विशेष – लता गुठे
आपण जाणतोच आहोत. आपल्याकडे ६४ कला प्रसिद्ध आहेत. यातील प्रत्येक कलेचे वैशिष्ट्ये वेगळे. प्रत्येक कलेमध्ये रूप-रंग वेगळे. त्या कलेमध्ये कलाकाराची कल्पकता, प्रतिभा, प्रतिमा, सृजनशीलता, सर्जनशीलता दडलेली असते. त्या कलेद्वारे तो नवनिर्मिती करत असतो. त्या कलेमधून कलाकाराला काही तरी सांगायचे असते. प्रत्येकाची अवलोकन करण्याची शक्ती वेगळी असल्यामुळे, प्रत्येक कलाकाराची निर्मिती ही वेगळी असते. त्या कलेची निर्मिती करण्याआधी त्या कलाकाराच्या मनामध्ये ती आधी साकार होते आणि नंतर प्रत्यक्षात उतरते. मग तो चित्रकार असो की शिल्पकार.
मागील लेखामध्ये या कलांमागील पार्श्वभूमी आपण वाचलीच असेल. कला कोणतीही असो ती माणसाचे जीवन समृद्ध करते. सर्वात मोठा कलाकार आहे विधाता. त्याने सर्वांगसुंदर निसर्गाची निर्मिती करून, माणसाचं जीवन सुजलाम् सुफलाम् केलं आहे. खरं तर पंचमहाभुतांपासून ही सृष्टी तयार झाली आहे, त्याच पंचमहाभुतांपासूनच माणसाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे संत वचन आहे-“जे जे ब्रह्मांडी ते ते पिंडी.”
मी मागील लेखामध्ये म्हटलं आहे की, कलाकार हा जन्मावा लागतो, तो तयार होत नाही. याचं छोटसं उदाहरण द्यायचं झाल्यास, कवी हा कवितेची निर्मिती करतो, तशी निर्मिती सर्वच व्यक्ती करू शकत नाहीत. शिल्पकार हा शिल्प तयार करतो, साहित्यिकाला शिल्प तयार करता येणार नाही. जरासं इतिहासात डोकावून कलेची सुरुवात कशी झाली? कधीपासून झाली? याची माहिती जाणून घेऊया… भारतीय कलेचा उगम इ. स. पू. ३००० पासून झालेला आहे, असे आपण सांगू शकतो; कारण त्याचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. मोहनजोदडो उत्खननामध्ये अनेक अवशेष सापडले, यावरून त्याकाळी कलेचे स्वरूप कसे होते, याचे काही नमुने पाहायला मिळाले.
बदलत्या काळाबरोबर अनेक गोष्टी बदलत असतात. त्यामध्ये त्या त्या काळानुसार माणसाचे विचार बदलतात, आचार बदलतात, संस्कृती बदलते त्याप्रमाणे कलाही बदलत जाते. त्याचे स्वरूप बदलते; परंतु काही गोष्टी त्याच असतात, त्यामध्ये बदल होत नाही, त्या वैश्विक असतात. एका साम्राज्याचा अस्त होतो, त्यावेळेला नवीन साम्राज्याचा उदय झालेला असतो. आधीच्या साम्राज्यातील सांस्कृतिक खुणा तशाच उभ्या असतात, त्या त्यांचा इतिहास सांगत. उदाहरणार्थ हडप्पा संस्कृतीचा अस्त झाला आणि मौर्य साम्राज्य सुरू झाले. मौर्यांनी त्यांची संस्कृती, धर्म, धर्माचे प्राबल्य दाखविण्यासाठी त्यांच्या पद्धतीने वास्तू तयार केल्या. त्यांच्या देव-देवतांच्या मूर्ती तयार केल्या. अशाप्रकारे सरमिसळ होऊन, नवीन वेगळीच कला जन्माला येते. ज्या जाती जमाती जंगलात राहतात, त्या त्यांची कला जशीच्या तशी जोपासण्याचा प्रयत्न करतात. ती कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते. या लेखांमध्ये आदिवासी चित्रकला वारली पेंटिंग याविषयी सांगणार आहे.
गेल्या वर्षी पालघर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पालघर येथे महिला साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्या संमेलनाला गेले असता, तिथे एक साड्यांचे स्टॉल होते. अनेक रंगांच्या साड्यांवर वारली पेंटिंग केलेली होती. त्याबरोबर वारली पेंटिंग केलेले ड्रेस मटेरियल, रेडिमेड ड्रेस, लहान-मोठ्या बॅग असं बरंच काही विकायला ठेवलं होतं. मला आवडलेली एक साडी घेतली आणि स्टॉलवर असलेले आजोबा आणि त्यांची नात यांना मी विचारलं, तेव्हा ते म्हणाले, हे सर्व आम्हीच केले आहे. त्या छोट्या मुलीला मी विचारलं, तुला पण ही चित्रं काढता येतात का गं? “ तेव्हा ती छान हसून म्हणाली, “हो येते की.” तिला विचारलं, “कशी शिकलीस?” तेव्हा म्हणाली, “मी लहान असताना आजोबा काढायचे. माझे आई-वडील पण काढत होते. आमच्या घराच्या भिंतीवर मी काढायला सुरुवात केली. आजोबांनी शिकविले आणि मग आम्ही ते कपड्यांवर काढू लागलो. वारली पेंटिंगविषयी माझ्या मनातही जाणून घेण्याचे कुतूहल निर्माण झाले आणि त्याविषयी जी माहिती जमा केली, ती या लेखांमध्ये देत आहे.
आदिवासी लोक प्रकृतीच्या सान्निध्यात राहून, संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात. जर आपण वारली पेंटिंग पाहिली असेल, तर आपल्याला आश्चर्य वाटेल, त्यामध्ये फक्त नैसर्गिक रंगाचा वापर केलेला असतो. म्हणजे लाल मातीने किंवा गेरूने भिंत रंगवून त्यावर तांदळाच्या पिठाने गोल, त्रिकोण, चौकोन, आयात, रेषा असे छोटे-छोटे आकार काढून ते भिंती सजवतात. त्यांच्यासाठी भिंत हाच कॅन्व्हास असतो आणि या चित्रकलेसाठी साहित्यही फारसं काही लागत नाही, शिवाय खर्चही नसतो. यामध्ये अवतीभोवतीच्या अनेक घटना, प्रसंग चित्रित केलेले असतात. कोकणातील दृश्य दिसणाऱ्या आणि त्यांनी अनुभवलेल्या सगळ्या गोष्टींचा या वारली पेंटिंगमध्ये समावेश केलेला असतो. त्यामुळे हे चित्रं अतिशय सुरेख दिसतात; कारण त्यामध्ये अतिशय छान पद्धतीने आखीव-रेखीवपणा असतो. त्यामुळे महाराष्ट्रातल्या आदिवासी जमातीतील वारली चित्रकलेला आजच्या काळातही मोठ्या प्रमाणात पसंत केले जाते. बघायला तशी सोपी वाटणारी, ही चित्रकला अतिशय प्रमाणबद्ध पद्धतीने काढली जाते.
पूर्वीच्या काळापासून सहज व्यक्त होणे, ही माणसाची प्रवृत्ती आहे. त्यामुळे तो विविध कलांमधून व्यक्त होत असतो. त्यातून त्याला आनंद मिळतो. प्रसिद्धी, नावलौकिक आणि उदरनिर्वाहासाठी पैसाही मिळतो. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आणि श्रमपरिहार म्हणून गायन, वादन, नृत्य, शिल्पकला, चित्रकला अशा कलांचा उदय झाला आहे. या माध्यमातून मानव स्वतःला व्यक्त करायला शिकला. शिवाय काही कलांना धार्मिक विधींचेही स्थान मिळाले आहे. वारली चित्रकला महाराष्ट्रातील वारली समाजाच्या संस्कृतीचा आरसा समजला जातो; परंतु आता विविध परिसरांमध्ये अनेक कलाकार वारली पेंटिंग करताना दिसतात. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यात तलासरी, डहाणू, वसई, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागांमध्ये तसेच महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमारेषेवर असलेले दादरा नगर हवेली यांसारख्या भागांत वारली चित्रकला आढळते. डहाणू आणि तलासरी हा परिसर या चित्रकलेचे केंद्रस्थान आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, दिल्ली येथे वारली कलाकारांनी आपल्या चित्रकलेचे सादरीकरण घडविले होते. त्यामध्ये वारली लोकसंस्कृतीचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आधुनिक काळापर्यंतचा प्रवास या कलाकारांनी ५ भित्तीचित्रांच्या द्वारे घडविला होता. याचे खूप कौतुक झाले.
वारली पेंटिंग ही कला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. दिवसेंदिवस वारली पेंटिंगला भारतभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. वारली पेंटिंगचे कपडेही लोकं पसंत करतात. वारलीची भिंतीवरची ही आदिवासी चित्रकला जगभरामध्ये पोहोचली आहे. वारली पेंटिंग हा आदिवासींच्या चित्रकलेचा विलोभनीय असा वारसा आहे. त्याबरोबरच त्यांचं वास्तव जगणं संस्कृती, सण-उत्सव हेही व्यक्त होतात. त्यामुळे त्यांची संस्कृती समजते. वारली पेंटिंग हे शब्दांचे माध्यम नसले, तरी ती कला सर्व काही बोलून जाते, सांगून जाते आणि आपल्याला विचार करायला लावते. अशाच एखाद्या नवीन कलेवर प्रकाश टाकणारा लेख पुढच्या रविवारी आपल्यासाठी घेऊन येत आहे.