लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तस तसा काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील राजकीय संघर्ष वाढत चालला आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून भाजपाने लोकप्रिय अभिनेत्री कंगना रणौत हिला उमेदवारी जाहीर केल्याबरोबर नवा वाद पेटला आहे. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनैत यांनी कंगनाचे एक अश्लील छायाचित्र समाजमाध्यमात टाकले आणि त्यावर भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आता संघर्ष पेटला आहे. काँग्रेस या निवडणुकीत पराभवाच्या धास्तीने इतकी पछाडली आहे की, काँग्रेसने प्रचार सुरू होण्याअगोदरच खालची पातळी गाठण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसला या निवडणुकीत पराभवाची भीती सतावते आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता यांच्यापुढे काँग्रेस अगदीच किरकोळ आहे.
मोदी यांनी ‘अबकी बार ४०० पार’ अशी घोषणा दिल्याने साऱ्या विरोधी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून कंगना रणौतसारख्या लोकप्रिय अभिनेत्री आणि उमेदवारांचे अश्लील छायाचित्रे पोस्ट करण्याचे अश्लाघ्य कृत्य करण्यात आले आहे. कंगना या निवडणुकीत जिंकेल किंवा हरेल, पण एक महिला म्हणून काँग्रेसच्या महिला नेत्याकडून ही अपेक्षा नव्हती. काँग्रेसच्या अध्यक्षा याही एक महिलाच आहेत आणि काँग्रेसच्या इंदिरा गांधी या अनेक वर्षे पंतप्रधान होत्या. पण काँग्रेसचे चित्त सत्ता गेल्यामुळे सैरभैर झाले आहे आणि त्यांच्याकडून अशा हीन दर्जाच्या गोष्टी केल्या जात आहेत. आता हे प्रकरण राष्ट्रीय महिला आयोगाकडे गेले आहे. आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे आणि राजकीय वाद विकोपाला गेल्याचे पाहून श्रीनैत यांनी ती वादग्रस्त पोस्ट काढून टाकली आहे. पण त्यात काँग्रेसची होती ती शिल्लक अब्रू गेलीच आहे. वास्तविक राहुल गांधी यांनी या कोण बाई आहेत. त्यांची खरडपट्टी काढायला हवी होती.
निवडणुका येतात आणि जातात, उमेदवार निवडून येतात किंवा पडतात. पण एखाद्या विरोधी पक्षातील महिलेचे अश्लील छायाचित्र समाजमाध्यमात टाकणे हे कृत्य कोणत्याही संस्कृतीत बसणारे नाही. वाद विकोपाला गेल्यावर श्रीनैत यांनी ते चित्र आपण टाकले नाही, तर इतर कुणी तरी टाकले आहे. ज्याच्याकडे माझ्या समाजमाध्यम पोस्टचा अक्सेस आहे, अशी सारवासारव केली आहे. पण यात काही अर्थ नाही. मुळात अशा भलत्या कुणाकडेच तुमचा अक्सेस द्यायचाच कशाला आणि श्रीनैत यांची ही सारवासारव ही खोटीच वाटते. कंगनाच्या छायाचित्राखाली एक आक्षेपार्ह कॉमेंटही टाकण्यात आली आहे. याचा अर्थ निवडणुकीत कंगनाचे मनोधैर्य खच्ची करण्याच्या हेतूने हे कृत्य करण्यात आले आहे, हे उघड आहे. काँग्रेस आणि भाजपा यांच्यात सध्या टोकाचा संघर्ष पेटला आहे. त्यामुळे असले प्रकार केले जात आहेत.
निवडणुकीत हार-जीत असतेच. पण त्यासाठी टोकाची भूमिका घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवाराचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नीचतेची कमाल पातळी झाली आणि काँग्रेसने ती गाठली आहे. काँग्रेसला पराभवाची खात्री पटली आहे आणि यामुळे त्यांनी आता असले उद्योग सुरू केले आहेत, असे म्हणायला हरकत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोला मिळत असलेला जबरदस्त प्रतिसाद आणि भाजपाला यंदा तीनशे पंचाहत्तरपेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचे निवडणूक पूर्व अंदाज यामुळे काँग्रेसला आपले या निवडणुकीत काय होणार आहे, याची कल्पना येऊन चुकली आहे. काँग्रेसचा एकही वरिष्ठ नेता निवडणूक लढवण्यास तयार नाही, केवळ दिग्विजय सिंह यांचा अपवाद. याचा अर्थ असा की, काँग्रेसने जवळपास आपण लोकसभेला पराभूत झालो, हे निवडणूक होण्याअगोदरच मान्य करून टाकले आहे काय अशी शंका येते.
कंगना रणौत हिला महाराष्ट्रातील शिवसेना उबाठाने खूप त्रास दिला होता आणि तिचे कार्यालय बेकायदेशीर असल्याचे सांगत तोडले होते. त्यावेळी कंगनाने ‘उद्धव, तूने मेरा घर तोड दिया, मै तेरा घमंड़ तोड दूंगी,’ असे उद्गार काढले होते. त्यानंतर काही दिवसांतच उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. त्यामुळे आता कंगनाविरोधात महाविकास सरकारचा राग असणे स्वाभाविक आहे. पण याचा अर्थ तिची आक्षेपार्ह छायाचित्रे टाकणे हा होत नाही. हा तर गुन्हेगारीचा प्रकार झाला. पक्ष कोणताही असो, कोणत्याही महिलेचा सन्मान राखला जायलाच पाहिजे. एरव्ही काँग्रेसवाले महिलांच्या सन्मानाच्या गप्पा मारत असतात. पण पराभव समोर दिसू लागला की, त्यांच्यातील सौहार्दभाव संपतो की काय, असे वाटते. काँग्रेस नेत्यांचा तोल गेल्याचे हे लक्षण आहे. आता निवडणुकीत काँग्रेसला याची किमत मोजावी लागणार आहे.
काँग्रेसने आपल्या अशा नेत्यांना वेळीच आवरावे अन्यथा काँग्रेसची आणखी भीषण अवस्था होईल. अमित वालवीय यांनी तर श्रीनैत यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे. अर्थात खरगे तसे काही करणार नाहीत, हे तर स्पष्टच आहे. पण राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन काही तरी कारवाई केली तर हे प्रकरणाचे वादळ शमेल. शेवटी राजकारणात दोन्ही बाजूंनी सभ्यता पाळली गेली पाहिजे. एकमेकांवर आरोप करून काहीही होणार नाही. एकमेकांची उणे-दुणी काढून काहीच उपयोग नाही. कारण काँग्रेसने कंगनाचा अपमान करायचा आणि काँग्रेसने कुस्ती महासंघ प्रकरण काढायचे, यात महिलांच्या सन्मानाचे वाभाडे निघत आहेत, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.