शरद पवारांच्या जागेवर काॅंग्रेसचा दावा
सोलापूर : सध्या राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Elections) वारे वाहू लागले आहेत. यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपाची चर्चादेखील सुरु झाली आहे. मात्र, काही जागांवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचे समोर येत आहे. त्यातच आता सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघावरुनही मविआत मिठाचा खडा पडला आहे. पारंपरिक शरद पवारांचा (Sharad Pawar) मतदारसंघ असलेल्या माढावर काॅंग्रेसने आपला दावा ठोकला आहे. त्यामुळे माढ्याचं राजकारण तापलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडून माजी आमदार धनाजी साठे (Dhanaji Sathe) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माढा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा घेतला. यावेळी त्यांनी माढा मतदारसंघाबाबत मागणी केली आहे. माढा नगरपंचायत नगराध्यक्षा मीनल साठे (Minal Sathe) यांना काँग्रेसकडून माढ्यासाठी उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी आज धनाजी साठे यांनी केली. त्याला साठेंनीही दुजोरा दिल्याचं समजतंय.
काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून माढा मतदारसंघातून जनसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. माढा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यात आला होता. महाविकास आघाडीकडून माढा विधानसभा मतदारसंघातून मीनल साठे यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. माढा विधानसभा संघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माढ्यात सध्या काय परिस्थिती?
महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात माढ्यात राडा होण्याची चिन्ह आहेत. माढा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे बबन शिंदे आमदार आहेत. पण बबन शिंदे यांनी त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या सोबत शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे माढ्यावरून महाविकास आघाडीतील वातावरण तापाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.