भाजीपाल्यांच्या वाढत्या किंमतीमुळे व्हेज थाळीही महागली
मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असल्याने सर्वसामान्य जनतेला खुश ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यातूनच अनेक सवलती, दर कमी होणे अशा गोष्टींना उधाण आले आहे. मात्र, काही गोष्टी महाग होण्यापासून रोखणे सरकारलाही कठीण होऊन बसले आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचं व सर्वसामान्यांचं टेन्शनही वाढलं आहे. भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषत: बटाट्याच्या दरात (Potato Price) मोठी वाढ झाली आहे.
बटाटा म्हणजे सर्वांच्या आवडीचा पदार्थ. कोणत्याही भाजीत बटाटा घातला की त्याची चव वाढते. असा सगळ्या भाज्यांचा जोडीदारच महागल्याने बटाटा विकत घ्यायचा की नाही, असा प्रश्न भेडसावत आहे. एका बाजूला उष्णतेचा कहर आहे, तर काही बाजूला अवकाळी पाऊस या हवामानाच्या स्थितीचा बटाट्याच्या उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात बटाट्याचे प्रमाण कमी आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा स्थितीमुळे बटाटाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. बटाट्याबरोबरच अन्य भाज्यांच्या दरात देखील वाढ होताना दिसत आहे.
टोमॅटोच्या दरात घट तर बटाट्याच्या दरात वाढ
दिल्लीतील आझादपूरची बाजारपेठ अशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारात एका बाजूला टोमॅटोच्या दरात घसरण होत आहे. तर दुसऱ्या बाजूला बटाट्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. तर बटाट्याचे भाव अजूनही चढेच आहेत. बटाट्याच्या दरात आणखी ५ ते १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आणखी पाच सहा महिने भाव चढेच राहणार
दरम्यान, बटाट्याचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत कमी प्रमाणात बटाटा बाजारात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात बटाट्याचे पीक बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी पाच सहा महिने बटाट्याचे दर वाढलेलेच राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बटाटा आणि भाजीपाल्याच्या किंमती वाढत असल्यामुळे व्हेज थाळीही महाग होत आहे.