Monday, December 2, 2024
Homeसाप्ताहिककोलाजWildlife conservation : वन्यजीवांचे रक्षण काय साधते...?

Wildlife conservation : वन्यजीवांचे रक्षण काय साधते…?

  • प्रमोद माळी, प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक

वन्यजीवांच्या संवर्धनासाठी साजरे होणारे विविध सप्ताह, दिवस त्यांच्यावरील प्रेमापोटी करण्याची बाब समजू शकते. पण मुळात आता आपण आपल्या अस्तित्वरक्षणासाठी हे दिवस साजरे करण्याची वेळ आली आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यांचे रक्षण केले नाही, तर नजीकच्या भविष्यकाळात निसर्गसाखळीत मोठ्या प्रमाणात व्यत्यय येऊन समस्त मानवजातीला त्याचे भीषण परिणाम भोगावे लागतील, यात शंका नाही.

दर वर्षी साजऱ्या होणाऱ्या विश्व वन्यजीव दिनानिमित्त अनेक विषय चर्चेत येतात आणि तो दिवस वा ते साजरीकरण पार पडले की हवेत हलकेच विरूनही जातात. त्यामुळे आवश्यक वा कालसुसंगत ठरतील, असे अपेक्षित बदल होताना दिसतच नाही. खरे पाहता बदलत्या काळातील प्रत्येक आव्हान वेगळे असते व त्यामध्ये माणसाबरोबरच निसर्ग व निसर्गातील सर्व घटक भरडले जात असतात. असे असताना वन्यजीव अपवाद कसे असतील? मात्र तरीही हव्या त्या गांभीर्याने त्याकडे पाहण्याची वृत्ती नसल्यामुळे वन्यजीवांचे अस्तित्व अधिकाधिक धोक्यात आणत आहेत हे समजून घ्यायला हवे आणि या प्रश्नाची उकल शोधण्यासाठी काही बाबींचा विचारही करायला हवा.

लोकवस्तीत वन्यजीवांचा वाढता वावर ही या संदर्भातील अलीकडची चिंतेची आणि चर्चेतील पहिली बाब म्हणता येईल. याचे कारण बघायचे, तर आता लोक मोठ्या प्रमाणात वन्यजीवांच्या अधिवासात येऊ लागले आहेत. म्हणजेच खरे पाहता प्राणी मनुष्यवस्तीत येऊ लागले नसून, मनुष्य त्यांच्या वस्तीत जाऊ लागला आहे, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. त्यामुळे या दिनानिमित्ताने सर्वप्रथम यावर नियंत्रण आणण्याचा विचार आणि त्यास समर्पक ठरणारी कृती होणे आवश्यक आहे. त्या अर्थाने बघायचे, तर जंगल भागात राहणाऱ्या लोकांचा चरितार्थ पर्यटनावर चालतो. अर्थातच येथे येणारे शहरी पर्यटक त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतात. वन्यजीव दर्शनाच्या उद्देशाने ते त्या-त्या भागांत येतात. मात्र प्राणी दिसले नाहीत, तर त्यांची जंगलाकडे बघण्याची दृष्टी बदलते. साहजिकच पर्यटनाच्या व्याख्याही बदलतात. यातूनच पुढे जंगलात पार्ट्या करणे, गोंगाट करून वन्यजीवांना प्रतिकूल स्थिती निर्माण करण्याचे उद्योग सुरू होतात. साहजिक हा अधिवास सोडण्याच्या प्रयत्नात प्राणी भटकतात व मनुष्यवस्तीत शिरतात. त्यामुळेच आधी हा घोळ वा हे दुष्टचक्र समजून ते संपवण्यासाठी प्रयत्न केले, तर परिस्थिती सुधारू शकेल.

शहरातून येणारे काही जाणकार, पर्यावरणाची ओढ लागण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातील काही लोक जंगल बघायला प्रारंभ करतात, जंगलाकडे आकर्षित होतात आणि इथे येतात तेव्हा स्थानिक लोकांच्या काही व्यवहारांवर ते टीकाटिपण्णी करताना दिसतात. उदा. जंगलाजवळचे रहिवासी इंधन म्हणून येथील जळाऊ लाकूड काढतात व घरात त्याचा दैनंदिन वापर करतात. शासननियमाप्रमाणे स्थानिकांनी जंगलातील जळाऊ लाकूड काढण्यास कोणतीही बंदी नाही. अर्थातच ते याची वाहनातून वाहतूक करू शकत नाहीत. मात्र हा नियम ठाऊक नसल्यामुळे नवखे निसर्गमित्र मोळ्या नेताना पाहतात, तेव्हा त्याचे फोटो काढून वन विभागाकडे पाठवतात. त्यावरून वन विभागातील लोक येतात आणि स्थानिकांवर कारवाई करतात, कारण तिथे बसणाऱ्या अधिकाऱ्याला मी काही तरी केले आहे हे दाखवून पदोन्नती मिळवायची असते. मात्र या सगळ्यातून फार मोठी तेढ निर्माण होते; जी अखेरीस वन्यजीवांच्या अस्तित्वालाच नख लावणारी ठरते. जसे की वन विभागाच्या कारवाईनंतर स्थानिकांना निसर्गमित्रांमुळे आपल्यावर संकट आल्याचे समजते आणि ते या लोकांना अजिबात जवळ करत नाहीत. दुसरीकडे, वन विभागाविरोधात काही करता येत नसल्याने ते मनातला राग वन्यजीवांवर काढतात, कारण ‘आमच्या शेतात येऊन नुकसान करून जाणारे प्राणी डिपार्टमेंटचे…’ अशी सरधोपट मांडणी करतात. त्यामुळेच बरेचदा स्थानिकांकडून वन्यजीवांना धोका पोहोचवला जातो. हे दृश्य बदलायचे असेल, तर आधी वन विभागातील लोकांना नियमांची नीट माहिती देणे गरजेचे आहे.

दुर्दैवाची बाब म्हणजे यातील ८० टक्के कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शेड्युल ए-१, ए, बी, सी यातील काहीही माहिती दिसत नाही. कुठला प्राणी कुठल्या कक्षेत येतो हे ते जाणत नाहीत. आज एखाद्या वन अधिकाऱ्याला वनांचे किती प्रकार आहेत वा तुम्ही काम करता ते वन कोणत्या प्रकारचे आहेत असे प्रश्न केले, तर अचूक उत्तरे मिळतील याची खात्री देता येत नाही. म्हणजेच इतके अज्ञान असल्यामुळे मूळ प्रश्न मागे राहतात आणि वन्यजीव, वनअधिकारी, निसर्गसेवक आणि स्थानिक यांच्यातील तिढाच परिस्थिती आणखी बिकट करत राहतो. आज हा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

जंगलात वणवे लागण्याच्या आणि आगीत वन्यजीव होरपळल्याच्या, त्यांचे अधिवास नष्ट झाल्याच्या बातम्या आपण ऐकतो. विशेषत: उन्हाच्या झळा वाढू लागल्या की, या प्रकरणांची संख्याही वाढते. वणवा लागतो की लावला जातो याविषयीही प्रचंड चर्चा होते. मुळात वणवा लागणे ही अत्यंत योगायोगाची घटना आहे. झाडांच्या वाळलेल्या फांद्या एकमेकांवर घासून ठिणगी पडणे आणि ती पडून खालच्या गवताने पेट घेणे हा एवढा मोठा योगायोग आहे की, जवळपास ५० वर्षांतून एकदाच होत असेल. पण प्रत्यक्षात दर वर्षी शेकडो ठिकाणी वणवे लागतात. त्यातील ९९.९९ टक्के वणवे लावले जातात आणि ०.१ टक्के वणवे नैसर्गिक असतात. पण पाठ्यपुस्तकांत हा ०.१ चा भागच शिकवला जातो. अन्य भागावर साधी चर्चाही होत नाही. त्यामुळे वणव्यांमुळे होणारे वन्यजीवांचे नुकसान टाळण्यासाठी आधी अगदी पाठ्यपुस्तकांमधील धड्यांच्या माध्यमापासून याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. वन विभागावरील राग काढण्यासाठी, आपल्या शेतमालाचे नुकसान करणाऱ्या वन्यजीवांना संपवण्यासाठी स्थानिकांकडून टाकली जाणारी एक काडीही विझवता आली तर मनातले अनेक वणवे लागण्याआधीच विझू शकतील. कारण तेढ कोणामध्येही व कोणत्याही कारणांमुळे वाढली तरी शेवटी त्यात बळी वन्यजीवांचा जाणार हे अंतिम सत्य आहे. वनखात्याकडे पैशाची कमतरता नाही. त्यांना भरपूर निधी येतो. एक उदाहरण सांगतो. काही वेळा जंगलात झोपड्या उभ्या करण्याचे आदेश दिले जातात. पर्यटकांची, वननिरीक्षकांची, कर्मचाऱ्यांची निवाऱ्याची वा सावलीची सोय म्हणून अशा झोपड्या उभ्या केल्या जातात. पण सह्याद्रीच्या संपूर्ण पट्ट्यात मुळातच सदाहरित जंगल असून या ‘दहा टक्के जंगला’मध्ये खरोखरच वर्षाच्या बाराही महिन्यांमध्ये केवळ दहा टक्केच सूर्यप्रकाश खाली येतो, ही बाब कोणीही लक्षात घेत नाही. म्हणजेच नैसर्गिक सावली असतानाही वरून आदेश आला की, अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यातून मिळणारा मेवा घेण्यासाठी एखादी जागा हेरली जाते आणि तिथली झाडे तोडून झोपडी बांधली जाते. बरे, अशा प्रकारे निर्माण केलेल्या कृत्रीम सावलीमध्ये बसणाऱ्यांची संख्या ती किती असणार! मग असा आडोसा दारूड्यांना, गैरप्रकार करणाऱ्या आसरा देतो. त्यामुळे अशा कामांमधून वन अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला आपापला हिस्सा मिळतो, उपद्रवी माणसांना मौजमजेच्या दोन घटका मिळतात. पण वन्यजीवांना मात्र नाहक शिक्षा मिळते.

गैरप्रकार स्थानिकांच्या निदर्शनाला येऊन त्यांनी अटकाव करू नये, या हेतूने त्यांना जास्तीत जास्त लांब ठेवायचाही काहींचा हेतू असतो. त्यामुळेच आधी माणसा-माणसांतील तेढ कमी व्हायला हवी. ती कमी झाली, तरच ते एकत्र येऊन वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करू शकतील. अन्यथा दोघांच्या भांडणात या मुक्या प्राण्यांचाच जीव जात राहणार, हे त्रिवार सत्य आहे. त्यासाठी सगळ्या मनुष्यप्राण्यांनी आम्ही निसर्गमित्र, आम्ही वन्यजीवप्रेमी अशा वल्गना करत असे दिवस वा सप्ताह साजरे करणे बंद करावे. खरे सांगायचे, तर आपण आता स्वार्थासाठी त्यांना जगवू लागलो आहोत. त्याखेरीज आता काहीही तरुणोपाय नाही हे समजून घ्यायला हवे, कारण वन्यजीव जगले नाहीत, तर निसर्गसाखळी पुढे इतकी विस्कळीत होईल की, एकही मनुष्यप्राणी जगू शकणार नाही. म्हणूनच भविष्यातील आपला विनाश टाळण्यासाठी प्रयत्न करणे सुरू ठेवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आणि तो प्रामाणिकपणे राबवला तरी खूप काही साध्य होईल.

(शब्दांकन : स्वाती पेशवे)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -