भारतीय संत : डॉ. अनुराधा कुलकर्णी
निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्या नावाची संगती पुढीलप्रमाणे लावता येते - संसारमोहातून निवृत्त होऊन ज्ञानाचा सोपान चढून गेले असता मुक्ती मिळते. या वाक्यात ‘ज्ञानाचा सोपान’ हे षष्टी विभक्तीने एकमेकांना जोडलेले शब्द आहेत. प्रत्यक्षातही सोपानदेव ज्ञानदेवांशी प्रेमभावाने जोडलेलेच म्हणजे पूर्ण एकरूप झालेले होते. ज्ञानदेव निवृत्तिनाथांना समर्पित झाले होते आणि या तिन्ही भावांना मुक्ताई आपल्या चिद्कलेने व्यापून होती. अशी ही एकमेकांशी अद्वैत असलेली अलौकिक भावंडे मराठी सारस्वताचे वैभव ठरली आहेत. या सर्वांच्या अभंगांत, भक्तीच्या अधिष्ठानावरील वेदान्त तत्त्वविवेचन लालित्यपूर्ण शब्दांत सजलेले दिसते.
सोपानदेव आपल्या भावंडांप्रमाणे विठ्ठलाचे अनन्य भक्त तसेच सिद्धावस्थेतले योगी होते. त्यांच्या खालील अभंगातून याची साक्ष पटते.
उघडली दृष्टी इंद्रियांसकट । वैकुंठीची वाट पंढरी जाणा ।। दृष्टीभरी पाहे विठ्ठल दैवत । पूर्ण मनोरथ विठ्ठलदेव ।। हाचि मार्ग सोपा जनासी उघड । विषयाचे जाड टाकी परते ।। सोपान म्हणे गुंफसी सर्वथा । मग नव्हे उलथा भक्तिपंथे ।।
पंढरीच्या वाटेवरून जात असता सोपानदेवांच्या इंद्रियांना ज्ञानदृष्टी येऊ लागली, म्हणजे या जगतनाट्याच्या मुळाशी असलेल्या आत्मचैतन्याची अनुभूती त्यांच्या सर्वेंद्रियांना येऊ लागली. ही आत्मानुभूती सर्वांना यावी, या कळवळ्याने सोपानदेव आपल्याला सांगतात, पंढरीकडे जाणारी वाट, ही वैकुंठाकडे म्हणजे मोक्षाकडे जाणारी वाट आहे, हे समजून घ्या. सोपानदेव पुढे म्हणतात, पंढरीच्या विठ्ठलदेवाला डोळे भरून पाहा. ज्या पूर्णानंदाच्या प्राप्तीसाठी सर्वांची सदोदित धडपड चालू असते, तो पूर्णानंद तर याच्या केवळ दशर्नाने प्राप्त होऊन जीवाचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. विठ्ठलाच्या अनन्य भक्तीचा सोपा मार्ग सर्व लोकांसाठी खुला आहे. फक्त त्यासाठी विषयवासनेचे जाड, घट्ट आवरण बाजूला काढून टाकले पाहिजे. तेव्हा लक्षात येईल की विठ्ठल म्हणजे साक्षात आनंद आहे. सोपानदेव साधकाला म्हणतात, या भक्तिमार्गावर स्वतःला सर्वस्वाने गुंफून टाक. मग या भक्तिपथावरून तू माघारी संसारासक्तीत फिरूच शकणार नाहीस. तुझा अवघा संसार विठ्ठलमय होईल.
पंढरीची वाट म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील एका तीर्थक्षेत्राच्या गावाची वाट, एवढाच केवळ अर्थ ‘पंढरीची वाट’ या शब्दाचा नाही. पंढरीची वाट म्हणजे आत्मविकासाची वाट! मी माझेपणातून सुटून सर्वात्मक होणाऱ्याची वाट! जीवपणाच्या गावाकडून शिवपणाच्या गावाकडे जाणारी वाट! या वाटेवरची मार्गक्रमणा सोपानदेवांनी आपल्या भावंडांसह केली होती. या वाटचालीत त्यांच्या सर्वेंद्रियांना विठ्ठलाला बघण्याची दृष्टी आली होती. आपण फक्त डोळ्यांनी बघतो आणि पंढरपूरच्या मंदिरात गेल्यावर विठ्ठलमूर्तीला डोळ्यांनी न्याहाळू शकतो. पण सर्वात्मक परमेश्वरात सर्वस्वाने समर्पित झालेल्या भक्तासाठी द्रष्टा, दृश्य, दर्शन ही त्रिपुटीही राहात नाही. मग तो इंद्रियांच्या सीमित ज्ञानकक्षेत, वृत्तिज्ञानात कसा अडकेल? इंद्रियांकरवी भेदभावात्मक जगतभासाचाच अनुभव येतो. भक्ताच्या ज्ञानदृष्टीला आत्मानंदाचा मधुर अनुभव येतो.
अनादिअनंत आत्मस्वरूपच विठ्ठलरूपाने पंढरीस भक्तांची वाट पाहात विटेवर तिष्ठत उभे आहे, याची जाणीव होताच आपल्या अंतःकरणातला भक्तिभाव उचंबळून येतो. त्यासाठीच सोपानदेव आपल्याला आवाहन करीत आहेत की आपले मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व विठ्ठलभक्तीत गुंफून टाकावेत, मग जीव पुनश्च संसारमोहात अडकणार नाही.
आईच्या मायेने सर्वसामान्यांना हाकारणारी सोपानदेवांची करुणामय मूर्ती त्यांच्या अभंगातून डोळ्यांसमोर उभी राहते. सोपानदेवांनी केलेल्या प्रेमळ आवाहनाने सर्व विष्णुभक्त त्यांच्याजवळ गोळा झाले. या वैष्णवांना पाहून मोठ्या समाधानाने सोपानदेव म्हणतात, ’हं, चला रे, आता आपण मिळून पंढरीला जाऊ या.”
चला रे वैष्णवहो जाऊ पंढरीसी । प्रेमांमृत खूण मागो त्या विठ्ठलासी ।।
पंढरीच्या वाटेवरून नाचत गात चालणाऱ्या वैष्णवांच्या संपूर्ण यात्रेचे चित्रमय दर्शन सोपानदेव करतात. या चित्रात, पंढरीच्या वारकऱ्यांना एकमेकांबद्दल असलेल्या विशुद्ध जिव्हाळ्याचे, देवभक्तांमधल्या गाढ भक्तिप्रेमाचे, यात्रेत उसळलेल्या उत्कट उल्हासाचे गहिरे रंग भरलेले दिसतात. जितकी ओढ भक्तांना श्रीहरीची, तितकीच ओढ श्रीहरीला भक्तांची! म्हणूनच गोपाळांचा नामगजर कानी पडताच प्रत्यक्ष पांडुरंग गोपाळांच्या भेटण्यासाठी त्यांच्या सामोरी आला आणि भक्तांना न्याहाळत स्तब्ध झाला! या सोपानदेवांनी केलेल्या वर्णनाने भक्तिप्रेमाचा कळस गाठलेला जाणवतो!
विठ्ठलाच्या अनन्य भक्तांचा प्रेमसोहळा सोपानदेव भारावलेल्या अंतःकरणाने न्याहाळतात आणि अत्यंत प्रासादिक शब्दात हरिनाममहिमा गातात. नामजपाच्या साह्याने श्रीहरीशी एकरूप झालेला भक्त श्रीहरीप्रमाणेच अनादिअनंत होतो. जन्ममृत्यूच्या बंधनातून बाहेर येतो. थोर पुण्याई पाठीशी असली तरच आपल्या मुखाने रामनामाचा उच्चार होतो. नाममहात्म्यानंतर नामपाठकाचाही असाच भावपूर्ण महिमा सोपानदेव गातात,
सर्वकाळ ध्यान हरिरूप ज्याचे। तया सर्व रूप साचे जवळी असे।।
ज्याच्या ध्यानात सर्वकाळ हरीचे रूप आहे, त्याच्याजवळ हरी सर्वात्मकतेने जवळच असतो. आपल्या इंद्रियांनी हरिभक्त जगताचा जो अनुभव घेत असतो, त्यात हरीच भरलेला त्याला जाणवतो. अवघ्या ब्रह्माडाला व्यापून उरलेल्या परमेश्वराशी समरस झाल्याने हरिभक्ताचा देहही ब्रह्मांड होतो! शिवमय झालेला हरिभक्त स्वतःच शिव होतो! असे भावपूर्ण वर्णन करणाऱ्या सोपानदेवांचे प्रासादिक शब्द चिदाकाशाला स्पर्श करणारे होतात!
जन्मजन्मांतरीच्या सुकृताने तसेच जिव्हाळ्याच्या संतसंगतीने सोपानदेवांनाही हरिनामस्मरणातल्या निर्मल आनंदाचा परिचय झाला आणि त्या नामाच्या प्रेमात निर्भर झाल्याने क्षणभंगुर संसारमोहाचा पाश त्यांना बद्ध करू शकला नाही. सोपानदेव ज्ञानेश्वरांशी इतके एकरस झाले होते की ज्ञानोबामाऊलीच्या संजीवन समाधीनंतर अवघ्या एका महिन्यानेच सोपानदेवांनीही समाधी घेतली आणि ते ज्ञानराजाशी पूर्ण एकरूप झाले..!! त्यांच्या या एकरूपतेची साक्ष पुढील अभंगातून मिळते,
ज्ञानदेवी ज्ञान नाही तेथे भिन्न । प्रपंचाचे भरण तेथे नाही ।। स्वरूपाची खूण होउनी सकळ । भोगी सर्वकाळ चित्सत्ता ।। आत्मा परमात्मा भेदाभेद द्वन्द्व । एकतत्त्व अभेद जनी वनी ।। सोपान दीपन दिपी ते जीवन । तयामाजी मन एक जाले ।।
सोपानदेव म्हणतात, ज्ञानदेव आणि ज्ञान यांच्यात भिन्नता नाही. ज्ञानदेव म्हणजेच साक्षात ज्ञान होय. प्रपंचभास त्यांच्या ठिकाणी जराही पोसला गेला नाही. ते संसारमायेच्या बंधात पडलेच नाहीत. आत्मस्वरूपाची परिपूर्ण खूण ठरलेले ज्ञानदेव ब्रह्माच्या चिद्शक्तीला म्हणजे शुद्ध चैतन्यमय ज्ञानस्वरूपाला अखंड भोगीत आहेत. जीवात्मा - परमात्मा, भेद - अभेद ही सर्व द्वन्द्वे ज्ञानदेवांनी अनुभविलेल्या एकतत्त्वात विरून गेलीत. जीवाची सीमितता परमात्म्याच्या असीमतेत हरपून गेली. जना वनात सामावलेल्या एकतत्त्वाच्या दर्शनाने, लोकांत - एकांत एक झालेत. ज्ञानदेवरूपी आत्मज्ञानाच्या सागरातले अथांग जीवन बघून उत्तेजित झालेल्या सोपानदेवांचे मन ज्ञानदेवांशी पूर्ण एकरूप झाले!! ज्ञानदेवांच्या समाधीनंतर सोपानदेवांनी त्यांना वाहिलेले अभंगपुष्प पाहू या,
निष्काम निश्चळ निश्चित स्वरूप । तेथे निा|वकल्प मन गेले ।। ध्येय गेले ध्यान ध्याता माजी पूर्ण । आपण सनातन होऊनी ठेला ।। निर्गुणाचे निरालंब निर्विकार फळ । आपणचि सकळ होऊनी ठेला ।। सोपान जिव्हाळे मनाचे ते आळे । परब्रह्म सावळे तयामाजी ।।
परमात्म्याच्या अविकारी, अविनाशी, निश्चल स्वरूपात ज्ञानदेव निष्काम, निर्विकल्प मनाने एकरूप झालेत. ब्रह्मरूपाचे अखंड ध्यान करणाऱ्या ज्ञानदेवात ब्रह्म ध्येय आणि त्याचे ध्यान सर्व पूर्णब्रह्म झाले. असा हा अलौकिक ध्यानयोगी ज्ञानराज स्वतः शाश्वत परब्रह्म झाला. ज्ञानदेवांनी जी पूर्ण समाधी अवस्था साधली, त्यात त्यांना निर्गुण, निराश्रय, निर्विकार असे ब्रह्मरूपाचे फळ मिळाले. सर्वात्मक परमेश्वराचे होऊन ज्ञानदेवही सर्वात्मक झालेत. सोपानदेवांनी आपल्या या भव्य, दिव्य बनलेल्या बंधुराजाच्या भोवती जिव्हाळ्याने भरलेले मनाचे आळे तयार केले. तेव्हा त्यांना जाणवले की या आळ्यात साक्षात सावळे परब्रह्म झालेला माझा ज्ञानराजा आहे!!
असे हे सोपानदेवांचे अनुप्राससंपन्न उदात्त पातळीवरचे तत्त्वपूर्ण काव्य आहे. त्यातील ‘सोपान जिव्हाळे मनाचे ते आळे । परब्रह्म सावळे तयामाजी’ या चरणात सोपानदेवांनी जी पुष्पवाटिकेतील रोपाभोवतीच्या आळ्याची प्रतिमा उभी केली आहे, तिच्यातून सोपानदेवांची ज्ञानदेवांप्रतीची गाढ श्रद्धा तसेच प्रेममय जिव्हाळा आपल्याला स्पर्शून जातो!!
Anuradha.klkrn@gmail.com






