Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीElectricity Price Hike: ऐन उन्हाळ्यात वीज दर कडाडणार!

Electricity Price Hike: ऐन उन्हाळ्यात वीज दर कडाडणार!

इंधन अधिभार जोडल्यास ग्राहकांवर १० टक्के दरवाढ

मुंबई : ऐन उन्हाळ्यात जनतेला वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. १ एप्रिल २०२४ पासून राज्यातील महावितरणच्या विजेच्या दरात वाढ होणार आहे. सर्व ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे. यात इंधन अधिभार जोडल्यास ग्राहकांवर सुमारे १० टक्के दरवाढ होण्याचा अंदाज आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या मार्च २०२३ रोजीच्या आदेशानुसार ही दरवाढ होत आहे. याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ग्राहकांना वीज दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने मार्च २०२३ मध्ये दोन वर्षांसाठी दोन टप्प्यात दरवाढ मंजूर केली होती. त्यानुसार १ एप्रिल २०२३ च्या तुलनेत १ एप्रिल २०२४ पासून सर्वच संवर्गातील ग्राहकांचा स्थिर आकार वाढेल.

असे आकारले जातील दर

घरगुती संवर्गातील सिंगल फेससाठी पूर्वी ११६ रुपये लागायचे. आता १ एप्रिल २०२४ पासून १२८ रुपये लागतील. थ्री फेससाठी पूर्वी ३८५ रुपये तर आता ४२५ रुपये लागतील. वाणिज्यिक ग्राहकांना पूर्वीच्या ४७० रुपयांऐवजी ५१७ रुपये, सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या ग्राहकांना शून्य ते २० किलोवॉटसाठी पूर्वीच्या ११७ रुपयेएवजी १२९ रुपये, २० ते ४० किलोवॉटच्या ग्राहकाला १४२ रुपयेऐवजी १५६ रुपये, ४० किलोवॉटवरील ग्राहकाला पूर्वीच्या १७६ रुपयेएवजी १९४ रुपये स्थिर आकार लागेल. कृषी ग्राहकांना (मीटर नसलले) ५ हॉर्सपॉवरपर्यंत पूर्वीच्या ४६६ रुपयांऐवजी ५६३ रुपये, लघु औद्योगिक ग्राहकांना २० किलोवॉटपर्यंत ५३० रुपयांऐवजी ५८३ रुपये स्थिर आकार लागेल. पथदिव्यांसाठी पूर्वीच्या १२९ रुपयांऐवजी आता १४२ रुपये, सरकारी कार्यालये व रुग्णालयांना २० किलोवॉटपर्यंत पूर्वीच्या ३८८ रुपयांऐवजी आता ४२७ रुपये स्थिर आकार लागेल.

या सर्व ग्राहकांना वेळोवेळी गरजेनुसार खुल्या बाजारातून घेतल्या जाणाऱ्या विजेच्या वाढीव खर्चानुसार इंधन अधिभार लागतो. गेल्यावर्षीइतकाच इंधन अधिभार पकडल्यास आणि त्यामध्ये वाढलेल्या स्थिर आकाराची रक्कम जोडल्यास ही एकत्रित वीज दरवाढ १ ९.२७ ते १०.२७ टक्के पर्यंत असल्याचे महावितरण क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. सोबतच वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसारच वीज दर निश्चित होत असल्याचेही स्पष्ट केले.

“महावितरणच्या मागणीवरून राज्य वीज नियामक आयोगाने सगळ्याच संवर्गातील स्थिर आकार वाढवला आहे. यात गेल्यावर्षीप्रमाणे इंधन अधिभार जोडल्यास ही दरवाढ सुमारे १० टक्क्यांपर्यंत जाते. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात सर्वसामान्यांचे वीज देयक आणखी वाढेल’ असे वीज क्षेत्राचे जाणकार महेंद्र जिचकार यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -