माजी केंद्रिय मंत्री, लोकनेते नारायण राणे यांचे आवाहन
कणकवली : कणकवली रेल्वे स्थानकासमोरील सुशोभीकरण, प्रवेशद्वार हे सर्व एका दुसऱ्याच्या सहकार्यातून घडलेल्या विकासाचे प्रतीक आहे.त्यामुळे यापुढे नकारात्मकता मनातून कडून टाका. सहकार्याची भावना ठेवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकारी दूर करण्याचा माझा संकल्प आहे. रोजगार निर्माण करणारे प्रकल्प येथे आणून जिल्ह्याचा कायापालट करायचा आहे. सिंगापूर प्रमाणे हजारो कोटींची गुंतवणूक करणारे पर्यटनावर आधारित प्रकल्प इथे आणायचे आहेत. कोकणी माणसाच्या बुद्धिमत्तेला. गुणात्मकतेला दुसरी तोड नाहीये. हा येथील मातीचाच गुण आहे. ही हुशारी सार्थकी लावूया. भांडणात वेळ आणि शक्ती घालवण्यापेक्षा बुद्धीच्या जोरावर कोकणचा विकास करूया, असे आवाहन लोकनेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले.
कणकवली रेल्वे स्थानकावरील सुशोभीकरणाच्या लोकार्पण सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते. खासदार नारायण राणे पुढे म्हणाले की, हा रेल्वे स्टेशन परिसर पाहतो आहे. मी कणकवली रेल्वे स्थानकावर आहे काय की एकाद्या विमानतळावर आहे. देखण्या स्वरूपात उभे केलेले हे सुशोभीकरण सर्वांनाच भुरळ घालणारे आहे. चांगल्या कामाचे कौतुक व्हावे, चांगल्याला चांगले म्हणणे, हा माणुसकीचा धर्म आहे. त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचे काम खूपच चांगले झाले आहे. याचे सर्व श्रेय त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना स्थानिक आमदार नितेश राणे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाते, अशा शब्दांत खासदार नारायण राणे यांनी कौतुक केले.
रेल्वे स्थानक परिसरात उभारलेल्या हातात हात घेतलेल्या एका शिल्पाचे उदाहरण देत खासदार नारायण राणे म्हणाले, हातात हात हे सलोख्याचे प्रतीक आहे. कोकणी माणसाने शेजारीपाजारी सर्व जाती धर्मातील लोकांनी या शिल्पाचे अनुकरण करावे असे आवाहन यावेळी खासदार नारायण राणे यांनी केले.
तुम्ही दिलेल्या मतांची ताकद एवढी आहे की मला कोणी नाही म्हणत नाही
महाराष्ट्र सरकारने किंवा रेल्वे संदर्भातील कोणतेही पत्र परवानगी मागण्यासाठी प्रस्ताव दिल्यास तो मागे जाणार नाही. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेच्या मतांमध्ये एवढी ताकद आहे की ते दिल्लीत त्यांना कोणीच नाही म्हणत नाही. त्यामुळे रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वरील सोयीसुविधांसाठी, त्या ठिकाणी काम करण्यासंदर्भात परवानगी देण्यासाठी आपण राज्य सरकारचा प्रस्ताव आल्यावर संबंधित मंत्र्यांशी बोलून ती परवानगी मिळून देऊ. आणि प्लॅटफॉर्मवर आवश्यक असणाऱ्या शेड व सुविधा निर्माण करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.