- गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण
या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचे निकाल येणार म्हणून सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले होते. ४ जूनला जरी निकाल येणार असला, तरी निर्देशांकात ३ जूनपासूनच मोठी हालचाल होण्यास सुरुवात झालेली होती. ३ जूनला निर्देशांकात मोठी वाढ दिसून आली. त्याआधी निफ्टी २२,५०० अंकांवर बंद झालेली होती. मात्र सोमवारी ३ जूनला निर्देशांक निफ्टीने जवळपास ८०० अंकांनी वाढूनच दिवसाची सुरुवात केली. खूप मोठ्या गॅपने ओपन झालेल्या निर्देशांकानी नवीन उच्चांक नोंदविला.
४ जूनला शेअर बाजाराच्या ओपनिंग पूर्वीच हळूहळू निकालाचे कल येण्यास सुरुवात झालेली होती. त्यामुळे ३ जूनला वाढलेल्या शेअर बाजाराच्या निर्देशांक निफ्टी सेन्सेक्स आणि बँकनिफ्टीने सावधानतेने सुरुवात केली. मात्र मार्केट ओपन झाल्यानंतर काहीच मिनिटांत मोठी घसरण होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जस जशी मतमोजणी होत गेली, तसे भारतीय शेअर बाजारात घसरण वाढत गेली. दिवसा अखेरपर्यंत घसरण वाढत जात, एक वेळ अशी आली. ज्यावेळी निफ्टी जवळपास २००० अंकांनी तर बँकनिफ्टी ४७०० अंकांनी कोसळले होते. त्यानंतर अगदी काही प्रमाणात थोडी वाढ झाली. आजपर्यंतच्या इतिहासाचा विचार करता, ४ जूनला झालेली घसरण ही आजपर्यंतची एकाच दिवसांत झालेली सर्वात मोठी विक्रमी घसरण आहे. ४ जूनच्या मोठ्या घसरणीनंतर पुढील तीन दिवसांत पुन्हा एकदा शेअर बाजार तेजीच्या लाटांवर स्वार झाला आणि केवळ तीन दिवसांतच निफ्टीने जवळपास २,२०० अंकांची महावाढ दाखवत, पुन्हा एकदा नवीन उच्चांक नोंदविला. पुढील आठवड्याचा विचार करता, निफ्टीची दिशा तेजीची असून, खूप मोठ्या हालचालीनंतर २२,००० ही आता मोठी खरेदीची पातळी असून, जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे. तोपर्यंत निफ्टीची दिशा तेजीची राहील. एकूण शेअर बाजारात नीचांकी पातळी पडून झालेली वाढ बघता, पुढील आठवड्यात देखील शेअर बाजारात वाढ होणे अपेक्षित आहे.
(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)