- गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण
येत्या १ जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. याच्या एक दिवस आधी, म्हणजेच ३१ मे रोजी शेअर बाजाराने चांगला वेग पकडला आहे. शेवटच्या काही तासांत झालेल्या खरेदीनंतर सेन्सेक्स निफ्टी यांची गती सकारात्मक झालेली आहे. १ जूनला सायंकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोलचा थेट परिणाम शेअर बाजारावर पडेल. त्यामुळेच या आठवड्यातील सोमवार शेअर बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
गेल्या अनेक दिवसांच्या घसरणीला थोडा ब्रेक लागला. निफ्टी ४२ अंकांनी वाढून २२,५३० वर बंद झाला, तर सेन्सेक्स ७५ अंकांनी वाढून ७३,९६१ला बंद झालेला आहे. बीएसई सेन्सेक्समधील ३० पैकी १७ शेअर्स शुक्रवारी वाढीसह बंद झाले आहेत. यामध्येही टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक २.०१ टक्के वाढ झाली आहे. यानंतर बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स वाढले आहेत.
सेन्सेक्सचे मधील उर्वरित १३ समभाग शुक्रवारी घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्येही नेस्ले इंडियाचे शेअर्स २.०६ टक्क्यांनी घसरले. याशिवाय मारुती सुझुकी इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एशियन पेंट्सचे शेअर्स घसरून लाल रंगात बंद झाले आहेत.
अदानी एंटरप्रायझेसच्या समभागात शुक्रवारी ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याशिवाय टाटा स्टील, इंडसइंड बँक, एसबीआय, आयटीसी, रिलायन्स, महिंद्रा आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. नेस्ले, मारुती आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मात्र घसरण झाली. मागील आठवड्यात अमेरिकी बाजार नकारात्मक ट्रेंडसह बंद झाले आहेत. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूडमध्ये देखील घसरण पाहावयास मिळालेली आहे. संपूर्ण आठवड्यात टाटा स्टील, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले आहेत.
एक्झिट पोलनंतर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे एक्झिट पोलचे आकडे किती खरे ठरतात, याकडे ही सगळ्यांचे लक्ष असणार आहे. तांत्रिक विश्लेषणानुसार सेन्सेक्स निफ्टी आणि बँकनिफ्टीची गती तेजीची असून, जर स्थिर सरकार आले तर निर्देशांकात मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. या आठवड्यात निर्देशांकात मोठी हालचाल होणे अपेक्षित असल्याने, सावधानतापूर्वक व्यवहार करणे आवश्यक आहे.
निफ्टीची २१८०० ही अत्यंत महत्त्वाची आधार पातळी असून, २३१०० ही अत्यंत महत्त्वाची अडथळा पातळी आहे. त्यामुळे या मोठ्या निवडणूक निकालात या मोठ्या घटनेचा विचार करता, या पातळ्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. या पैकी कोणतीही पातळी तुटली तर निर्देशांकात त्यानुसार मोठी तेजी किंवा मोठी मंदी होऊ शकते.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)