Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजप्रेमकहाणी (भाग ४)

प्रेमकहाणी (भाग ४)

“प्रेम प्रेमच असतं सर! ते कमी-जास्त होत नसतं. “हे हार घाला एकमेकांना. मी तुमची वऱ्हाडी! एकमेव! महत्त्वाची. अतिशय जरुरीची साक्षीदार. चांगल्या क्षणांना उशीर नको.” अन् हार एकमेकांच्या गळ्यात पडले. प्रेमकहाणी नव्याने सुरू झाली.

नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड

(निमित्त काढून शकूबाई शाळेत आली होती. हेडसरांना निरखून बघत होती. पुढे…)
शकूबाई, कशा आहेत तुमच्या बाईसाहेब.”
“जरा ताप आलाय.”
“अरेच्चा! असा कसा अचानक ताप आला?”
“तापच तो! अचानकच येतो नि औषध घेतलं की जातो.”
“हो तेही खरंच.”
“अशी काय बघतेस? निरखू निरखू?”
“सर, तुम्ही स्कॉटलंडला होता ना?”
“परदेशात शिकलो म्हणून ही मानाची नोकरी मिळाली गं बाई.”
“तुमचा फोटो आहे आमच्यात. एकदम तरुणपणचा. छान रुबाबात काढलाय फोटो. प्रेमळ एकदम. बाईसाहेबांसोबत.”
“काय सांगतेस?” सर चकित झाले.

“खरं तेच सांगते. तुमचं प्रेम जमलं होतं का हो सर? राग मानू नका, स्पष्ट विचारते म्हणून.”
सर काही बोलले नाहीत. “आमच्या बाई तुमचं नाव लावतात म्हणून विचारलं आपलं.”
“अगं हेमंत देशपांडे अशा नावाची बारा तरी माणसं या मुंबईसारख्या गच्च गर्दीत वस्तीला असतील. सीएसटी ते विरारपर्यंत. कल्याण, डोंबिवलीपर्यंत!”
“पण ती फोटोत कुठे आहेत सर?”
“नसली तर नसली.”
“फरक पडता है! बहुत फरक पडता है.”
“तुझा निरोप मिळाला मला. आता तू जाऊ शकतेस.”
“अशी बरी जाईन मी?”
“म्हणजे?”
“तुम्हाला घेऊनच जाईन सोबत.”
“अगं मला शाळेची कामं आहेत.”
“प्रेमकहाणीतले रंग भरायचे बाकी आहेत हेडसर.”
“ढालगजपणा करू नको हा शकूबाई.”

“मी निमित्तमात्र आहे सर. अनेक वर्षं बाईसाहेबांबरोबर काढली आहेत मी. फार एकट्या आहेत हो त्या.” शकूबाईंचे डोळे भरून आले. त्यातून टपटप आसवे गालावर ओघळली.
“शकूबाई रडू नका.”
“एकटेपणाचे दु:ख त्यांना देऊ नका सर. तुम्हाला बघितलं नि तेव्हापासून तुमची जुनी प्रेमकहाणी माझ्या मनी उलगडली. मोठे सर, साहू नका ही शिक्षा. ही एकाला नव्हे, दोहोंना आहे.” सर आतून हलले. त्यांच्या मनाची चलबिचल झाली.
“शकूबाई, चला मी येतो. प्रकृतीची चौकशी करतो.”

“येताल? चौकशी करताल? माझ्या बाई साहेब लयलय खूश होतील.”
“खरंच का शकूबाई?”
“प्रेम प्रेमच असतं सर! ते कमी-जास्त नसतं. खूप, मोप, मुबलक, लय लय असतं.” शकूबाई गोड हसली. हसली तर गालावर गोड खळी उमलली.
जाता जाता हेडसरांनी थांबवून तिनं दोन भरगच्च फुलांचे हार विकत घेतले
“अगं हे काय?”
“या फुलमाळा आहेत. विचारू नका पुढे काही.” तिने गप्प केले हेडसरांना.
घराचे दार वाजवले. तिने धडपडत उठून उघडले.
पडणारच होती.
पण हेडसरांनी उचलून पलंगावर अलगद ठेवले. फुलासारखे!
“आता अजिबात उठायचे नाही.”
“सर कॉफीऽऽ“
“शकूबाई करतील. नाही तर मी करू का?”
“इश्शऽऽ“
“लाजलीस की छान दिसतेस. तापातही सुंदर दिसतेस.”
“सर, उभी करा बाईंना.”
“कशाला?”
“हे हार घाला एकमेकांना. मी तुमची वऱ्हाडी! एकमेव! महत्त्वाची. अतिशय जरुरीची साक्षीदार. चांगल्या क्षणांना उशीर नको.”
सर गोंधळले. शकूबाई हार देत सरांना म्हणाली, “अहो, पाहता काय? हार घाला एकमेकांना!”
“घालू?”
“घाल रे हेमंत. फार वाट बघितलीय मी या क्षणाची.”
अन् हार एकमेकांच्या गळ्यात पडले. प्रेमकहाणी नव्याने सुरू झाली. इत्यलम्!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -