मुंबई डॉट कॉम – अल्पेश म्हात्रे
गेल्याच आठवड्यात मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावरील पूल बंद झाला आणि मुंबईकरांनी पुन्हा एकदा अभूतपूर्व वाहन कोंडी अनुभवली. हा त्रास आता तब्बल अडीच वर्षं मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे, ही आणखी एक भयंकर गोष्ट आहे. मुंबई ही तिच्या समृद्ध वारशासाठी ओळखली जाते; आता ती सध्या बारमाही वाहतूक कोंडीने त्रस्त अशीही ओळखली जाऊ लागली आहे. मुंबई हे जगातील सर्वात वाईट रस्त्यांवरील रहदारीचे शहर आहे, ते पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे शहर आहे. मुंबईतील वाहतुकीची स्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. शहराचा गर्दीचा दर, प्रवासात घालवलेला सरासरी वेळ, बेसलाइन नॉन-कंजेस्टेड पातळीपेक्षा ५३ टक्के जास्त होता म्हणजे अर्ध्या मिनिटाच्या प्रवासाला गर्दीच्या वेळी २० मिनिटांपर्यंत जास्त वेळ लागतो. या वाहतूक कोंडीचे नागरिकांच्या वैयक्तिक आरोग्य आणि शहराच्या एकूण अर्थव्यवस्थेवर अनेक दीर्घकालीन प्रभाव पडत आहेत. वाहतूक कोंडीमुळे दिवसेंदिवस मुंबईचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे, हे यात सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यात गेल्या सहा महिन्यांत वाहतूक कोंडीत १८ हजार वाहनांची भर पडली आहे. हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ हजार नव्या वाहनांची भर पडल्याने, मुंबईतील वाहतूक कोंडी आणखी वाढली आहे. मुंबईत सध्या ४८ लाख वाहने धावत आहेत. शहरात २ हजार किलोमीटरचे रस्ते आहेत, त्यात २५% रस्त्यांची विविध कामे सुरू आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची आणखी भर पडली आहे. रिकव्हरमध्ये तर अक्षरशः तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. प्रवासासाठी लागणारा वेळ, इंधनावर होणारा खर्च त्यामुळे मनुष्याच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे.
मुंबईच्या वाहतुकीची समस्या निर्माण करणाऱ्या असंख्य घटकांपैकी एक म्हणजे शहराचा भूगोल हे आहे. नवी दिल्ली आणि इतर शहरांमध्ये त्रिज्यात्मक भूगोल आहे, त्यामुळे ते बाहेरून वाढतात आणि एका स्थानाला दुसऱ्या स्थानाला अनेक मार्गांनी जोडतात. दुसरीकडे मुंबई तिन्ही बाजूने अरबी समुद्राने वेढलेली आहे, ज्यामुळे तिची वाढ मर्यादित आहे. उत्तर आणि दक्षिणेला जोडणारे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग या दोनच प्रमुख महामार्गांमुळे गर्दीच्या वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आता त्यात भर पूर्व मुक्त मार्गाची व सागरीकिनारा मार्गाची म्हणजेच कोस्टल रोडची झालेली आहे. पूर्व मुक्त मार्गावर आता सकाळ व संध्याकाळी भयंकर वाहतूक कोंडी अनुभवास मिळते. तसेच कोस्टल रोड अजून अपूर्ण अवस्थेत असल्याने, सध्या पूर्ण असलेल्या रस्त्यांच्या सुरुवातीस व संपण्याचा ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. अशा प्रकारे सर्वच ठिकाणांवरून मुंबईची कोंडी होत आहे. याशिवाय मुंबईत ४.१ दशलक्ष वाहने रस्त्यावर आहेत, त्यामुळेही वाहतूक कोंडी होते. मुंबईतील कारची घनता प्रतिकिलोमीटर ६०० कारपर्यंत वाढली आहे, जी भारतात सर्वाधिक आहे. मुंबईच्या उपनगरात तर फूटपाथवरील अतिक्रमण, त्यात अरुंद रस्ते त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि शहर कोंडल्यासारखे होते. त्यात वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत.
सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांबद्दल शहराच्या उपनगरीय रेल्वेवर जास्त भार आहे. दररोज ७५ लाख लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यानंतर सर्वाधिक प्रवासी म्हणजे ३५ ते ३६ लाख प्रवासी बेस्ट बसचा वापर करतात. बेस्ट ही आधीच तोट्यात असल्याने, सध्या आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी संघर्ष करत आहे, त्यात कमी होत जाणारा बसताफा. बसताफा वाढवण्यात येणाऱ्या अडचणी पाहता, असलेल्या बस गाड्या वाहतूक कोंडीत अडकल्या कारणाने वेळेवर येत नसल्याने व येणाऱ्या बस या गर्दीने तुडुंब भरल्या असल्याने लोकांना हा पर्यायदेखील गैरसोयीचा वाटतो, त्यामुळे साहजिकच लोकांचा कल हा खासगी वाहनांकडे आढळून येतो, त्यामुळे स्वतःचे वाहन घेणे याकडे लोकांचा ओढा जास्त आहे, त्यातच कोरोना नंतर स्वतःच्या वाहनाची गरज हा पर्याय लोकांना जास्त आवडू लागला आहे. तिसरा पर्याय शहरातील मेट्रोसेवा.
सुस्थापित मेट्रो नेटवर्कचा अभाव हे शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण आहे. सध्या मुंबई शहरात तीन मेट्रो सेवा सुरू आहेत व चौथी मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहे. मेट्रोच्या सुरू असलेल्या बांधकामासाठी घेतलेल्या जागेमुळे शहरातील काही भागांमध्ये रस्त्यावरील मार्गांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. मुंबईत आणखी नवीन पाच मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. मात्र ते सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल, अशी आशा बाळगणे मूर्खपणाचे ठरेल, कारण सध्याच्या मार्गांवर मेट्रो सेवा सुरू आहे. तेथील वाहतुकीवर कोणताही फरक पडलेला नाही, उलट दिवसेंदिवस वाहतूक कोंडीही वाढत आहे. मुंबईत देशातील एकमेव मोनो मार्ग सुरू आहे; मात्र म्हणून तेथील मार्गाचा विचार करता व त्यावरील प्रवाशांची संख्या पाहता वाहतूक कोंडी कमी होईल, अशी आशा बाळगणे भाबडेपणाचे ठरेल .
नवनवीन येणाऱ्या गाड्यांचे प्रकार, लोकांकडे खुळखुळणारा पैसा त्यामुळे कोणताही सारासार विचार न करता व अनेक गाड्या रोज रस्त्यावर येत आहे व गर्दीच्या वेळेस सर्वच रस्त्यांवर अभूतपूर्वक कोंडी पाहावयास मिळत आहे. या वाढत जाणाऱ्या वाहनांसाठी कोणतीही पार्किंगची सोय उपलब्ध नसल्याने, सर्रासपणे रस्त्यावर गाड्या उभ्या केल्या जात आहेत, त्यामुळे साहजिकच रस्त्यावरील मार्गिका या पार्किंगने अडवल्या जात आहेत त्यामुळे रस्त्यांची घनता कमी होत आहे. नुकतेच वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या फेरीवाल्यांवरील कारवाई व न्यायालयाने सरकारला चांगलेच फटकारले आहे. लोकांसाठी चालणाऱ्या फूटपाथवर फेरीवाल्यांनी जम बसवल्यामुळे, लोकांना नाईलाजाने रस्त्यावरून चालावे लागते आणि त्यामुळे तेथील वाहतूक कोंडी होते. मात्र काही दिवस गेल्यानंतर मात्र पुन्हा फेरीवाले हळूहळू पथारी पसरू लागले आहेत. वाहतूक कोंडी वाढू लागली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोची कामे अजूनही सुरू आहेत, त्यामुळे त्यांनी टाकलेले पसारे व पत्रांनी झाकलेले रस्ते यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. यात अग्निशमन दलाच्या गाड्या ॲम्बुलन्स मोठ्या प्रमाणात अडकत आहेत, यामुळे कित्येक लोकांचे नाहक बळी जात आहेत. मात्र सध्या या परिस्थितीकडे पाहायला कोणालाही वेळ नाही. मुळात वाहतूक कोंडी ही समस्याच असू शकते, याचे कोणाला भान नाही. जर मंत्रालयात अधिवेशनात येताना काही आमदार रस्त्यात अडकले. वाहतूक कोंडीत फसले, तर तेथील वाहतूक कोंडीत तत्काळ दूर केली जाते, मात्र एरवी सर्वसामान्यांना त्याच वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडावे लागते. गमतीचा भाग म्हणजे याच वाहतूक कोंडीत अडकल्याने व कुटुंबाला वेळ न देता आल्यामुळे कित्येक दाम्पत्याचे घटस्फोट झाले आहे, असे नुकतेच एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
दक्षिण मुंबईतील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी डिझाइन केलेले मुंबई कोस्टल रोड प्रकल्प ज्यात एक भव्य रस्त्यांची रचना होती. दुचाकींसाठी आणि बस स्टॉपसह हा आठ पदरी प्रकल्प होता. प्रवासाचा वेळ ७० टक्क्यांनी कमी करून, ३४ टक्के इंधन वाचवण्याचा दावा केला गेला होता. या प्रकल्पामुळे मुंबईतील रहदारी मोठ्या प्रमाणात सुधारेल, अशी आशा होती म्हणजे दुसऱ्या अर्थी रस्त्यांची क्षमता वाढवणे आणि अधिक लोकांनी वाहन चालविण्यास प्राधान्य देण्यास होती. मात्र आता दुचाकीसाठी हा मार्ग रद्द करण्यात आला असून, सध्या बससाठी एक एक मार्किंग ठेवल्यास उर्वरित मार्गांवर त्याचा ताण येईल म्हणून हा विचारही बाजूला ठेवण्यात आला आहे. हे आपल्याकडे नियोजन कसे होते, त्याचे एक उदाहरण आहे.
जलद आणि सुरळीत प्रवासासाठी रस्त्यांची स्थिती सुधारणे, ही आवश्यकता आहे. मात्र मुंबईतील रस्त्यांची अवस्था पाहता, आपण कोणत्या जमान्यात राहतो, असा विचार पडतो. रस्ते प्रकल्पांवर करोडो रुपये खर्च करूनही, तसेच वर्षानुवर्ष टोलमार्फत करोडाेंची वसुली करूनही मुंबईतील रस्त्यांची परिस्थिती सुधारत नाही, त्यात पावसात तर परिस्थिती आणखी बिकट होते. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न पडतो. पावसाळ्यात त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जाते, मात्र परिस्थिती जैसे थे राहते…! त्यात कसेही अनिर्बंधपणे बनवण्यात आलेले गतिरोधक काही ठिकाणी बसवलेले व उखडलेले ब्लॉक यामुळे वाहतूक कोंडी होते. रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करणे आवश्यक आहे.