संतप्त समर्थकांनी पाटणा-गया रस्ता अडवला
पाटणा : सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. प्रचारासाठी राजकीय नेत्यांनी (Political leaders) उन्हातानात सभांचा धडाका लावला आहे. मात्र या दरम्यान बिहारच्या पाटणामधून (Bihar News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जनता दल युनायटेड (JDU) चे युवा नेते सौरभ कुमार (Saurabh Kumar) यांची पाटणा येथील पुनपुन येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पुनपुन येथील कारपेंटर्स कॉर्नर येथे लग्न समारंभ आटोपून काल परतत असताना रात्री उशिरा सौरभ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर संतप्त समर्थकांनी पाटणा-गया येथे रस्ता रोखून धरला. आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
नेमकं काय घडलं?
बिहारमधील जनता दल युनायटेडचे सौरभ कुमार हे तरुण नेते होचे. रात्री उशिरा सौरभ कुमार आपल्या मित्र आणि कुटुंबासह लग्न समारंभातून परतत असताना दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या जीवघेण्या हल्ल्यात सौरभ कुमार यांच्या डोक्यात आणि मानेवर गोळ्या लागल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांचा तपास सुरु
सौरभ कुमार यांच्यावर हल्ला झाल्यानंतर जनता दल युनायटेडचे संतप्त समर्थक घटनास्थळी जमा झाले. हत्येप्रकरणी प्रशासनाकडून कठोर आणि त्वरित कारवाईची मागणी जेडीयू कार्यकर्त्यांनी केली आहे. हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. एसीपी भारत सोनी म्हणाले की, ते राजकारण आणि व्यावसायिक संबंधांसह सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर मारेकऱ्यांना अटक करून तपास पूर्ण करावा अशी मागणी करण्यात येत आहे.