मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत झाली होती. ही लढत संपूर्ण राज्यामध्येच चर्चेचा विषय ठरली होती. आता विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांनी या निवडणुकीसंदर्भात बारामतीमध्ये बहिणीविरोधात उमेदवारी देऊन मी चूक केली, अशी कबूली दिली आहे.
सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्राला उभे करणे मोठी चूक होती, असे मोठे वक्तव्य अजित पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना केले होते. यावर आता खासदार सु्प्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित दादा यांचे मी स्टेटमेन्ट वाचले आणि ऐकले नाही, रामकृष्ण हरी! असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असा सामना रंगला होता. यामध्ये सुप्रिया सुळेंचा मताधिक्याने विजय तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. आता विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करत असताना अजित पवारांना बहिणीविरूद्ध बायकोला उभं केल्याची चूक मान्य केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या असल्याचे दिसत आहे.
शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येदेखील गेल्या वर्षी दोन गट पडले होते. अजित पवार यांनी जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांची साथ सोडत महायुती सरकारमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा भार स्वीकारला होता. शरद पवारांच्या भूमिकेमुळे त्यांनी साथ सोडल्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. शरद पवार विरूद्ध अजित पवार असे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु, आता अजित पवार यांनी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत व्हायला नको होता, असे म्हटले आहे