्तता करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी या सर्वांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. खा. नारायण राणे असोत किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री असोत यांच्यातील सकारात्मक दृष्टिकोन आणि नवनवीन संकल्पना, कल्पकता हे अनेक प्रकल्पांतून दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेऊन रेल्वे स्टेशनचा लूक बदलण्याचा प्रयत्न केला. जे राहिलेलं काम असेल ते देखील त्यांच्याकडून करून घेण्यासाठी आणखी जी विकासकामं असतील ती निदर्शनास आणून देत त्याचा पाठपुरावाही जनतेकडून झाला पाहिजे. नकारात्मकता हाच कोकणच्या विकासातील फार मोठी अडचण आणि अडथळा आहे. हा अडथळा आपणच सुधारणा करून दूर केला पाहिजे. ज्यांना काहीच करायचं नसतं त्यांना दोष दाखविण्यातच आनंद घ्यायचा असतो. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. तशीच कणकवली, सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशन सुशोभीकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची सकारात्मकता आणि एका विशिष्ट वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी नियोजन तितकेच महत्त्वाचे ठरले. या सुशोभीकरण प्रकल्प पूर्ततेत बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि या प्रकल्प बांधकामांचा ज्यांनी ठेका घेतला ते ठेकेदार या सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. कोकणचं सृष्टी-सौंदर्य पाहण्यासाठी येणारा पर्यटक रेल्वे स्टेशनवरून जेव्हा तो पुढील प्रवासासाठी गेटवर येईल तेव्हा त्याचे पाय आपोआपच थांबतील असं पाहण्यासाठी आणि नतमस्तक होण्यासाठी अनेक गोष्टी इथे आहेत. हे स्वप्न नव्हे तर कोकण रेल्वेप्रमाणेच रेल्वे स्टेशन परिसर हे देखील एक सत्यच आहे.