पॅरिस: भारताच्या हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करताना पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये(paris olympic 2024) कांस्यपदक मिळवले आहे. भारताचे हे या ऑलिम्पिकमधील चौथे पदक आहे. तर हॉकी संघाचे हे सलग दुसरे ऑलिम्पिक पदक आहे.
टोकियो ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताने कांस्यपदकच पटकावले होते. हे कांस्यपदक या ऑलिम्पिकमध्येही भारताने आपल्याकडे कायम ठेवले आहे. हरमनप्रीत सिंह, श्रीजेश आणि इतर सर्व खेळाडूंनी जबरदस्त खेळ करताना स्पेनला २-१ असे हरवत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.
भारतासाठी दोन्ही गोल हरमनप्रीत सिंहने केले. टीम इंडियाचा दिग्गज गोलकीपर पी. श्रीजेशसाठी हा सामना अतिशय खास होता. त्याच्या करिअरमधील हा शेवटचा सामना आहे. त्याच्या या सामन्याचा शेवट गोड झाला.
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांना चांगली टक्कर दिली. मात्र यादरम्यान एकही गोल झाला नाही. मात्र स्पेनने दुसऱ्या क्वार्टरमध्ये बाजी मारली. त्यांच्याकडून मार्क मिरालेसने १८व्या मिनिटाला गोल केला. दरम्यान, स्पेनचा आनंद खूप काळ टिकू शकला नाही. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने जबरदस्त कामगिरी करताना भारतासाठी गोल केला. यामुळे भारत आणि स्पेन बरोबरीत पोहोचले.
भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये घेतली आघाडी
टीम इंडिया तिसऱ्या क्वार्टरमध्ये आक्रमक दिसली. तिसऱ्या क्वार्टरची सुरूवातीलाच भारताने गोल केला. हरमनप्रीत सिंहने ३३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत गोल केला.
पॅरिस ऑलिम्पिकमधील चौथे पदक
पॅरिस ऑलिम्पिक २०२४मधील भारताचे हे चौथे पदक आहे. आतापर्यंत भारताने तीन पदके नेमबाजीत पटकावली आहेत. पहिले पदक मनू भाकरने पटकावले. त्यानंतर मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांनी कांस्यपदकाची कमाई केली. तर त्यानंतर स्वप्नील कुसळेने पुन्हा नेमबाजीत तिसरे कांस्यपदक पटकावले.
हॉकी संघाचे १३ वे पदक
हॉकीमध्ये भारताचा दबदबा नेहमीच राहिला आहे. आतापर्यंतच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत १३ पदके मिळवली आहेत.