Amit Shah : इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब!

राममंदिराच्या विरोधकांसोबत उद्धव गेले; ते महाराष्ट्राचा गौरव काय सांभाळणार?


रत्नागिरीतून अमित शाह यांचे टीकास्त्र


रत्नागिरी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात असून, ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गातून (Ratnagiri Sindhudurga) भाजपाने नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या प्रचारार्थ रॅलीत अमित शाह आज रत्नागिरीत दाखल झाले होते. अमित शाह यांची जाहीर प्रचारसभा रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर झाली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राहुल गांधी (Rahul Gandhi) व इंडिया अलायन्सवर (INDIA Alliance) आपले टीकास्त्र उपसले. 'इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब', असा घणाघात अमित शाह यांनी केला.


या सभेसाठी व्यासपीठावर नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार शेखर निकम, किरण सामंत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


अमित शाह यांनी भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, डॉ. पां. वा. कामणे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांची ही भूमी असल्याने येथे येण्याचा आपल्याला अतिशय आनंद असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमोर उभी राहिलेली इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब आहे. या फॅन क्लबसोबत राहायचे की नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहायचे, हे तुम्हाला निश्चित करायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.



उद्धव ठाकरेंना सावरकरांचे नाव घेण्याची लाज वाटते


या सभेत त्यांनी प्राधान्याने उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार उद्धव ठाकरे नसून, एकनाथ शिंदे, नारायण राणे, राज ठाकरे हे आहेत असेही ते म्हणाले. बनावट प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भाषणात वीर सावरकरांचे नाव घेण्याचे धाडस करू शकतात का? सावरकरांचे नाव घेण्याची लाज वाटत असेल तर हे खरेच शिवसेनेचे अध्यक्ष आहे का? ते नकली शिवसेना चालवत आहेत, खरी शिवसेना एकनाथ शिंदे चालवत आहेत. जे स्वत:ची सत्ता आणण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या आश्रयाला गेले, ते महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकत नाहीत, अशी सणसणाटी टीका त्यांनी केली.



देशातून मुस्लिम पर्सनल लॉ संपवण्यात येईल


नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर ३७० कलम हटवले गेले. जगात अकराव्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली. आता तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले तर हीच अर्थव्यवस्था अमेरिका, रशियापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर येईल. देशातून मुस्लिम पर्सनल लॉ संपवण्यात येईल, असा दावा अमित शाह यांनी केला. यावेळी त्यांनी गेल्या काही वर्षांत मोदी सरकारने राबवलेल्या योजनांची व त्याच्या लाभार्थ्यांची माहिती दिली. कोरोना काळात मोदी सरकारने लोकांना लस दिली त्यावेळी उद्धव ठाकरे महाराष्ट्रात खिचडी खात होते, अशी टीकाही त्यांनी केली.



उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री पद हवंय की ३७० हटवणारे?


अमित शाह म्हणाले, काश्मीरमधून कलम ३७० हटवायला हवे होते की नाही? ज्या काँग्रेसच्या मांडीवर उद्धव बसले आहेत, ती काँग्रेस ७० वर्षे कलम ३७० घेऊन बसली होती. मोदींनी कलम ३७० हटवले. राहुल बाबा म्हणाले ३७० काढू नका, नाहीतर रक्ताचे पाट वाहतील. रक्त सोडा, खडा मारायचीही हिम्मत नाही. पाच वर्षात काश्मीरमध्ये दगड उचलण्याची हिंमतही कोणी केलेली नाही. ३७० काढल्यावर रक्तपात होईल म्हणणाऱ्या राहुल गांधींना सांगतो, आज तिथे लाल चौकात कृष्ण जन्माष्टमी होतेय. उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री पद हवंय की ३७० हटवणारे? असा खडा सवालही अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना केला.



राममंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत उद्धव गेले


मोदींना दुसऱ्यांदा प्रधानमंत्री केलं, त्यांनी राममंदिर बांधून दाखवलं. माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे. राममंदिर झालं ते चांगलं झालं असं म्हणू शकता का? राममंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत उद्धव गेले. माझं त्यांना आव्हान आहे, तिहेरी तलाक हटविला ते योग्य आहे ? पीएफआयवर बंदी घातली ते योग्य आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पाकिस्तानात घुसून हवाई स्ट्राईक केला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांबरोबर ठाकरे गेले. कोरोनाकाळात खिचडी खाण्याचं काम तुम्ही केलं असल्याचा आरोपही शहा यांनी यावेळी ठाकरेंवर केला.



काँग्रेसच्या काळात पाकिस्तानी लोक देशात घुसत होते


१० वर्षांत सोनिया गांधी-मनमोहन सिंग यांची सत्ता होती. पाकिस्तानी लोक देशात घुसत होते. मनमोहनसिंग मौन राखत दिल्लीत बसत होते. त्यांना व्होट बँकेची चिंता होती. नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना खात्मा केला. पण काँग्रेसवाले याला फेक एन्काऊंटर म्हणतात. नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षांत राम मंदिराची केस जिंकली आणि राम मंदिरही बांधून दाखवले, असे अमित शाह यांनी नमूद केले.


Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात