
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजकीय सारीपाटावरील वाटचाल पाहता त्यांच्याबाबतीत ‘कोण होतास तू, काय झालास तू’ असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. केजरीवाल म्हणजे एक उच्चशिक्षित, सुसंस्कृत चेहरा, आंदोलनातला सर्वसामान्य चेहरा, चळवळीतला चेहरा, समाजसेवक अण्णा हजारे यांचे सहकारी अशा विविध वलयांमुळे अल्पावधीतच अरविंद केजरीवाल यांची देशपातळीवर प्रतिमा निर्माण झाली आणि या प्रतिमेला एक वलय निर्माण झाले. राजधानी दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांना दिल्ली विधानसभेची सत्ता सोपविली.
सर्वच सुविधा मोफत देऊन त्यांनी जनसामान्यांची प्रशंसा मिळविली खरी, पण त्यातून त्यांनी प्रशासकीय अडचणी निर्माण केल्या. सर्व गोष्टी जनसामान्यांना मोफत दिल्या, पण त्या गोष्टी करण्यासाठी खर्च येतो. सर्व गोष्टींचे सोंग आणता येते, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. या गोष्टी सरकारच्या तिजोरीतून कराव्या लागतात आणि हा निधी सरकार जनसामान्यांकडूनच कराच्या रूपाने उभारत असते. त्यामुळे जनसामान्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी, त्या सहानुभूतीचे मत प्राप्तीकडे रूपांतर करण्यासाठी सत्ता मिळविण्याचा हा केजरीवालांचा खेळ होता. केजरीवालांना जमते, मग इतरांना का अशक्य आहे? असा सूर अन्य राज्यांतून आळविला जाऊ लागल्याने काहींनी त्याचे अनुकरणही करण्याचा प्रयत्न केला. पण हा मोफतचा प्रकार अंगलट येणार असून मोफत प्रकरणामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडून शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन करणे तसेच विकासाची कामे करणे अवघड जाणार असल्याचे निदर्शनास येताच अन्य राज्यकर्त्यांनी या मोफतच्या राजकीय खेळाला आवर घातला.
स्वच्छ प्रतिमेचा नारा देत नव्हे, तर डांगोरा पिटत केजरीवाल सरकार दिल्लीच्या सत्तेवर आले. पाठोपाठ पंजाब राज्याची सत्ता मिळविली. आपचा झाडू भ्रष्टाचाराचा कचरा साफ करून राजकारणात स्वच्छता आणणार असे वाटत असतानाच स्वच्छतेचा आव आणणारे देखील काँग्रेससारखेच भ्रष्टाचाराच्या पालखीचे भोई निघाले. स्वच्छतेचा बुरखा पांघरणाऱ्या अरविंद केजरीवाला यांचा खरा चेहरा गेल्या काही दिवसांमध्ये देशातील जनतेसमोर आला आहे. केवळ आणि केवळ स्टंटबाजी करणारे केजरीवाल हे कलाकार असल्याचे आता देशातील जनतेकडूनच बोलले जात आहे. केजरीवाल हे सध्या जामिनावर आहेत. भ्रष्टाचारप्रकरणी त्यांची चौकशी सुरू असून त्यांना तुरुंगवारीही झालेली आहे. केवळ लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. निवडणुकांचा प्रचार, मतदान संपताच त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. जामीन देताना अनेक अटीही केजरीवाल यांना घातल्या आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवीन अबकारी धोरणात (मद्यधोरण) भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या आरोपावरून ईडीने २१ मार्चला अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी ईडी कोठडीत करण्यात आली; परंतु तुरुंगात जावून प्रतिमा मलीन झाल्यानंतरही ‘चोर कोतवाल को डाटे’ अशा थाटात केजरीवाल यांची राजकारणात नौटंकी सुरू झालेली आहे. मद्यधोरण किंवा नवीन अबकारी धोरण प्रकरणात केजरीवाल यांच्यावर झालेले आरोप, ईडीने केलेली कारवाई या घडामोडी पाहता नैतिकदृष्ट्या केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाणे आवश्यक होते.
भ्रष्टाचार प्रकरणावरून दिल्लीत कधी काळी झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनातील एक चेहरा असणारे केजरीवाल भ्रष्टाचार प्रकरणी अडकल्याचा प्रशासकीय यंत्रणा टाहो फोडत असताना, चौकशीसाठी जेलवारी सुरू असताना आजही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडण्यास तयार नाहीत. दिल्लीकरांना आपल्या कामानिमित्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायचे असल्यास त्यांनी तुरुंगात भेटायला यायचे का, अशी समस्या आज निर्माण झालेली आहे. सध्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना केजरीवाल यांच्याच निवासस्थानी त्यांचे स्वीय साहाय्यक बिभवकुमार यांनी केलेल्या मारहाणीमुळे केजरीवाल पुन्हा एकवार चर्चेत आले आहेत. १३ मे रोजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याच निवासस्थानी खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्याच पक्षातील खासदार महिलेला मारहाण होत असेल, तर त्या राज्यात महिलांना कितपत सुरक्षा मिळत असेल, महिलांना कितपत सुरक्षित वाटत असेल, हाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. त्यातही संबंधित पीडित महिला कोणी सर्वसामान्य नसून या देशातील राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांना मासिक पाळी असतानाही व संबंधित महिला सांगत असतानाही मारहाण होते, या घटनेतून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अमानुषतेचा किती कळस गाठला गेला आहे, याची कल्पना येते.
आपल्याच निवासस्थानी महिलेला मारहाण झाल्यावर केजरीवाल यांच्या जाहीर भूमिकेची, प्रतिक्रियेची देशवासीयांना प्रतीक्षा होती. पण केजरीवालांनी या प्रकरणी मौनी भूमिका घेत बिभवकुमार यांची पाठराखणच केल्याचे पाहावयास मिळाले आहे. बिभवकुमार यांची कानउघाडणी करून त्यांना सेवेतून निलंबित करून या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश केजरीवाल यांनी देणे अपेक्षित होते. पण केजरीवाल असे करतील तर ते केजरीवाल कसले? राजकीय नौटंकी नसानसात भिनलेल्या केजरीवाल यांनी या प्रकरणी भाजपावरच खापर फोडण्याचे धाडस केले. केजरीवाल यांचे खासदार, मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात आहेत, केजरीवाल स्वत: तुरुंगात जाऊन आले आहेत. काही दिवसांसाठी जामिनावर आले आहेत. निवडणुका व मतदान संपताच त्यांना पुन्हा तुरुंगवारी अटळ आहे. त्यांनी बिभवकुमार यांना काहीही न बोलता उलटपक्षी आम आदमी पक्षाच्या मागे का लागले आहेत हे लोक.
एकामागोमाग एकाला हे तुरुंगात टाकत आहेत. संजय सिंहांना तुरुंगात टाकले, माझ्या पीएला टाकले. आता हे म्हणतात की, राघव चढ्ढा यांनाही जेलमध्ये टाकणार. सौरभ, अतिशी यांनाही तुरुंगात टाकणार. मी हा विचार करतोय की हे आम्हाला तुरुंगात का टाकत आहेत. आमचा गुन्हा काय? असा प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला. अर्थात केजरीवाल यांच्याकडून दुसरी कोणती अपेक्षा आपण करणार? मुंबईत महायुतीच्या बीकेसीतील सभेतही त्यांनी आपल्या व आपल्या मंत्र्यांवरील आरोपांचे व तुरुंगवारीचे राजकीय भांडवल करत भाजपावर टीका केली. केजरीवाल यांचा राजकीय थयथयाट आता भारतीयांच्याही एव्हाना लक्षात आला आहे.
भ्रष्टाचाराचे भांडवल करत, विरोधकांवर तोफ डागत राजकीय सारीपाटावर आलेले, दिल्लीच्या सत्तेवर बसलेले केजरीवाल व त्यांचे सहकारी भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले आहेत. महिला खासदारांना त्यांच्या निवासस्थानी मारहाण होत आहे. या घटना गंभीर असतानाही केजरीवालांची राजकीय सारीपाटावर नौटंकी सुरूच आहे. केजरीवाल यांचा हा खेळ फार दिवस चालणार नाही. भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीत सत्य लवकरच बाहेर येईल. जनताही आता केजरीवालांच्या नौटंकीला कंटाळली असून मतपेटीतून जनतेने उत्तर दिल्याचे ४ जूनला नक्कीच पाहावयास मिळेल.