गजानन महाराज – प्रवीण पांडे, अकोला
आशा कुलकर्णी, नागपूर यांना आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव. गजानन महाराज यांच्यावर माझी खूप भक्ती आहे. मी एका अशा समूहाची सदस्य आहे की, जिथे दर गुरुवारी संत दासगणू कृत गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचण्यासाठी आम्हाला पाठविण्यात येतो. तो अध्याय वाचून झाला की, त्या समूहाला कळवावे लागते. म्हणजे एकास पहिला अध्याय तर दुसऱ्याला दुसरा याप्रमाणे पठण करावयाचे असते. यालाच ‘साखळी पारायण’ असे म्हणतात.
एका गुरुवारी मला अध्याय वाचायचा होता. सकाळपासून अध्याय वाचायचा आहे, हे सारखे मनात सुरू होते. पण काही ना काही तरी कामानिमित्त मी अध्याय वाचायचा विसरून गेले. पाहा, माणसाचे कसे असते. बाकी सगळी कामे आटोपली होती. आता थोडा आराम करावा म्हणून मी थोडी पाठ टेकवली आणि मला झोप लागली. अध्याय वाचायचा राहिला आहे, हे माझ्या डोक्यातून पूर्णपणे निघून गेले. मी झोपले होते, त्यावेळेस अचानक मला असे जाणवले की, घरात कोणीतरी आले आणि मला म्हणाले की, “आज तू अध्याय वाचला आहेस का? विसरलीस ना? ऊठ” असे ऐकताच, मी झोपेतून खडबडून जागी झाले. आणि इकडे तिकडे पाहू लागले. पण मला तिथे कोणीच दिसले नाही. एकदम माझ्या लक्षात आले, अरे खरंच, आज मी अध्याय वाचलाच नाहीये म्हणून. मग मी पटकन उठले आणि समूहावर कळवले की, मी अध्याय वाचलेला आहे.
कारण समूहाची अध्याय पठणाची वेळ टळत आली होती म्हणून आधी कळवून, मग मी लगेच अध्याय वाचायला बसले. अध्याय पूर्ण झाल्यानंतरच मला शांत वाटले. मग मात्र माझ्या डोक्यात विचार सुरू झाले की, मी गाढ झोपेत असताना कोणीतरी माझ्या आसपास आहे आणि माझ्या कानाशी येऊन, असे सांगत आहेत की, तुझा अध्याय वाचायचा राहिला आहे. कुणी सांगितले असेल? कोणी मला आठवण करून दिली असेल? त्यावेळेला माझ्या असे लक्षात आले की, स्वतः महाराजांनी येऊन माझ्या कानाशी ते वाक्य उच्चारून, तेच आठवण करून देऊन, मला जागृत केले आणि महाराज अंतर्धान पावले. हा अनुभव लिहिताना मला खूप भरून आले आहे. अष्टभव दाटून आले आहेत. हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. महाराज इथेच आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या मागे नेहमीच उभे असतात. मनापासून सेवा करणाऱ्याला ते नेहमीच मदत करतात. जय गजानन महाराज … गण गण गणात बोते…