जागतिक पर्यावरण दिनी नवी मुंबई महापालिका गोळा करणार आंब्याच्या कोयी
नवी मुंबई : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा (Mango) प्रत्येकाचे अत्यंत आवडीचे फळ आहे. रसाळ आंबा खाऊन तृप्त झाल्यानंतर त्या आंब्याची कोय (Mango seed) सर्वसाधारणपणे ओल्या कचऱ्यात टाकून दिली जाते. मात्र ही कोय जर मातीत रुजवली तर त्यापासून पुन्हा रसाळ आंबे देणारे झाड उगवू शकते आणि पुढच्याही पिढ्यांना तृप्त करू शकते. तसेच त्याच्या थंडगार पर्णछायेखाली गारवाही मिळू शकतो. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गाचे देणे निसर्गालाच परत करण्याचा प्रयत्न नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व उद्यान विभागाच्या वतीने आंब्याच्या कोयी संकलित करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाप्रमाणेच माझी वसुंधरा अभियानातही नवी मुंबई हे राज्यातील अग्रणी शहर असून, यामध्ये सुजाण नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच या अभियानांना पूरक असा नवी मुंबईच्या घराघरातून आंब्याच्या कोयी संकलित करून त्यामधून वृक्षसंपन्नता वाढविणारा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याअंतर्गत ५ जून रोजी नवी मुंबईतील सोसायट्यांमधून तसेच ज्युस सेंटर्स, रेस्टॉरंट्स व हॉटेल्स अशा ठिकाणांहून आंब्याच्या कोयी स्वतंत्ररीत्या संकलित केल्या जाणार असून, त्याच्या रोपांतून निसर्गाचे देणे निसर्गालाच परत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नवी मुंबईकर नागरिकांनी आंबे खाऊन झाल्यानंतर उरलेल्या आंब्याच्या कोयी नेहमीच्या ओल्या कचऱ्यात टाकून न देता त्या पाण्याने धुवून स्वच्छ कराव्यात व ५ जून रोजी नवी मुंबई महापालिकेने स्वतंत्र संकलनाची व्यवस्था केलेल्या वाहनात द्याव्यात, असे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, यांनी जनतेला आवाहन केले आहे.
या माध्यमातून ओला, सुका व घरगुती, घातक अशा ३ प्रकारे वर्गीकरण होणाऱ्या कचऱ्यामधील आंब्याच्या कोयींचे स्वतंत्र वर्गीकरण होऊन त्याचा उपयोग पर्यावरण संवर्धनासाठीही होणार आहे.