Thursday, November 14, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : मनसेची आढावा बैठक संपली, राज ठाकरेंकडून २१ मतदारसंघांची चाचपणी;...

Raj Thackeray : मनसेची आढावा बैठक संपली, राज ठाकरेंकडून २१ मतदारसंघांची चाचपणी; कोणाला कुठे उमेदवारी देणार?

मुंबई : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीदेखील सुरु केली आहे. त्याचदरम्यान पुणे लोकसभा निवडणुकीसाठीदेखील प्रत्येक पक्षाकडून चाचपणी सुरू झाली आहे. या सर्व घडामोडीदरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यात निवडणूक लढविण्याची इच्छा बोलवून दाखवली. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) देखील कामाला लागली असून मनसेची आज वांद्रे एमआयजी क्लब येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील जवळपास २१ लोकसभा मतदारसंघाचा आढावा स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतला. यामध्ये पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik), बुलढाणा (Buldhana), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), सोलापूर (Solapur) यासह २१ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने सर्वच पक्षाकडून यासाठी तयारी सुरु आहे. राज ठाकरे यांच्याकडून देखील लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत आज राज ठाकरेंनी एक महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाली आहे. राज्यातील कोणत्या लोकसभा मतदारसंघात मनसे पक्षाची किती ताकद आहे? कुठल्या जागा पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत? कुठे पक्षाची किती तयारी आहे? या सगळ्याची चर्चा या बैठकीमध्ये झाल्याचे समजते.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. अशात मनसेच्या आजच्या बैठकीत देखील युतीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणूक लढवताना ती स्वबळावर लढवायची की समविचारी मित्र पक्षांसोबत जायचं? याविषयी विविध लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचे मत या आढावा बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाणून घेतले आहे. याविषयी लेखी मत सुद्धा पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांकडे मागवले असून त्यांची भूमिका काय आहे हे देखिल जाणून घेतले जाणार आहे. याचा आढावा घेतल्यानंतरच लोकसभा निवडणूक लढवण्या संदर्भातील पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

सगळ्याच मतदारसंघासंदर्भात विचार होऊ शकतो : नांदगावकर

यापूर्वी २० तारखेला पण बैठक झाली होती. आजच्या बैठकीत २१ ते २२ जागांचा पूर्ण आढावा घेण्यात आला आहे. पदाधिकारी, संघटक, समन्वयक, जिल्हाध्यक्ष सगळे बैठकीला उपस्थित होते. पुढच्या वाटचालीची वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. आत्ता नेत्यांची चर्चा होईल. महत्त्वाच्या सर्व मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे. सगळ्याच मतदारसंघासंदर्भात विचार होऊ शकतो. सगळे अधिकार राज ठाकरेंचे आहेत. त्यांनी सहकाऱ्यांशी संवाद करून परिस्थिती जाणून घेतली. आत्ता नेत्यांशी चर्चा होईल, अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

अमित ठाकरे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार?

मी लहानपणापासून पुण्यात नेहमी येत असतो. पुणे बदलले असून, खूप समस्या दिसून येत आहेत. राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो, असे सूचक विधान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नुकतेच केले होते. याबाबत अमित ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, मी मागील दोन वर्षांपासून राज्यातील अनेक भागांत दौरे करत आहे. त्या ठिकाणी विविध प्रश्नांवर आंदोलने देखील केली आहेत. त्या सर्व आंदोलनांत आम्हाला यश आले आहे. तसेच आमची निवडणूक लढविण्याची तयारी कायम सुरूच असते. त्याचबरोबर मी निरीक्षक म्हणून पक्ष श्रेष्ठींकडे अहवाल सादर केला आहे. त्याबाबत पुण्यामधून कोण उमेदवार असेल त्याबाबत ते निर्णय घेतील. माझी निवडणूक लढविण्याची अजिबात इच्छा नाही. पण साहेबांनी कोणतीही जबाबदारी दिली तर ती मी जबाबदारी नक्कीच पार पाडेन. मला नगरसेवक किंवा सरपंच बनवलं तरी चालेल, अशी भूमिका अमित ठाकरे यांनी मांडली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -