नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे एक सुंदर चिंतनशील विचार अलीकडेच वाचनात आला - ‘जिना सबको नही आता, मौत सबको आती हैं.’ किती भयानक सत्य! आणि खरेच नाही का, ‘आपण जगलो ते योग्य प्रकारे की चुकीचे, आपल्यावर लादले गेलेले आयुष्य, जसे जमेल तसे आपण उगाचच जगत गेलो का?’ हा विचार तर अनेकांच्या मनात अनेकदा येऊन जातो. पण मृत्यू? तो मात्र कुणालाच चुकत नाही. तो सर्वांना येणारच हे पक्के! क्षणभर कुणीही गंभीर होऊन जाईल असेच ते वाक्य!असे मरणाबद्दल किती वेगवेगळे विचार हिंदी, मराठी गीतकारांनी मांडले आहेत ते पाहिले की कौतुक वाटते. चेतन आनंद यांनी १९६४ला काढलेला ‘हकीकत’ भारत-चीन युद्धावरचा सिनेमा होता. त्यात आपले बहाद्दूर सैनिक हिमालयातील एका दरीत बसलेले असताना त्यांच्या तोंडी कैफी आझमी यांनी एक अतिसुंदर गाणे दिले होते. सरळसरळ मृत्यूच्या जबड्यात उडी घेताना ते देशबांधवांना म्हणत आहेत, ‘आम्ही तर आता मृत्यूकडेच चाललो, आपला प्रिय देश तुमच्या हातात देतोय, त्याला आता
तुम्हीच संभाळा’ ‘कर चले हम फिदा जानो तन साथीयो अब तुम्हारे हवाले वतन साथीयो.’ खरे तर हेच प्रत्येक सैनिकाच्या मनात शेवटच्या क्षणी येत असणार ना? पण ते कोणता राज्यकर्ता, कोणता नागरिक गंभीरपणे घेतो ते मात्र देवालाच ठाऊक! असद भोपालींनी तर एकदा कहरच केला होता. ‘फ्री लव्ह’(१९७४) असे सवंग नाव असलेल्या सिनेमात एका गाण्यात त्यांनी फार वेगळाच विचार मांडला. तसा कुणीही कधीही मांडल्याचे दिसत नाही. ते म्हणतात, ‘जगण्याचे हे नेहमीचे दु:खाचे सोहळे हवेतच कशाला, मरणे जर अटळच आहे मग आपणहूनच मरून का जाऊ नये?’
‘हम कश्मकशे गमसे गुजर क्यो नही जाते, मरना तो बहरहाल हैं, मर क्यो नही जाते.’ पण त्यांनीच दुसरीकडे ‘उस्तादो के उस्ताद’मध्ये प्रेमासाठी एक जन्म पुरेसाच नाही असे म्हटले होते. ते म्हणतात, ‘मी माझ्या प्रेमाची कथा पूर्ण करण्यासाठी शंभरदा जन्म घेईन’. रफीसाहेबांच्या भावुक आवाजातले रवी यांच्या संगीताने अजरामर झालेले ते गीत होते - ‘सौ बार जनम लेंगे, सौ बार फना होंगे, ए जाने वफा फिर भी हम तुम ना जुदा होंगे’
मुगले आझम (१९६०) हा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मानदंड! त्यातली गाणी लिहिली होती, ‘मन तडपत हरी दर्शनको आज’सारखे जबरदस्त भक्तीगीत लिहिणाऱ्या शकील बदायुनी यांनी! मृत्यूदंडाची शिक्षा झालेली अनारकली (मधुबाला) मरणाला सामोरी जाताना आपल्या बेशुद्ध प्रियकराला, सलीमला (दिलीपकुमार) शेवटचा संदेश देताना गुंगीतून उठवण्याचा प्रयत्न करते आहे. ती म्हणते, ‘बघ प्रिया, सकाळ होतीये, माझ्या मरणाची वेळ जवळ आलीये. मी जाते, कृपाकरून आता ऊठ, माझा शेवटचा सलाम स्वीकार.’ ‘वो आई सुबहके परदेसे मौतकी आवाज, किसीने तोड दिया जैसे जिंदगीका साज, खुदा निगेबान हो तुम्हारा, धडकते दिलका पयाम ले लो, तुम्हारी दुनियासे जा रहे हैं, उठो हमारा सलाम लेलो.’
अगदी शेवटच्या क्षणी, जीवन संपत असताना, जवळच्या प्रियजनांचा निरोप घेणाऱ्या अशा अगणित कलाकृती आपल्या चित्रसृष्टीत आहेत. अशीच दुसरी एक रचना होती शकीलसाहेबांचीच. आयुष्याचे शेवटचे क्षण मोजताना कवी जगाला सांगतो आहे ‘मी आता निघालो.’- ‘आख़िरी वक़्त है, आख़िरी साँस है, ज़िंदगीकी है शाम, आख़िरी आख़िरी...’ तो त्याच्या प्रेयसीला म्हणतो, ‘मन इतके कठोर करू नकोस गं, आता तरी येऊन जा, या शेवटच्या क्षणात माझ्या ओठावर फक्त तुझेच नाव आहे - ‘संग-दिल आ भी जा, अब ख़ुदाके लिए, लबपे है तेरा नाम आख़िरी आख़िरी...’ ‘ती येणार नाहीच’ अशी निराशाजनक खात्री त्याच्या मनात खोल रुजली आहे. म्हणून तो शेवटी मित्राला सांगतो, ‘कृपा कर मित्रा, एकदा तिला सांग रे, ‘आयुष असेच गेले माझे, आता निदान हा शेवटचा प्रवास तरी थोडा सोपा होईल, डोळे फक्त तिचीच वाट पाहत आहेत, तिला सांग, एकदा भेटूनच जा.’ ‘कुछ तो आसान होगा अदमका सफ़र, उनसे कहना तुम्हें ढूँढती है नज़र, नामा-बर तू ख़ुदारा न अब देर कर, दे दे उनको पयाम आख़िरी आख़िरी...’ कवी मध्येच आपल्या वैफल्यावर बोलतो. मद्य देणाऱ्या साकीला सांगतो, ‘मी वचन देतो, मी पुन्हा कधीही व्यसनाच्या आहारी जाणार नाही, तुझे मद्य पिणार नाही पण हे तर आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत. मला शेवटचा एक पेला भरून दे ना.’ ‘तौबा करता हूँ कलसे पियूँगा नहीं, मय-कशीके सहारे जियूँगा नहीं, मेरी तौबासे पहले मगर साक़िया, सिर्फ़ दे एक जाम आख़िरी आख़िरी...’ उर्दू काव्यात मोठी गंमत असते. कवी आपल्या मरणानंतरच्या घटनांवरही भाष्य करतात. तेही इतके कल्पक असते, काव्यमय असते, की क्षणभर वाचकाचे डोळे पाणावतात. जगरहाटीप्रमाणे कुणाच्याही मृत्यूनंतर जे होते त्याचेच वर्णन शकीलसाहेब करताहेत पण ते इतके चित्रमय आहे की कुणीही भावुक होईल. कुणालाही आपले मरण समोर दिसू लागते. कवी म्हणतात, ‘मला लोकांनी शेवटचे स्नान घातले, प्राण जाऊन दोन घटकाही झाल्या नाहीत तर माझा देह, माझे अस्तित्वच, दफन करून टाकले! आणि खरेच नाही का, एकदा माणूस गेल्यावर दु:ख आवरून लोक त्याची ‘शेवटची तयारी’ करून टाकतातच ना!‘मुझको यारोंने नहलाके कफ़ना दिया,
दो घड़ी भी न बीती कि दफ़ना दिया, कौन करता है ग़म, टूटतेही ये दम, कर दिया इंतज़ाम, आख़िरी आख़िरी...’ जाताजाता कवी आपले मन मोकळे करून टाकतो. अगदी आतले दु:ख व्यक्त करताना तो म्हणतो, ‘जिवंतपणी कुणीच माझी पर्वा केली नाही.’ स्वत:लाच समजावताना कवी म्हणतो, ‘तुमचे प्राणच जिथे तुम्हाला सोडून जातात तिथे इतरांची काय कथा म्हणा!’ पण काहीही असो. ‘मित्रानो, तुमच्यावर देव कृपा करो, तुम्हाला तुमच्या जगात चांगले सुख मिळो, मी मात्र आता सर्वांना सलाम करून निघतो. अल बिदा!’
‘जीते-जी क़द्र मेरी किसीने न की, ज़िंदगी भी मेरी बेवफ़ा हो गई, दुनियावालो मुबारक ये दुनिया तुम्हें, कर चले हम सलाम आख़िरी आख़िरी..’ एकंदर जीवनाकडे आणि मरणाची भयानकता संपवून त्याच्याकडेही खेळकर दृष्टीने पाहायला शिकायचे असेल, तर अशी शायरी वाचायलाच हवी.






